सहवास...
रस्त्यामधल्या आम्रतरुने किती पाहिले रुक्ष उन्हाळे
जमेत नव्हता हिशोब याचा त्याने जपले फक्त जिव्हाळे
वाटसरुंची सुखदु;खेही कधी न होती परकी त्याला
त्यांच्या लेखी छायेखाली जो आला तो अपुला झाला
त्यांच्या लेखी छायेखाली जो आला तो अपुला झाला
कधी सोसले घाव तनूवर बालचमुंच्या पाहत लीला
कधी घेतले जवळ जरासे विश्रांतीस्तव पांथस्थाला
कधी प्रियेच्या अन सजणाच्या इथेच मोहरल्या गुजगोष्टी
तसा अबोला नित्याचा पण राग अनावर येई ओठी
कधी विहंगा इथेच येउन श्रमपरिहारा मिळे आसरा
इथेच सुखनिद्रेला गवळी असती सोडून गाई-वासरा
सारे येती रिते व्हावया घेउन सल, दु:खाची ओंजळ
कुणा न दिसती आम्रतरूच्या कधीच गालावरती ओघळ
सदैव उरतो प्रश्न मनाशी संकटकाळी कुणी न उरते
सुखे साहतो ऋतू सहाही तरी कुठेसे शल्य टोचते
मनातल्या प्रश्नांना त्याच्या कधी न मिळते साधे उत्तर
शिंपडतो स्वप्नांवर आता सहवासाचे केवळ अत्तर.......!!!
~ अनिल वि.आठलेकर. ११/०७/१३
Comments
Post a Comment