"आठवण..."
उदासवाणी झुळुक भाबडी
कातरवेळी हळवी होते,
कडेकपाऱ्या तुझ्या मनाच्या
चुटकीतच ओलांडुन येते
तुझी आठवण तू नसताना
सदैव माझ्या सोबत असते
मनात वेडी आशा तरिही
तुला सभोती शोधत असते
तुझी अवस्था अशीच आहे
हळूच कोणी सांगत असते
कळते नंतर तुझ्या भावना
फूलपाखरू मांडत असते
अलगद केव्हा सकाळ वेडी
आठवणींशी झोंबत असते
स्वप्नामधली लुप्त चांदणी
पापणकाठी तरळत असते
मध्यान्हीचा सूर्य अताशा
उगाच थोडा थांबून येतो
जाता जाता मला पाहुनी
दीर्घ उसासा लांबून देतो
वाट हरवते संध्यासमयी
तुझ्याच गावी पाउल नेते
आठवणीना क्षितिजापाशी
तुझी नव्याने चाहुल येते....
~अनिल आठलेकर..
16/09/2013
Comments
Post a Comment