मराठीच्या बोली आणि बोलीभाषांमधील विविधता
“चाय मांड वं...” “चहा ठेव गं...” “च्याय कर गो..." भाषा कोणतीही असो, प्रदेश कोणताही असो, घराघरात ऐकू येणारा हा हवाहवासा संवाद. कुणी मांड म्हणेल, कुणी टाक म्हणेल कुणी ठेव म्हणेल तर कुणी कर म्हणेल पण चहा होईल म्हणजे होईलच. चहा..! दोन अक्षरात किती जादू आहे! नाव घेतलं तरी तरतरी येते. सामान्य शेतकर्याचपासून ते अगदी राजकारण्यांपर्यंत, गरिबातल्या गरिबापासून ते अगदी गर्भश्रीमंत माणसापर्यंत सर्वांच्या घरी तितक्याच आवडीने आणि सहजतेने वावरणारा घटक म्हणजे चहा. शब्द वेगवेगळे असतील पण भावना मात्र तीच, किंबहुना अनुभवही तोच. हीच भाषेची गंमत आहे. भाषा हे माणसाला मिळालेलं वरदानच आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. सर्व सजीवांमध्ये फक्त माणूसच भाषा बोलू शकतो, आपल्या भावना भाषेद्वारे व्यक्त करू शकतो. ही भाषा कशी निर्माण झाली याबाबत मात्र निश्चित अशी माहिती नाही. अभ्यासकांनी अनेक तर्क मांडले आहेत. ईश्वराने निर्माण केली, राजाने केली, निसर्गाकडून माणूस शिकला वगैरे वगैरे. यापैकी कोणत्याच तर्काने मात्र, भाषेची निर्मिती पुरेशा प्रमाणात स्पष्ट करू शकत नाहीत. आपल्या गरजा आणि आवश्यकता यांना अधिक प्रभावीपणे व्यक्त...