प्रार्थना ( वृत्त:मंदारमाला )
मोठेपणाचा नसे सोस केंव्हाच दे फक्त तू अर्थ या जीवना
अंधार आकंठ आयुष्य व्यापून सन्मार्ग दावी जगज्जीवना
मी मूढ निर्बुद्ध मागे धनाच्या न लाभे मना शांतताही जरा
कोठे न कोठे डसे मोह माया करी मुक्त या बालका श्रीधरा....
आनंद वाटून घेती सुखाने कुणी दूरचेही सगे सोयरे
दु;खात माझ्या न कोणास वाटे कधी 'हायही' जाणिवेने खरे
माझेच सारे असे वाटताना न कोणी इथे साथ देई मला
अस्पष्ट अंतस्थ कल्लोळ वाढे जसा होत जाई उरी गलबला....
मी शुंभ माझी मती गुंग देवा न केली कधीही तुझी प्रार्थना
आलो तुझ्या दर्शना मी तरीही न होती कधी ती मनी भावना
विश्वास वाटे तिथे होय धोका मिळेना मना आजही आसरा
देवाधिदेवा नुरे कोणता दंभ आतातरी सावरी पामरा.......!
~ अनिल आठलेकर..
Comments
Post a Comment