साधेपणाचा कळस !

 

                           

 

      रविवारची प्रसन्न सकाळ. नाकावरून खाली घसरणारा जाड ठसठशीत काळ्या फ्रेमचा चष्मा आपल्या विशिष्ट पद्धतीने वर सरकवत वसंतराव हॉलमधील सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत आहेत. वर्तमानपत्रातील एखादी खुसखुशीत बातमी वाचतानाच आवडीच्या चहाचा घोट घेणार इतक्यात धड मिशीही न फुटलेला विशीतला त्यांचा नातू हेडफोन लावून ओरडतच बाहेर येतो ..  

आज ब्ल्यू है पानी पानी पानी पानी पानी

और दिन है सनी सनी सनी सनी सनी ssssssssss!!!”

 

“अरे काय हे ध्यान ?? काय झालंय काय आजच्या पिढीला ?”

यो!कमऑन आजोबा ! आजची स्टाईल आहे ही ! ब्रॅंड..ब्रॅंड म्हणतात याला ! तुम्हाला नाही कळणार! टाइम हॅज चेंज्ड !” नातवाची मुक्ताफळे.

“कपाळाची स्टाईल! मेल्यांनो, जटा काय वाढवताय, पॅंट्स काय फाडताय, गाड्या काय उडवताय..”

आजोबा आणि नातू यांच्यात चांगलंच परंपरानाट्य रंगत होतं.

“आजोबा, यालाच स्टेट्स सिंबॉल म्हणतात आजकाल ! हेच चालतं सध्या सगळीकडे. ”

इतकावेळ आजोबा आणि नातू यांच्यात चाललेला संवाद दुरून पाहणार्‍या वासंतीबाई हळूच खाकरल्या.

आजोबांनी आजीकडे पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की अगदीच फॅशनेबल नसली तरी आजीदेखील साडी नव्या वळणाचीच नेसली होती. का कोण जाणे आजोबा आज घर प्रथमच पाहत असल्यासारखे सगळीकडे नजर फिरवत होते आणि त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलतही होते. एकूणएक वस्तू त्यांना आता चैनीच्या वाटू लागल्या. त्यांना जुने दिवस आठवले. विवेकानंदांची शिकवण आठवली. समर्थांची वचनं आठवली.

“छे , छे, छे ..हे काही खरं नाही ! आपण साधी माणसं. साधेपणा हेच आपलं तत्व. साधेपणा हीच आपली परंपरा. ती सोडून हा डामडौल, दिमाख, झगमगाट..?”

मनातल्या मनात असा विचार करत वसंतराव हॉलमध्ये येरझारा घालू लागले. त्यांना आठवलं की त्यांच्या लहानपणी घरी लाकडी आरामखुर्ची होती. लाकडी बाकडा होता. स्वयंपाक चुलीवर चाले. खादीचे कपडे वापरले जात. शक्यतो चालत प्रवास केला जाई. दूरचा असल्यास मग बैलगाडी किंवा सायकलचा वापर होत असे. ब्रॅंड इज ब्रॅंड! असा प्रतिष्ठेचा भंपक समज असणारी मंडळी तेव्हा नव्हती. ते काही नाही, साधेपणाने राहण्यातच आपलं भलं आहे, पूर्वज काय वेडे होते म्हणून ते साधे रहायचे? आजोबांनी फर्मान सोडलं ..

“साधेपणा ssssssssssssssssssss!”

आजोबांच्या खरेदीला सुरुवात अर्थातच लाकडी आरामखुर्चीपासून ते आजीला सुती पातळं, लुगडी, घरातली  सगळी भांडीकुंडी वगैरे वगैरे अशी होणार होती. सगळं पूर्वीसारखं व्हायला हवं हा आजोबांनी चंगच बांधला.

वसंतराव सरवटे, निवृत्त पोस्टमास्तर. मुलगा विनोद एका प्रायवेट लिमिटेड कंपनीत विक्री अधिकारी तर सूनबाई वनिता एका खाजगी हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट. तसं हे घर मध्यमवर्गीयच. शहरी जीवनाशी जुळवून घेत कसाबसा संसाराचा गाडा हाकणारं. वसंतरावांना घरात खूप मान. त्यामुळे त्यांच्या शब्दाबाहेर कुणीही जात नसे. त्यांचं फर्मान म्हणजे भीष्मप्रतिज्ञेचंच दुसरं नाव जणू. साधेपणाच्या वाटेवर असा हा पूर्ण सरवटयांचा परिवार वसंतरावांच्या मागोमाग निघाला खरा पण नातू विनीत या वाटेतला मुख्य अडथळा होता.

आजोबा,बरं बुवा! तुम्ही म्हणता त्याप्रमाणे साधे राहू; पण तो परवडेल का ?”

हेच तर तुमचं चुकतं! साधी राहणी, उच्च विचारसरणी ही शिकवण तुम्हाला माकडउड्या मारणार्‍यांना नाही कळायची !”

हो पण आजोबा, काळ बदलतो तसं बदलायलाही नको का? परंपराही बदलतेच.

“असहमत!”

“राहिलं! एक कॉम्प्रो करूया का ? तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण एक आठवडा वागून पाहू, त्यानंतर पुढे बोलू, कबूल ?”

“कबूल !

वाक्युद्ध संपलं आणि मुख्य बदलाला सुरुवात झाली. आरामखुर्ची, बाक, भांडी, कपडालत्ता सगळ्याची खरेदी झाली. जवळच्या प्रवासाला पायी आणि गरज भासलीच तर सायकल असा ठराव झाला. पूर्ण घराचा जणू कायापालट झाला. घर अगदी नीटनेटकं दिसत होतं. घरातील लाकडी फर्निचर, तांब्या-पितळीची भांडी, माठ इत्यादी गृहोपयोगी वस्तूंनी घरची शोभा अजूनच वाढवली होती. आजोबा खादी कपड्यात अगदी रुबाबदार दिसत होते आणि आजी अगदी घरंदाज वाटत होती. आई,बाबा आणि विनीतदेखील साध्या पेहरावात उठून दिसत होते. अख्खं घर उठून दिसत होतं आणि याचबरोबर उठून दिसणारी अजून एक गोष्टही होती...

बँकेची खातेपुस्तकं!

आठवडाभरात साधेपणाच्या वाटेवर अनेक महागडी दुकानं लागली होती. त्या दुकानांसमोर नतमस्तक झालेली बँकेची खातेपुस्तकं पुढं चालताना धापा टाकत होती. खादीच्या कपड्यांचा दर जीन्सपेक्षा दुप्पट आणि लाकुडकामाची किंमत ब्रॅंडेड सोफ्यापेक्षाही तिप्पट होती. आजोबांना काही कळायलाच मार्ग नव्हता. साधेपणाची अशी अवाढव्य किंमत मोजावी लागावी इतका साधेपणा महाग झाला आहे का ?

खरं तर आजोबांचं म्हणणं चूक नाही पण नातूही पुर्णपणे चुकीचा नाही. प्रत्येक गोष्ट ट्रेंडिंग करणार्‍या आजच्या जमान्यात साधेपणा ही मिरवायची गोष्ट झाल्यामुळे साधेपणासाठी आवश्यक असणार्‍या वस्तू अॅंटीक केल्या गेल्या आहेत आणि त्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचऐवजी ब्रॅंडेड नसल्या तरी आजच्या काळातल्या किफायती वस्तू वापरण्यात काहीही गैर नाही. साधेपणा ही अंगी बाणवायची गोष्ट आहे, मिरवायची नाही तर अंतरी मुरवायची गोष्ट आहे. आजच्या काळात साधेपणाने राहण्यासाठी लागणारी साधने महाग झाली आहेत. साधेपणा ही गरज निश्चितच आहे पण तिचं स्तोमही माजवता नये. आजच्या काळात वावरतांना हे समजण्याचं चातुर्य तुमच्या अंगी असणं जास्त महत्वाचं आहे. मग साधेपणा तुमच्या आत असला तरी तेवढं पुरेसं आहे. समर्थ म्हणतात,

चातुर्ये शृंगारे अंतर । वस्त्रे शृंगारे शरीर ।

दोहीमध्ये कोण थोर । बरे पहा ।



__ अनिल विद्याधर आठलेकर, पुणे

  मोबाईल : 9762162942 

 


Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!