हमारा बंडू दहावी में ही है !
“ ओ भैय्या , जरा आगे उस चिंचे के झाड के पास छोडोना! ऐसा क्या करता है ? ” शेवंताआज्जी जोरजोरात बोलत होत्या. “सोडतो आज्जी , नका काळजी करू !” रिक्षावाले काका अस्खलित मराठीत म्हणाले. “ अरे भैय्या! तुमकू मराठी आती है क्या ? ” यावर मात्र ते काका हसले आणि म्हणाले , “ अहो आज्जी , माझं नाव रघुनाथ! रघुनाथ वाघमारे! मी मराठी आहे तर मराठी बोलणारच ना ? ” दोन हातातल्या भाज्यांच्या पिशव्या सावरत आज्जी खाली उतरल्या आणि म्हणाल्या , “ अहो , इथं जो तो हिंदीतच बोलतो . मला बापडीला कळायचं कसं कोण मराठी , कोण हिंदी ? मराठीत बोललेलं समजलं नाही म्हणून , अर्ध्यावरच उतरवून गेलात तर ?” शेवटचं वाक्य बोलेपर्यंत आज्जी सोसायटीच्या गेटपर्यंत पोहचल्या होत्या. तिच्यासोबत आलेला छोटा राजू हे सगळं ऐकत होता. आज्जी घरात शिरल्या शिरल्या त्याने आज्जीला विचारलं , “आज्जी , त्या काकांशी बोलताना तुझी टंग फिसलली होती का ?” आज्जीच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. “अरे टंग काय ? फिसलली काय ? आपण मराठी आहोत ना ? मग मराठीत बोल की!” त्याचं तरी कुठे चुकलं होतं ? त...