मराठी भाषा, समज-गैरसमज आणि आपण

आम्ही मराठी भाषाप्रेमी मंडळी दैनंदिन व्यवहारामध्ये नेहमी मराठीचा आग्रह धरतो, सर्वांनी धरायला हवा असेही सांगतो पण याचवेळी काही गोष्टी मात्र मान्यच करायला हव्या आहेत. त्या खाली नमूद करत आहे.
आपल्या भाषेत आंग्ल भाषेतील काही शब्द इतके रूळले आहेत की त्यांना पर्यायी शब्द माहित असूनही आपण वापरत नाही आहोत किंबहुना ते शक्य होईल की नाही याबद्दल शंकाच आहे. (इतर भाषेतून प्रथम भाषेत शब्द येण्याची ही शब्दनिर्मितीमधील एक प्रक्रियाच आहे. )
 
काही उदाहरणे देतो :
बॅटरी/टॉर्च, टेबल, बेडरूम इत्यादी.
 
हे शब्द इंग्रजी भाषेतून आपल्या भाषेत येऊन ठाण मांडून बसले आहेत. मला सांगा आपल्यापैकी कितीजण विजेरी, मेज किंवा शयनकक्ष वगैरे शब्द वापरतो?
 
हे एक-दोनदा अगदी सजग राहून आपण म्हणूदेखील परंतु इतर मंडळी हेच शब्द इंग्रजी भाषेप्रमाणेच उच्चारतील तेव्हा आपणही परत त्याच मार्गावर परतण्याचीच शक्यता जास्त. केवळ मराठी-मराठी म्हणून कंठशोष करून काहीही होणार नाही तर मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व स्वरूप स्पष्ट करून त्याबद्दल जाणीव जागृत करण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न व्हायला हवेत. सर्व मराठी भाषिकांना मराठी भाषा शुद्ध बोलता यायला हवी, अशी अपेक्षा तरी प्रत्येकाच्या मनात हवी. कुणीतरी लादली म्हणून नव्हे तर आपली भाषा म्हणून आणि हे करत असताना कुठल्याही इतर भाषेचा अवमान होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी.
 
   मराठी भाषा आणि तिच्या वापराबद्दल माझी आग्रही भूमिका नेहमीच मी माझ्या येथील लेखांद्वारे मांडतच असतो. निदान साहित्यिकांनातरी याचे भान असायला हवे असे मला वाटते पण या मुद्द्यावरून काही वादही होत असतात त्यामागे काही गैरसमजही आहेत. प्रमाण भाषा श्रेष्ठ की बोली अशी तुलना करण्याचा मूर्खपणा अनेकदा काही व्यक्तींकडून केला जातो आणि त्यावेळी प्रमाण भाषा ही अमुक तमुक समाजाची मक्तेदारी वगैरे आहे अशा प्रकारची तथ्यहीन विधाने केली जातात. एखादे व्यक्तीचित्रण असल्यास वा कुणा पात्राच्या तोंडचे संभाषण वगैरे असल्यास ठीक परंतु इतरवेळी भाषिक सरमिसळ करू नये असे मला वाटते. बोलीत तर बोलीत आणि प्रमाण भाषेत तर प्रमाण भाषेत लिहावे/बोलावे, त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ काहीही नाही. मी स्वतः मालवणी बोली बोलणारा माणूस आहे, मालवणीत लिहितोदेखील परंतु मराठीत मालवणीची सरमिसळ करत नाही, कारण प्रत्येक भाषेचा स्वतंत्र बाज असतो, एक अंगभूत सौंदर्य असते. त्यामुळे भाषा वापरतेवेळी या बाबींचा विचार होणेदेखील फार गरजेचे आहे. 
 
भाषा आणि तिच्याबाबत असणारे गैरसमज याविषयी नुकतीच सकाळमध्ये एक अतिशय बोलकी बातमी वाचण्यात आली, त्यातील हे विधान लक्षपूर्वक वाचा :
 
" उर्दू भाषा ही मुसलमानांची भाषा नसून भाषा कधीही कुठल्या जाती-धर्माची नसते''
~ डॉ. पठाण, माजी कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ. 
 
या विधानाचा संबंध केवळ उर्दूशीच नसून सर्वच भाषांशी आहे असे मला वाटते. भाषा ही भाषा असते, तिला जात-धर्म-पंथ वगैरे कोणतीही चौकट नसते, नसावी. ( मराठी प्रमाणभाषा ही ब्राह्मणांची भाषा आहे हाही या गैरसमजांपैकीच एक ) शुद्ध बोलता येणे ही व्यक्तिमत्व विकासासाठीही अतिशय पूरक बाब आहे. फक्त तिचे महत्व, स्वरूप व व्याप्ती समजून घेतली पाहिजे. मराठी आपली मातृभाषा असून तिला मानाचे स्थान मिळायलाच हवे, तिचा आदर सर्वत्र व्हायलाच हवा यासाठी सर्वप्रथम आपण मराठी भाषिकांनी तरी सजग असणे गरजेचे आहे आणि आपल्याच मराठी भाषेसाठी "मराठी भाषा संवर्धन " सप्ताह वगैरे राबवण्याची आवश्यकता भविष्यात भासू नये इतकीच प्रामाणिक अपेक्षा....!
 
@ अनिल वि. आठलेकर

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !