'मी आणि माझा बाप' पुस्तक रसास्वाद
खाण्याम ध्ये जशी रूचीपालटाची जागा असते त्याचप्रमाणे वाचनातही रुचीपालटाचं वेगळं महत्व आहे. अनेकदा असं होतं की आपण एकाच पठडीतलं वाचत जातो आणि एका क्षणी एक थांबा येतो जिथे आपण खूप वेळ रेंगाळतो. हे रेंगाळणं जाणूनबुजून नसतं तर ती एक अपरिहार्यता असते. अशा वेळीच हा रूचीपालट उत्प्रेरकाची भूमिका बजावतो. काहीवेळा एकच पुस्तक तुम्ही वाचत असता पण त्यातील विषय कदाचित तुम्हाला फार गुंतवून ठेवू न शकल्यामुळे असेल किंवा अतिवर्णनात्मक शैलीमुळे असेल, तुम्हाला रूचीपालटाची गरज भासते किंबहुना असते. अशावेळी एका हलक्याफुलक्या विषयावरील, एखादं अनोख्या शैलीतील पुस्तक हाती आलं तर? मजा येईल नाही ? माझ्या वाचनाचे विषय तसे भाषेच्या अंगाने जाणारे अधिक, त्यामुळे अनेकदा अभ्यासाच्या अंगानेच वाचन होतं, त्यावेळी कंटाळा येत नाही पण केवळ तेवढंच वाचून मन भरत नसल्यानं साहजिकच इतर पुस्तकंही खुणावत असतात. गेले काही दिवस मी रस्कीन बॉन्डचं 'THE ROOM ON THE ROOF' वाचत आहे. पुस्तक छान आहेच पण परवा का कोण जाणे ते पुस्तक सुरू ठेवून दुसरं काहीतरी वाचावं असं वाटलं. माझ्या वैयक्तिक संग्रहातील पुस्तकं चाळताना नेमकं व्यंकटेश माडगू...