Posts

Showing posts from November, 2018

किमया...

तावून सुलाखुन ऊन, नित्य प्राशून, उजळली काया उमटती तनूवर ठसे, लागती जसे, स्पर्श बोलाया ही नशा वेगळी, खास, हवासा भास, हवीशी भाषा हा अविरत चाले असा कशाचा धोशा..? एकेक पान सळसळे, दिसे आगळे, रूप झाडाचे अडकली जणू वादळे, घटीका-पळे, सावली नाचे केशरी छटा निमिषात, झिरपता आत, खुले हिरवाई लाजते किती गालात नाजुका जाई... का तृणपाते थरथरे, दिशा हंबरे, थांबती वाटा का कृमिकिटकांची फौज, वाढवी मौज, करी बोभाटा ओढ्यात पाहती रूप, किती अप्रूप, नटोऱ्या वेली का झुळूक आहे इतकी मंतरलेली? न्हाऊन शुचिर्भुत घरे, लख्ख चेहरे, न्याहळी दृष्टी नवरविकिरणांची प्रभा, दाखवी नभा, वेगळी सृष्टी दिवसाच्या हाती हवा,असा ताजवा, देतसे लिलया ही पहाटमहिमा असे ईश्वरी किमया... ©अनिल विद्याधर आठलेकर दिनांक १ डिसेंबर २०१८

एक तरी लफडा करूकच होया !!

झय बगुचा थय लफडा बोलाची नाय सोय काय सरळ चलता तेका हयसर कुत्रोसुद्दा इचारीत नाय आता असा चलाचा नाय, वगी ऱ्हवान जमाचा नाय हेंच्यार एकदा बघूकच होया एक तरी लफडा करूकच होया.. ! सरकारी हाफिसात हिर्यी नोट, नायतर सांज्च्याक दारयेचो घोट इचारुची सोय नाय चल्लाहा काय ? साय्बापेक्षा शिपायाकच घाय आवशीचो घो हेंच्या हे सुध्राचे नाय हेंच्यार एकदा आता बघूकच होया एक तरी लफडा मोठा करूकच होया.. ! गमभन गिरयताना, काय कळना नाय मास्तर बिचारो वगी आसता, कधी बोल्ना नाय मास्तर होवच्यासाठी तेनी झेलले किती कष्ट कोनाक सांगासारा नाय संस्थाच अख्खी भ्रष्ट हफ्त्याक जायत पैशे किती खिशात ऱ्हवता काय शिक्षणसम्राटांका ह्या काय पडलालाच नाय हेंच्यार एकदा आता कायता बघूकच होया एक तरी लफडा मोठा करूकच होया....! आता खराच खूप झाला जेचा तेचा ऐकान, पुरे झाली कवतुका, पुरे झाला भाषान, आता हेच्या बाप्पासचाव काय चलाचा नाय हेंची तंगडी मोडून देवा हेंच्या गळ्यात पाय हेंचे आता भरले दिवस हेंका पोचव्कच होया हेंनी केल्लला हेंका हयसऱ भरूकच होया.. एकदा आता कायता हेंच्यार बघूकच होया, कायतरी लफडा मोठा करूकच होया, एक ...

चूकही तितकीच सुंदर पाहिजे

देखणी शिक्षा तुला जर पाहिजे , चूकही तितकीच सुंदर पाहिजे कारणे आहेत पुष्कळ यायला एकदा बोलावले तर पाहिजे ? पॉश प्रेमाची तुझी वास्तू नको , आपले वाटेलसे घर पाहिजे   ओळ पर्यायी तुझी चालेलही , पण हिची सारी तिला सर पाहिजे   एवढा चिंतेत का पडलास तू ? की तुला याचेच उत्तर पाहिजे ... ~ अनिल वि. आठलेकर

सुनीत (शार्दूलविक्रीडित )

घेई रोज मला कवेत म्हणुनी वाटायचे आपले एकाकीपण दूर होत, फिरुनी, वाटायचे चांगले केव्हाही बसता समोर हसुनी आधार देई मला चाले नित्य असेच गूज अमुचे जाणून मौनातले  मध्यान्ही सरताच खेळ दमुनी येई जसा मी घरी जाई शीण कसा लगेच पळुनी घेताच मांडीवरी येई नीज मला क्षणात इतकी वाटे जणू स्वर्ग तो स्पर्शाने अवघ्या तनूत हळवी वाजायची बासरी जाता दूर जरा कुठे निघुन मी शोधायचो भोवती नेता येत नसे कुठेच तरिही लागायचे सोबती माझ्यामागुनही उरी जपतसे माझ्या स्मृती अंगणी माघारी फिरता असेल पुढती याची असे शाश्वती झाले काय कधी कसे न कळले काही मला नेमके गेले सोडुन दूर झाड मधुनी का एवढे लाडके ...??? ~ अनिल आठलेकर , सिंधुदुर्ग 26 जानेवारी 2017

सरावन महिना आला की

Image
स्वत: हडसनकर यांनी मला पाठवलेली माझी आवडती कविता माझ्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक अशी कवी रविचंद्र हडसनकर यांची "सरावन महिना आला की " ही कविता गेले अनेक महिने शोधूनही ती पूर्ण कविता मला मिळाली नव्हती. नुकतीच मिळाली. या कवितेविषयी माझ्या शब्दांत थोडंसं... "सरावन महिना आला की " ही कविता आम्हाला पाठ्यपुस्तकात होती, कवितेत एक आई आणि आणि तिच्या गरीब कौटुंबिक परिस्थतीचे यथार्थ वर्णन " बाब्या'' या तिच्या मुलाच्या शब्दांत मांडले होते. कवीने यात विशेषत: लेकुरवाळी आई आणि तिच्या हतबलतेचे अतिशय प्रभावीपणे चित्रण केले आहे. या कवितेतील ग्रामीण बाज आणि एकूणच प्रभाव मला अजूनही खुणावत असतो. ''गरिबी हे एक दुष्टचक्र आहे'' असं म्हणतात हे वाक्य पुस्तकात वाचायला निबंधात लिहायला छान वाटतं पण या गरिबीच्या झळा ज्यांना बसल्या आहेत त्यांनाच त्याची तीव्रता समजते. 'सरावन महिना आला की' या कवितेत कवीने अशाच एका गरिब कुटुंबाचं चित्रण केलं आहे. "सरावन महिना आला कि, असाच जीव भंडावून जाते. आभाळ फाटल्यावाणी सांडू लागलं की आपली...

जहर

काळास फुटावी वाचा डोळ्यांत दिसावे सारे वाहती दिशेला कुठल्या हे माणुसकीचे वारे ! स्पर्शात न आहे माया शब्दांत न आहे पाझर हे कुठले झेंडे हाती हे कुठले देती नारे....? प्रश्नांना प्रश्नच पडती उत्तरास नाही वाली आणून ठेवली कोणी पातळी एवढी खाली मुद्दाम मनाच्याभवती घातल्या कोणत्या भिंती? एकांत सोडतो आहे मौनाच्या जहरी पाली... ! ही भिक्षा मागत आली माणसे कुणाच्या दारी वेशात जिथे लोकांच्या बैसलेत क्रूर शिकारी चुकचुकल्या पाली कानी जोरात शिरा तडतडल्या घावावर घाव बरसले अन विझली ज्योत बिचारी निजतील लेकरे तान्ही पाहून वाट एव्हाना स्वप्नात कदाचित काही दिसतील हात हलताना जो गुन्हा न केला त्याची केवढी मिळाली शिक्षा? मिळतील उत्तरे कोठे ..निष्पाप अशा प्रश्नांना..? ~ अनिल वि. आठलेकर मोबाईल -- 9762162942

"कातरवेळ" ( वृत्त:भूपती )

मनडोह डहुळतो व्यथा अनामिक छळते कोठली दिशा कोठले सुकाणू धरते नेहमी चलबिचल होते कातरवेळी का ऊन मुके संध्यासमयी हळहळते ? नेमक्या आणती इथेच पाउलवाटा अंगावर अवघ्या, तिन्हिसांजेचा काटा बेधुंद तरीही गूढ वाटतो वारा काठावर का या खिन्न स्मृतींच्या लाटा ? आतून हाक इतक्यात कुणाची येते हातात स्वतःच्या हात स्वतःचा देते लागते न कोणी सोबत कातरवेळी एकेक अनुभुती पूर्णत्वाला नेते सोसून त्रास प्रत्येक, उजळते आहे तावून-सुलाखुन तेज वाहते आहे जगण्यास लाभते आहे इतकी ऊर्जा, दररोज नवे आयुष्य उमगते आहे... ! ~ अनिल वि. आठलेकर , सिंधुदुर्ग

मराठी भाषा, समज-गैरसमज आणि आपण

आम्ही मराठी भाषाप्रेमी मंडळी दैनंदिन व्यवहारामध्ये नेहमी मराठीचा आग्रह धरतो, सर्वांनी धरायला हवा असेही सांगतो पण याचवेळी काही गोष्टी मात्र मान्यच करायला हव्या आहेत. त्या खाली नमूद करत आहे. आपल्या भाषेत आंग्ल भाषेतील काही शब्द इतके रूळले आहेत की त्यांना पर्यायी शब्द माहित असूनही आपण वापरत नाही आहोत किंबहुना ते शक्य होईल की नाही याबद्दल शंकाच आहे. (इतर भाषेतून प्रथम भाषेत शब्द येण्याची ही शब्दनिर्मितीमधील एक प्रक्रियाच आहे. )   काही उदाहरणे देतो : बॅटरी/टॉर्च, टेबल, बेडरूम इत्यादी.   हे शब्द इंग्रजी भाषेतून आपल्या भाषेत येऊन ठाण मांडून बसले आहेत. मला सांगा आपल्यापैकी कितीजण विजेरी, मेज किंवा शयनकक्ष वगैरे शब्द वापरतो?   हे एक-दोनदा अगदी सजग राहून आपण म्हणूदेखील परंतु इतर मंडळी हेच शब्द इंग्रजी भाषेप्रमाणेच उच्चारतील तेव्हा आपणही परत त्याच मार्गावर परतण्याचीच शक्यता जास्त. केवळ मराठी-मराठी म्हणून कंठशोष करून काहीही होणार नाही तर मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व स्वरूप स्पष्ट करून त्याबद्दल जाणीव जागृत करण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न व्हायला हवेत. सर्व मराठी भाष...

याक ढॉर खय पाठी ऱ्हवता

केला तर सगळा हय जमता, माका खय पण तितक्या कळता ? सणाकसुद्धा तुका बोलयता? झील तुझो हो भारी दिसता माझो कुणगो आसा थंयसर मेर तुझ्या कुणग्याची वळता हांबडतय मी पुन्हा पुन्हा पण याक ढॉर खय पाठी ऱ्हवता चलला ता चललाहा हयसर कुत्रो खाता, आंधळो दळता व्हये कित्या ते सुके गजाली? येळ इली की कोणव नसता टीव्हीवरचे बघुन बातमे चाकरमानी डोळे पुसता तुझीच स्वप्ना पडतत निसती म्हणान ह्या उसरा उज्वाडता ... ~ अनिल विद्याधर आठलेकर चेंदवण ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग मोबाईल -- 9762162942

मालवणी बोलीतील #पहिली सुमंदारमाला वृत्तातील कविता !

 #खेळ तुझे सारखे भास झाले तरी नाय दिस्नंस, कसा सांग जम्ता तुका? तुझी जाग माझ्यात शोधून शोधून किती रोज डोळ्यांत जम्तंत दुका हवा घेव्न येता तुझी बातमी आणि जाता हळू फक्त खेटानशी कळी सोमती गॉड फुल्ता मनाची जरी नाय दिस्ना तशी हेरशी मनाच्याच रस्त्यान जाता कुकारो मनाच्याच रस्त्यात उठ्तंत ठसे तरी सांग माझ्या मनाआतले बातम्ये हे तुका रोज कळ्तंत कसे? तुका एकदा काय वाटेत बघ्लंय नशा फक्त आसा तुझी बाधली तुझ्यासारखी फक्त दिस्ली फुला आणि पांदीत काया तुझी भेटली सकाळी सकाळी तुका भेटताना किती वाटली लाज सांगा कशी तुझो हात हातात होतो त्यवा वीज  आंगार माझ्याच पड्ली जशी तुझा रूप आसा किती देखणा गो, पुरो जीव जाग्यार जाता जसो, नको याद काढू अशी आणखी तू नको खेळ खेळा मनाचो असो ... ~ अनिल विद्याधर आठलेकर चेंदवण ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग मोबाईल -- 9762162942

प्रार्थना ( वृत्त:मंदारमाला )

मोठेपणाचा नसे सोस केंव्हाच दे फक्त तू अर्थ या जीवना अंधार आकंठ आयुष्य व्यापून सन्मार्ग दावी जगज्जीवना मी मूढ निर्बुद्ध मागे धनाच्या न लाभे मना शांतताही जरा कोठे न कोठे डसे मोह माया करी मुक्त या बालका श्रीधरा.... आनंद वाटून घेती सुखाने कुणी दूरचेही सगे सोयरे दु;खात माझ्या न कोणास वाटे कधी 'हायही' जाणिवेने खरे माझेच सारे असे वाटताना न कोणी इथे साथ देई मला अस्पष्ट अंतस्थ कल्लोळ वाढे जसा होत जाई उरी गलबला.... मी शुंभ माझी मती गुंग देवा न केली कधीही तुझी प्रार्थना आलो तुझ्या दर्शना मी तरीही न होती कधी ती मनी भावना विश्वास वाटे तिथे होय धोका मिळेना मना आजही आसरा देवाधिदेवा नुरे कोणता दंभ आतातरी सावरी पामरा.......! ~ अनिल आठलेकर..

सहवास...

रस्त्यामधल्या आम्रतरुने किती पाहिले रुक्ष उन्हाळे जमेत नव्हता हिशोब याचा त्याने जपले फक्त जिव्हाळे  वाटसरुंची सुखदु;खेही कधी न होती परकी त्याला त्यांच्या लेखी छायेखाली जो आला तो अपुला झाला कधी सोसले घाव तनूवर बालचमुंच्या पाहत लीला कधी घेतले जवळ जरासे विश्रांतीस्तव पांथस्थाला कधी प्रियेच्या अन सजणाच्या इथेच मोहरल्या गुजगोष्टी तसा अबोला नित्याचा पण राग अनावर येई ओठी कधी विहंगा इथेच येउन श्रमपरिहारा मिळे आसरा इथेच सुखनिद्रेला गवळी असती सोडून गाई-वासरा सारे येती रिते व्हावया घेउन सल, दु:खाची ओंजळ कुणा न दिसती आम्रतरूच्या कधीच गालावरती ओघळ  सदैव उरतो प्रश्न मनाशी संकटकाळी कुणी न उरते सुखे साहतो ऋतू सहाही तरी कुठेसे शल्य टोचते मनातल्या प्रश्नांना त्याच्या कधी न मिळते साधे उत्तर शिंपडतो स्वप्नांवर आता सहवासाचे केवळ अत्तर.......!!! ~ अनिल वि.आठलेकर. ११/०७/१३

"आठवण..."

उदासवाणी झुळुक भाबडी कातरवेळी हळवी होते, कडेकपाऱ्या तुझ्या मनाच्या चुटकीतच ओलांडुन येते तुझी आठवण तू नसताना सदैव माझ्या सोबत असते मनात वेडी आशा तरिही तुला सभोती शोधत असते तुझी अवस्था अशीच आहे हळूच कोणी सांगत असते कळते नंतर तुझ्या भावना फूलपाखरू मांडत असते अलगद केव्हा सकाळ वेडी आठवणींशी झोंबत असते स्वप्नामधली लुप्त चांदणी पापणकाठी तरळत असते मध्यान्हीचा सूर्य अताशा उगाच थोडा थांबून येतो जाता जाता मला पाहुनी दीर्घ उसासा लांबून देतो वाट हरवते संध्यासमयी तुझ्याच गावी पाउल नेते आठवणीना क्षितिजापाशी तुझी नव्याने चाहुल येते.... ~अनिल आठलेकर..   16/09/2013

"ह.म.बने, तु.म.बने" : कौटुंबिक जिव्हाळ्याची निखळ आनंदयात्रा!

Image
   आजची जीवनशैली इतकी धकाधकीची आणि ताणतणावाची आहे की माणूस सतत कोणत्या ना कोणत्या तरी चिंतेत असतो. विवंचनेत असतो. घरी आल्यावरदेखील हा ताणतणावाचा बोजा   उतरलेला नसतो.व्हाट्स अॅप किंवा फेसबुकवर   जावं तर एकतर त्याच त्याच पांचट विनोदाचा मारा होत असतो नाहीतर एकमेकांवर जातींवरून वा राजकीय पक्षांवरून वैयक्तिक सबंधांत कटुता येईल इथवर विखारी टीका होत असते. या सर्व कंटाळवाण्या दिनचर्येला टाळण्यासाठी स्वाभाविकपणे मोर्चा टीव्हीकडे वळतो. खरं तर तिथेही डेलीसोप्सची रडारड आणि भानगडी यांचा पाऊस पडत असतो तरीही माणूस आशावादी असतो म्हणतात ना.. त्याच आशेच्या जोरावर हातात रिमोट घेऊन चॅनेल्स बदलली जात असतात आणि अचानक आपण एका ठिकाणी येऊन थांबतो. साधारणपणे कोणत्याही मालिकेचा अंदाज अर्ध्या मिनिटात येतो त्यामुळे नावावरून उत्सुकता चाळवली जाऊन दोनचार मिनिटं बघू तरी म्हणून ती मालिका पाहिली जाते आणि खरोखरच त्यामध्ये आपल्याला हवंहवंसं आणि हलकंफुलकं असं वातावरण दिसतं आणि नकळत गालावर उमटलेल स्मितहास्य क्षणार्धात सगळा मूडच बदलून टाकतं. अशी एक टवटवीत , हलकीफुलकी आणि आवर्जून पहावी अशी मालिका आहे...

कलर्ड

आम्ही जन्माला येतो तेव्हा आणि मरतो तेव्हाही असतो केवळ कृष्णवर्णीय तुमचे मात्र बदलत जातात रंग ऋतू-काळ-वेळ-आजारानुसार वेगवेगळे.. आणि तुम्ही आम्हाला म्हणता, "कलर्ड!!!" भाषांतर/अनुवाद : अनिल वि. आठलेकर मूळ फ्रेंच कवी : Léopold Sédar Senghor

पहाटस्पर्श ( वृत्त : श्रवणाभरण )

अलगद चाहुल देत जणू ऋतुराज कसा खुलवी तिजला, तनमन व्यापुन गर्द सभोवर गंध नवा भुलवी तिजला, कणकण हर्षित धुंद प्रफुल्लित मोद भरे प्रिय हा कसला, निरुपम सुंदर मुग्ध मनोहर भास असे तिज हा कसला?? अवचित उत्कट श्वास अशी हलकेच करी कसली किमया विचलित संयम होत जिथे असणेच फसे इतके लिलया अगणित मोह नवीन तरी अलवार नसे इतका कुठला अविचल काळ कवेत जणू निमिषात असे अवघा थिजला सुमधुर कूजन ऐक विलंबित कोकिळ गात असे भवती अनुभव अद्भुत घेत सुखावत वृक्ष लता अजुनी रमती अनुपद शिंपित गंध फुलासम कोण अनावर चालतसे ? पुलकित स्पर्श तुझाच प्रिये भव-सृष्टिस भारुन टाकतसे ... ©अनिल विद्याधर आठलेकर

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

Image
वेड म्हणजे काय ? असा प्रश्न तुम्हाला कुणी विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल ? सगळं काही ठीकठाक चाललेले असताना ते सोडून काहीतरी भन्नाट , वेगळं करण्यासाठी आहे ते सगळं सोडून त्याच्यामागे धावणे... बरोबर ना ? होय , कोणत्याही सामान्य , मध्यमवर्गीय माणसाला हे असंच वाटेल पण वेडाने झपाटून जाणार्‍या असामान्य व्यक्तिमत्वांची गोष्टच वेगळी असते. त्यांना हे वेड सतत खुणावत राहतं आणि जोपर्यंत या वेडाच्या संपूर्ण आहारी जात नाही ना , तोपर्यंत यांना चैनच पडत नाही. अशाच एका अचाट , असामान्य आणि अजरामर वेड्याची अद्भुत कहाणी आपल्यापर्यंत पोहचवणारा चित्रपट म्हणजे   ' आणि .. डॉ. काशिनाथ घाणेकर ! ' ' आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर ' चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून या चित्रपटाबद्दल कमालीचं औत्सुक्य मनात निर्माण झालं होतं. त्यात डॉक्टर घाणेकर यांची मुख्य भुमिका सुबोध भावे करणार आहे हे समजल्यावर तर अधिकच. कारण माझ्या पिढीने घाणेकर चित्रपटाव्यतिरिक्त फारसे पाहिलेले नव्हते पण त्यांच्याबद्दल वडिलांकडून ऐकलं मात्र फार होतं. सुबोध भावे हा खरं तर गुणी अभिनेता पण नेटीझन्सनी त्याच्यावर त...