जहर


काळास फुटावी वाचा डोळ्यांत दिसावे सारे
वाहती दिशेला कुठल्या हे माणुसकीचे वारे !
स्पर्शात न आहे माया शब्दांत न आहे पाझर
हे कुठले झेंडे हाती हे कुठले देती नारे....?


प्रश्नांना प्रश्नच पडती उत्तरास नाही वाली
आणून ठेवली कोणी पातळी एवढी खाली
मुद्दाम मनाच्याभवती घातल्या कोणत्या भिंती?
एकांत सोडतो आहे मौनाच्या जहरी पाली... !

ही भिक्षा मागत आली माणसे कुणाच्या दारी
वेशात जिथे लोकांच्या बैसलेत क्रूर शिकारी
चुकचुकल्या पाली कानी जोरात शिरा तडतडल्या
घावावर घाव बरसले अन विझली ज्योत बिचारी

निजतील लेकरे तान्ही पाहून वाट एव्हाना
स्वप्नात कदाचित काही दिसतील हात हलताना
जो गुन्हा न केला त्याची केवढी मिळाली शिक्षा?
मिळतील उत्तरे कोठे ..निष्पाप अशा प्रश्नांना..?

~ अनिल वि. आठलेकर
मोबाईल -- 9762162942

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !