इमोजीबाईचा स्मार्टफोन अन् आजीचा 'डिजिटल' पापा! 😎🎊🏃🙈😊🐒🤗❤️ #Emojidayspecial
रोहनची आजी गावाकडे रहायची. वडिलांबरोबर आजीकडे गावी गेल्यावर
टीव्ही बघण्याशिवाय त्याच्यापुढे दुसरा काही पर्याय उरत नसे. तिथे मोबाइल नेटवर्क
नसल्याने.
अगदी नेटवर्क नसल्याने शहरी परत आल्यावर आजीशी फोनवरसुद्धा बोलता येत नसे.
कालांतरानं, गावी
नेटवर्क आलं खरं, पण ते मध्येच यायचं मध्येच जायचं.
“अरे आम्ही असेच दिवस काढले, आम्हाला रेंज-बिंज असली नसली
तरी काही फरक पडत नाही. लोकांशी बोलणं, गप्पा मारणं आणि आपल्या संसारात रमणं. एवढं पुरायचं आम्हाला जगायला. “
“मग तर तुला ‘इमोजी’
म्हणजे काय हेही कळणार नाही. “ रोहन म्हणाला.
आजीला कळलं नाहीच.
“तूच सांग बघू म्हणजे काय ते ?” आजी.
“बाबा, इमोजी म्हणजे नक्की काय ? त्यांचा शोध कसा लागला ? सांगा ना.. “
बाबा हसून म्हणाले,
“सविस्तर ऐकणार आहेस ? सांगतो.
इमोजी
हा शब्द मूळ जपानी भाषेतील शब्द आहे. इ ( म्हणजे चित्र'),
मोजी ( म्हणजे वर्ण किंवा अक्षर) दोन्ही शब्दांनी मिळून ‘इमोजी’ हा शब्द बनला आहे. इमोजीचा शोध कसा लागला ? तर, सर्वप्रथम इमोजी
तयार करण्याचं श्रेय जपानी कलाकार, तंत्रज्ञ शिगेताका कुरिता यांना जातं. कुरिता यांनी १९९९ मध्ये
जपानच्या मुख्य मोबाइल वाहक कंपनीसाठी ( एनटीटी डोकोमो) विशेषतः त्यांच्या
मोबाइल इंटरनेट प्लॅटफॉर्म, आय-मोडवर वापरण्यासाठी इमोजी तयार केले होते. पहिला इमोजी
सेट १७६ वेगवेगळ्या प्रतिमांचा होता आणि त्या प्रामुख्यानं मानवी चित्रांपेक्षा सिंबॉल्सच्या
सहाय्याने बनवल्या गेल्या होत्या.
२०००
च्या दशकाच्या अखेरीस स्मार्टफोन येईपर्यंत इमोजीचा प्रसार जपानच्या
पलीकडे विशेष
झाला नाही. इमोजीचा शोध १९९०
च्या दशकात लागला असला तरी त्याआधी काही इमोटिकॉन्स अस्तित्वात
होते. स्मार्टफोनचा शोध लागल्यावर सुरूवातीला जे इमोटिकॉन वापरले जायचे त्यांची जागा आता या इमोजींनी घेतली. इमोटिकॉन्सचा शोध स्कॉट फॅहलमन यांनी लावल्याचं म्हटलं जातं. इमोटिकॉन्स विरामचिन्हांचा वापर करून केले जात असत. उदाहरणार्थ, अर्धविराम, अपूर्णविराम,अपसरण चिन्ह,संयोगचिन्ह आणि कंस
यांचा वापर होत असे. हसणारे किंवा आनंदी भाव दाखवण्यासाठी : ) आणि दु:खी भाव दर्शवण्यासाठी : ( असा त्यांचा वापर होत असे, पण इमोजींचा शोध
लागला आणि इमोटिकॉन्सऐवजी लोकांना इमोजी
अधिक जवळचे वाटू लागले, कारण त्यात भाव अधिक जिवंतपणे व्यक्त होऊ लागले. आज जवळपास हजारो इमोजी
अस्तित्वात आहेत.
आजच्या डिजिटल
युगासाठी
हे इमोजी म्हणजे एक प्रकारची पर्यायी भाषाच बनले आहेत. मुळात संवाद साधताना वेळ
वाचावा आणि जलद संवाद व्हावा या उद्देशानेच इमोजीज तयार करण्यात आल्या
होत्या. उदाहरणार्थ, माझं तुझ्यावर
प्रेम आहे (I Love You ) हे सांगण्यासाठी लाल किंवा गुलाबी रंगातील बदामाची इमोजी
टाकली तरी पुरेसं होतं आणि पूर्वी जी इंग्रजी शब्दांची विविध संक्षिप्त रूपं
वापरली जायची त्यांनाही पर्याय म्हणून इमोजी सक्षमपणे सिद्ध झाल्या आहेत.
उदाहरणार्थ, LOL साठी हसण्याची फक्त
इमोजी टाकून काम होतं. मूळ जपानी असलेल्या
इमोजी या प्रकारानं हळूहळू अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आणि अॅपल, माइक्रोसॉफ्ट, गूगल अशा
कंपन्यांनी त्यावर काम करण्यास सुरुवात केली. आज जगभरात सर्व मोबाईलधारक इमोजींचा
वापर करत आहेत. त्यामुळे संवाद अधिक प्रभावी आणि रंजक झाला आहे.“
“बापरे! आता हे सगळं आजीला कसं सांगायचं ?” तो पुटपुटला.
तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. आजीकडे मोबाइल घेऊन गेला आणि म्हणाला,
“ आजी तुला गाणी आवडतात ना ? मग हे कोडं सोडव. कोणतं गाणं
सांग ! ”
रोहन म्हणाला. त्याने मोबाइलच्या चॅटबॉक्समध्ये काही इमोजी टाकून आजीला विचारलं.
“गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का ? ” आजी लगेच म्हणाली.
“ आता कसं बोललीस ! यांनाच म्हणतात इमोजी !एकही शब्द नसला
तरी तुला बरोबर समजलं की नाही ?”
आजी गोड हसली आणि रोहनच्या गालाचा तिने पापा घेतला! जुनी
पिढी आणि नवी पिढी यांच्यात एक सुरेख इमोजी संगम झाला होता ! आजी तिथूनच
रोहनच्या बाबांना मोठ्याने म्हणाली,
“सुरेश, मला एक नवीन स्मार्टफोन आण बघू ! बघतेच आता त्या एकेक इमोजीला !”
....आणि घरात एकच इमोजीकल्लोळ झाला !
( प्रसिद्धी : मधुरिमा पुरवणी, दैनिक दिव्य मराठी )
@अनिल विद्याधर आठलेकर
मोबाइल –
९७६२१६२९४२

Comments
Post a Comment