मराठी भाषा, समज-गैरसमज आणि आपण
_________________________________ आम्ही मराठी भाषाप्रेमी मंडळी दैनंदिन व्यवहारामध्ये नेहमी मराठीचा आग्रह धरतो, सर्वांनी धरायला हवा असेही सांगतो पण याचवेळी काही गोष्टी मात्र मान्यच करायला हव्यात. त्या खाली नमूद करत आहे. आपल्या भाषेत इतर भाषेतील काही शब्द इतके रूळले आहेत की त्यांना पर्यायी शब्द माहित असूनही आपण वापरत नाही आहोत किंबहुना ते शक्य होईल की नाही याबद्दल शंकाच आहे. (इतर भाषेतून प्रथम भाषेत शब्द येण्याची ही शब्दनिर्मितीमधील एक प्रक्रियाच आहे त्यामुळे हे सहजासहजी रोखता येणे अशक्यच. ) काही उदाहरणे देतो : बॅटरी/टॉर्च, टेबल, बेडरूम इत्यादी. हे शब्द इंग्रजी भाषेतून आपल्या भाषेत येऊन ठाण मांडून बसले आहेत. मला सांगा आपल्यापैकी कितीजण विजेरी, मेज किंवा शयनकक्ष वगैरे शब्द वापरतो? हे एक-दोनदा अगदी सजग राहून आपण म्हणूदेखील परंतु इतर मंडळी हेच शब्द इंग्रजी भाषेप्रमाणेच उच्चारतील तेव्हा आपणही परत त्याच मार्गावर परतण्याचीच शक्यता जास्त. (अर्थात यावर उपाय म्हणजे एक बदल म्हणून ते स्वीकारणे किंवा या शब्दांसाठी सोपे पर्यायी मराठी शब्द रूढ करणे. यावर विचार होऊ शकतो. ) केवळ मराठी-...