अहमदाबादमध्ये भीमपराक्रम!
#आठलेकरी
----------------
गावाकडे एक म्हण आहे,
'रोज रोज काय दिवाळी नसते!'
या म्हणीमागे जो काही अर्थ असेल, तो खराही असेल, पण मेहनत आणि चिकाटी जर तुमच्या अंगी असेल तर ही दिवाळी नक्कीच तुमच्यासाठी रोज-रोजही यायला तयार होईल एवढं नक्की! हे आज खरं करून दाखवलं भारतीय क्रिकेट संघाने!
मागील टी20 विश्वचषक विजेता म्हणजेच गतविजेता भारत आपल्या घरच्या मैदानावर सलग वर्ल्डकप जिंकेल का ? इतिहासात आतापर्यंत तरी असं घडलेलं नाही,ऐनवेळी पुन्हा न्यूझीलंड घास हिरावून नेणार नाही ना, भारत 'इतिहास घडवेल का?' असे अनेक प्रश्न जवळजवळ प्रत्येक क्रिकेटप्रेमी स्वत:लाच प्रश्न विचारत होता! जागतिक क्रमवारीत नंबर 1ला असणारे बोलर-बॅटर दोन्ही भारताचे... जगातला सर्वोत्तम वेगवान गोलंदाज भारताकडे, दणदणीत अशी फलंदाजी फळी अशी सगळी तगडी टीम असली तरी T20 मॅच म्हणजे दोरीवर चालण्यासारखं असतं, जरा चूक झाली जरा तोल गेला की संपलं सगळं! भारताच्या संघानं मात्र यावेळी चंग बांधला होता! एकाचा तोल गेला तर दुसरा सावरत होता आणि पडण्याची वेळच येत नव्हती.एखादा अपवाद वगळता भारत राजासारखा खेळला.
सर्वच मॅच उत्तम झाल्या आणि आज त्यावर पट्टा-भिषेक झाला! पूर्ण मालिकेत फॉर्म नसणार्या अभिषेकने आज तलवार चालवली, तलवार कसली दांडपट्टाच चालवला! मोक्याच्या क्षणी, मोठ्या सामन्यात फॉर्म गवसण्याहून आणखी आनंददायी काय असू शकेल? अगदी जिवा महालाप्रमाणे जणू त्याने गनिम कापून काढला! आतापर्यंतची सर्वोत्तम सलामी भागीदारी भारताला फायनलमध्ये मिळाली! संजू तर हेलमेटच्या आत डोक्यावर बर्फ ठेवून येत असल्यासारखा खेळत होता! सलग तीन सामन्यात नेत्रदीपक कामगिरी करणं अन्यथा सोपं नाही! त्याचा पूर्ण भूतकाळ या यशाने नक्कीच उजळून निघेल. संजू जर त्या दिवशी 97 धावांची खेळी खेळला नसता तर भारत फायनलला पोहचला नसता ! त्याला 'मालिकावीर' म्हणूनं गौरवणं अगदी अचूक ! संजूसाठी फार फार आनंद झाला, त्याचं आज तरी शतक व्हायला हवं होतं, असं मात्र पुन्हा पुन्हा वाटत राहिलं.
ईशान किशन धावांचा भुकेला आहे. कुंभकर्ण सहा महिने झोपायचा आणि उठला की मग खात सुटायचा म्हणे! ईशान किशनला संघाबाहेर राहावं लागल्याचं दु:ख इतकं आहे की आता त्याच्या वादळात समोरच्या बोलर्सचा पालापाचोळा उडून जाऊ लागला आहे. कुंभकर्णाप्रमाणे तो 'बॅकलॉग' भरून काढतोय आणि त्याचा बॅकलॉग खूप मोठा आहे, त्यामुळे गोलंदाजांची काही धडगत नाहीये एवढं खरं! आज तर वेड्याने कमाल केली, बॅटिंग तर केलीच पण गेल्या मॅचमध्ये जे अक्षरने केलं ते या मॅचमध्ये ईशानने केलं. काय कॅचेस पकडल्यात ... वा ! तो छोटा पॅकेट नाही, खरोखरच भलामोठा बॉम्ब आहे ! अक्षरने घरच्या मैदानावर 'सरस' कामगिरी पुन्हा एकदा केली! त्याचं कौतुक करावं तितकं कमीच! मुलासमोर खेळण्याचा आणि उत्तम कामगिरी करण्याचा त्याचा मानस त्याने सत्यात उतरवला ही आणखी उल्लेखनीय बाब ! मोक्याच्या क्षणी त्याने घेतलेल्या विकेट्स कलाटणी देणाऱ्या होत्या.
द बूमरा मिसाईल !
________________
खरं तर बूमरा या विषयावर लिहावं तितकं कमीच ! तो म्हणजे जादूचा दिवा
घासल्यावर येणारा जीन आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्याने आपलं नाणं किती खणखणीत आहे ते पुन्हा पुन्हा वाजवून केवळ दाखवलंच नाही तर समोरच्याला पळताभुई थोडी होईल अशी कामगिरी केली! तो आपल्याकडे आहे, ही आपल्यासाठी जमेची नाही तर भाग्याची गोष्ट आहे! सेमी फायनलमधली त्याची बोलिंग असो की आजची... 200+ च्या पाठलागात, 4 षटकांत कंजूष असल्यासारख्या धावा देणे म्हणजे कहर ! आज तर 4 षटकांत 3.80 च्या इकॉनमीने फक्त 15 धावा दिल्यात आणि वर 4 गडी तंबूत पाठवलेत तेही साभार ! घरच्या मैदानावर पाहुण्यांना असं कोणी 'ट्रीट' करतं का बूमरा भाऊ ? तिकडे आखातात युद्ध सुरू आहे, मोठमोठी मिसाइल्स सोडली जात आहेत... त्यामुळे जगाचं नुकसान होत आहे, इकडे बूमरा नावाच्या या भारतीय मिसाईलमुळे क्रिकेटविश्वाचा मात्र नक्कीच फायदा होत आहे! बूमरा भारताचा असला तरी त्याच्यावर पूर्ण जगातील क्रिकेटप्रेमी फिदा आहेत हे एकदा सोशल मीडियावरील कमेंट्स, पोस्ट बघितल्या तरी लक्षात येईल!
सूर्योदय
______
या विजयाने थोर क्रिकेटपटू कर्णधार कपिलदेव, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान सूर्यकुमार यादव याला मिळवला आहे! सूर्याने कप्तान म्हणून काही महत्त्वाचे निर्णय तर घेतलेच, पण त्याबरोबरच अभिषेक शर्मा असो किंवा वरूण चक्रवर्ती असो, या खेळाडूंना विश्वासात घेऊन त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहिला, तुम्हीच माझे शिलेदार आहात हा विश्वास त्यांना दिला, त्याचं फलित फायनलमध्ये दिसलंच. त्यामुळे कप्तान म्हणून भारतीय T20 क्रिकेटसाठी विश्वचषकात सूर्योदय झाला असं म्हणायला हरकत नाही. ''कप्तान म्हणण्यापेक्षा लीडर म्हटलेलं मला जास्त आवडतं,'' असं एकदा सूर्या म्हणाला होता, मला वाटतं याच विचारसरणीत फार मोठं गमक आहे. इथून पुढेही त्याने लीडर म्हणून भारताला विजयी करत रहावं हीच सदिच्छा!
सांघिक कामगिरी
_________________
खरं तर हा विजय टीमचा आहे. प्रत्येकाने योगदान दिलं आहे. मग तो प्रत्येकवेळी गगनचुंबी षटकार मारत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणारा शिवम दुबे असो, धडाकेबाज तिलक वर्मा असो, फटकेबाज रिंकू सिंग असो, बोलिंग स्टार अर्शदीप सिंग असो, ऑलराऊंडर हार्दिक पांड्या असो की संघाचे स्वत: चालक-मालक, कर्णधार सूर्यकुमार यादव असोत ... भारतीय संघाने मिळवलेला हा विजय संस्मरणीय आहे! तो या सर्व खेळाडूंनी केला आहे, त्यांच्यातील एकजुटीने, सुसंवादाने आणि सहकार्यपूर्ण कामगिरीने केला आहे!
गेल्यावेळी हुलकावणी दिली असली तरी यावेळी मात्र आपण अहमदाबाद लुटलं आहे, तेही व्याजासहित...!
जुन्या जखमांवर खपली ! बदला पूर्ण!
___________________________________
आज भारताने 255 धावा काढल्या तेव्हा थोडा वेळ इंग्लंडविरुद्धच्या सामन्याचीही आठवण झाली, खोटं का बोला ... झाली तर झाली .... पण यावेळी भारताने न्यूझीलंडला डोकं वर काढूच दिलं नाही. न्यूझीलंडने आपल्याला फार जखमा दिल्या आहेत, त्या जखमा अगदी आज संध्याकाळपर्यंत भळभळत होत्या, आता मात्र त्यावर खपली धरू लागली आहे! दाह शांत झाला आहे. एवढंचं नाही तर तब्बल वर्ल्डकप फायनलच्या सामन्यातच 96 धावांनी पराभव करून त्याचा वचपाच काढलेला आहे! भारताने 'अक्षरशः' दादागिरी केली अहमदाबादमध्ये यावेळी! पार पाचोळा करून टाकला किवींचा! जणू एकतर्फी विजयच! हिशोब बरोबर झाला, 'फिट्टमफाट' झाली... आता कुठे दिल गार्डन गार्डन झालं आहे!
भारताने बरेच विक्रम केलेत, बरेच मोडलेत... महत्त्वाचं म्हणजे अनेक लोकांची तोंडंही फोडलीत ! ते जास्त महत्त्वाचं! त्यात सोन्याहून पिवळं म्हणजे हा कप जिंकताना आद्यवर्ल्डकप विजेते माजी कर्णधार श्री श्री श्री महेंद्रसिंग धोनीजी स्टेडीयममध्ये उपस्थित होते आणि त्याचबरोबर गतविजेता रोहित शर्माही होता... सोनं फारच पिवळं करायचं तर कपिल देवही दिसले स्टेडीयममध्ये ! या सर्वांच्या समोर असा विजय मिळवणं म्हणजे एकप्रकारे आपल्या सिनियर्सना गुरुदक्षिणाच
दिल्यासारखं आहे!
सलग दुसऱ्यावेळी t20 वर्ल्डकप जिंकणं हा भीमपराक्रमच आहे. आतापर्यंत सलग 2 वेळा कुणीही t20 वर्ल्डकप जिंकलेला नाही. एकूण 3 वेळा आपण वर्ल्डकप जिंकलोय हाही एक विक्रम आहे. भारतीय संघाचा हा भीमपराक्रम म्हणूनच उल्लेखनीय आहे!
एक लाखांहुन अधिक क्षमता असलेल्या आणि खचाखच बहरलेल्या नरेंद्र मोदी स्टेडीयममधील लोकांसमोर हा विजय नक्कीच आणखी गोड झाला आहे! आणि हो, प्रशिक्षक गौतम गंभीरने आता मनमोकळं हसायला हरकत नाही असं कुणीतरी त्याला सांगाल तर बरं होईल!
भारताची कामगिरी अशीच दणदणीत होत राहो ... दरवेळी नवीन कोणीतरी 'मोहम्मद अमीर' बरळत राहीलच ... आणि दरवेळी पुन्हा तो तोंडावर आपटत राहीलच... कारण,
' हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार! '
हत्तीने आपलं काम करत राहावं, बाकीचे काम करण्यास सोशल मीडियावरील फॅन्स समर्थ आहेत!
विश्वचषकविजेत्या भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन !!!
जय हो !! जय हिंद!
~ अनिल विद्याधर आठलेकर
मोबाइल - 9762162942

Comments
Post a Comment