पहाटस्पर्श ( वृत्त : श्रवणाभरण )



अलगद चाहुल देत जणू ऋतुराज कसा खुलवी तिजला,
तनमन व्यापुन गर्द सभोवर गंध नवा भुलवी तिजला,
कणकण हर्षित धुंद प्रफुल्लित मोद भरे प्रिय हा कसला,
निरुपम सुंदर मुग्ध मनोहर भास असे तिज हा कसला??

अवचित उत्कट श्वास अशी हलकेच करी कसली किमया
विचलित संयम होत जिथे असणेच फसे इतके लिलया
अगणित मोह नवीन तरी अलवार नसे इतका कुठला
अविचल काळ कवेत जणू निमिषात असे अवघा थिजला

सुमधुर कूजन ऐक विलंबित कोकिळ गात असे भवती
अनुभव अद्भुत घेत सुखावत वृक्ष लता अजुनी रमती
अनुपद शिंपित गंध फुलासम कोण अनावर चालतसे ?
पुलकित स्पर्श तुझाच प्रिये भव-सृष्टिस भारुन टाकतसे ...

©अनिल विद्याधर आठलेकर

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !