सरावन महिना आला की

स्वत: हडसनकर यांनी मला पाठवलेली माझी आवडती कविता

माझ्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक अशी कवी रविचंद्र हडसनकर यांची "सरावन महिना आला की " ही कविता गेले अनेक महिने शोधूनही ती पूर्ण कविता मला मिळाली नव्हती. नुकतीच मिळाली. या कवितेविषयी माझ्या शब्दांत थोडंसं...
"सरावन महिना आला की " ही कविता आम्हाला पाठ्यपुस्तकात होती, कवितेत एक आई आणि आणि तिच्या गरीब कौटुंबिक परिस्थतीचे यथार्थ वर्णन " बाब्या'' या तिच्या मुलाच्या शब्दांत मांडले होते. कवीने यात विशेषत: लेकुरवाळी आई आणि तिच्या हतबलतेचे अतिशय प्रभावीपणे चित्रण केले आहे. या कवितेतील ग्रामीण बाज आणि एकूणच प्रभाव मला अजूनही खुणावत असतो.
''गरिबी हे एक दुष्टचक्र आहे'' असं म्हणतात हे वाक्य पुस्तकात वाचायला निबंधात लिहायला छान वाटतं पण या गरिबीच्या झळा ज्यांना बसल्या आहेत त्यांनाच त्याची तीव्रता समजते. 'सरावन महिना आला की' या कवितेत कवीने अशाच एका गरिब कुटुंबाचं चित्रण केलं आहे.
"सरावन महिना आला कि,
असाच जीव भंडावून जाते.
आभाळ फाटल्यावाणी सांडू लागलं की
आपली झोपडी पुळु पुळु लडू लागते..."
या ओळींनी कवितेची सुरुवात होते. श्रावण महिना म्हटल्यावर आपल्यासमोर किती सुंदर सुंदर चित्रं उभी ठाकतात. बालपणापासून मनावर कोरलेल्या 'श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे...'' या ओळी आपोआपच आपल्या ओठावर येतात आणि उन्हाशी पाठशिवणीचा खेळ खेळणाऱ्या खट्याळ पावसाच्या सरी आपल्यासमोर दिसू लागतात. पण या कवितेच्या सुरुवातीलाच श्रावणाचं वेगळंच रूप आपल्याला दिसतं. श्रावण महिना कितीही सुंदर असला तरी या कवितेतल्या कुटुंबासाठी मात्र त्यासोबत येणाऱ्या मुसळधार पावसाने मात्र त्यांचा ' जीव भंडावून जाते..' कशीबशी बांधलेली झोपडी ठिकठिकाणी गळू लागते. झोपडीच्या गळण्याला "पुळू पुळू रडू लागते " असं इथे म्हटलेलं आहे. ही कविता म्हणजे बाब्या या मुलाने सांगितलेली एकप्रकारे कैफियतच आहे. इवल्याश्या त्या जीवासाठी झोपडीचं गळणं हे आभाळ फाटण्यासारखंच आहे.

पुढे बाब्या म्हणतो,
" आपली माय मंजे केळीचा गाभा
पर घरात डझनभर केळीची फनी गोधड्यावर आडवी तिडवी घोरत पडते... "
अहाहा, काय सुंदर उपमा दिली आहे आईला! ''केळीचा गाभा'' आणि तिच्या लेकरांना म्हणजेच घोरत पडलेल्या आपल्या भावंडाना ''डझनभर केळीची फनी'' म्हणतो बाब्या. गरीब असो की श्रीमंत, आई ही आई असते, तिच्यातील वात्सल्याला कधीच ओहोटी लागत नाही आणि डझनभर मुलं असूनही आई ची माया कमी झालेली नाही हेच या उपमेतून दिसते. नंतर बाब्या झोपडी गळू लागल्यावर होणाऱ्या धावपळीचं वर्णन करतो ,
" त्यातच माय बोंबलते-
"आरं बाब्या झोपु नको तिकडं चुलीवर भगोन ठेव"
तरी झोपडी लडु लागते. टप.. टप..
पुन्हा माय वरडते-
"आरं बाब्या उतरंडीजवळ परात ठेव"
तरी झोपडी लडू लागते टप.. टप.. टप..
मंग माय एकदम आडर सोडते-
"जात्याजवळ थाळ्या ठेव,
भानोसाजवळ डेचकी ठेव,
उखळाजवळ तांब्या ठेव,
आड्याखाली बट्टू ठेव,
धारनाच्या कोंट्यात पव्हऱ्या ठेव
दिव्याच्या देवळीकड काथोट ठेव,
इकडं तिकडं सम्दे बासनं सरतात
तरिय झोपडी लडूच लागते टप... टप... टप... "
गरीब लोकांकडे असून असून काय असणार पर्याय यावर? घरातली असलेली नसलेली सगळी भांडी गळत असलेल्या ठिकाणी ठेवायला बाब्याला सांगते आई. इथे अनेक ग्रामीण शब्द आपल्याला कळतात, घरातली एकेक भांडी बाब्या सगळीकडे ठेवतो तरी झोपडी काही रडायची थांबत नाही. ही कविता जरी वैदर्भीय भाषेतील असली तरी हे चित्र सगळीकडे सारखंच दिसतं. मी स्वतः कोकणातील असून मुसळधार पाऊस आल्यावर कौलारू घरांतून कशी धार लागते याचा अनुभव स्वतः घेतलेला आहे. बाब्याची तर साधी झोपडी आहे तिचे काय आणि कसे हाल झाले असतील !
कितीही सहनशील असलो तरी एका मर्यादेनंतर तिचा अंत होतोच तसाच बाब्याच्या आईचाही झाला बाब्या म्हणतो,
"मंग मायच्या तोंडून इस्तो पडतो..."
खूप परिणामकारक आणि प्रत्ययकारी उपमा आहे ही. या इस्तवाची झळ बाब्यापेक्षा कोण अधिक सांगू शकतो?
शेवटी धावपळ करून करून बाब्या थकतो आणि आईच्या रागाचा पारा जरा ओसरता ओसरता त्याला डुलकी लागते दारिद्र्याच्या त्या ऐन धुमश्चक्रीतही लागलेल्या क्षणभर डुलकीत बाब्याला पोटभर जेवल्याचं स्वप्न पडतं. किती छोट्या छोट्या इच्छा असतात माणसाच्या? अर्धपोटी कित्येक दिवस काढलेल्या माणसाला पोटभर जेवण मिळणे म्हणजे सुखच नाही का?
बाब्या पुढं म्हणतो,
"पुन्हा एक ठोक जोरात येते झोपडी आपली मह्या अंगावरच लडू लागते. आन म्या डोळं उघडताच,
पोटभर जेवल्याचं सपन मात्र गाभडून जाते...."
आह.... !! 'गरिबी एक दुष्टचक्र आहे' हे वाक्य परत डोळ्यासमोर नाचू लागतं आणि यावेळी डोळ्यात पाणी तरळत राहिल्याशिवाय राहत नाही. वास्तवात पोटभर जेवायला मिळण्याची शक्यता दुरापास्तच असताना स्वप्नातदेखील पोटभर जेवू न देणाऱ्या दारिद्र्याच्या पावसाची तरीही हौस पुरु होत नाही आणि झोपडीचं रडणं काही थांबत नाही. सगळी भांडी ठेवून संपल्यामुळे ती यावेळी बाब्याच्या अंगावरच रडू लागते आणि बाब्याचं पोटभर जेवण्याचं स्वप्न पुन्हा एकदा स्वप्नातही अपूर्णच राहतं....
ही कविता ज्या वयात वाचली ते वय बहुधा बाब्याएवढंच असावं तेव्हाही ती आवडली होती आजही आवडते. या कवितेत हडसनकरांनी पावसाळ्याचं उदाहरण घेऊन ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांच्या हाल अपेष्टांचे प्रातिनिधिक वर्णनच केले आहे. झोपडीच्या गळण्याला "पुळू पुळू रडू लागते " म्हणणे, लेकुरवाळ्या आईला "केळीचा गाभा " म्हणणे या आणि अशा वर्णनाने अक्षरश : ह्र्दय द्रवून जातं. झोपडी गळताना त्याखाली भांडी ठेवण्यासाठी आईने बाब्याला सांगितल्यावर त्यांची चाललेली लगबग तसेच यातून घरातील असलेल्या नसलेल्या भांड्यांची स्थिती सगळ डोळ्यासमोर उभी केली अक्षरश : कवीने. " काथोटा, भगोन, डेचकी, बट्टू, पव्हऱ्या" असे भांड्यासाठी योजलेले खास गावरान शब्द कवितेला चित्रदर्शी करतात. कविता एका असहाय्य गरीब आईची आणि तिच्या कर्त्या लेकरामधील संवादातून तसेच बाब्याच्या निरागस वर्णनातून सरावन महिन्यात होत असलेल्या दैन्याचे चित्र यशस्वीपणे आपल्यासमोर उभे करते.
( खूप काही लिहायचे असूनही लिहिता आले नसेलही परंतु एक प्रयत्न नक्कीच केलेला आहे मला समजलेल्या आणि कळलेल्या आशयाला माझ्या शब्दात मांडण्याचा. अनेक ठिकाणी शोधूनही न सापडलेली ही कविता उपलब्ध करून दिल्याबद्दल सोनमचे मनापासून आभार...)

~ अनिल आठलेकर, सिंधुदुर्ग

Comments

  1. खूप दिवस शोधत होतो ही कविता!
    धन्यवाद!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  2. 👌आजच 2005 च्या विद्यार्थ्याचा फोन आला.त्याने या कवितेची आठवण जागी केली.ग्रामीण भागातील सामान्य परिस्थितीतील मुले या कवितेतील मुलाच्या भावविश्वाशी समरस होत असत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !