मराठीच्या बोली आणि बोलीभाषांमधील विविधता
भाषा कोणतीही असो, प्रदेश कोणताही असो, घराघरात ऐकू येणारा हा हवाहवासा संवाद. कुणी मांड म्हणेल, कुणी टाक म्हणेल कुणी ठेव म्हणेल तर कुणी कर म्हणेल पण चहा होईल म्हणजे होईलच. चहा..! दोन अक्षरात किती जादू आहे! नाव घेतलं तरी तरतरी येते. सामान्य शेतकर्याचपासून ते अगदी राजकारण्यांपर्यंत, गरिबातल्या गरिबापासून ते अगदी गर्भश्रीमंत माणसापर्यंत सर्वांच्या घरी तितक्याच आवडीने आणि सहजतेने वावरणारा घटक म्हणजे चहा. शब्द वेगवेगळे असतील पण भावना मात्र तीच, किंबहुना अनुभवही तोच. हीच भाषेची गंमत आहे.
भाषा हे माणसाला मिळालेलं वरदानच आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. सर्व सजीवांमध्ये फक्त माणूसच भाषा बोलू शकतो, आपल्या भावना भाषेद्वारे व्यक्त करू शकतो. ही भाषा कशी निर्माण झाली याबाबत मात्र निश्चित अशी माहिती नाही. अभ्यासकांनी अनेक तर्क मांडले आहेत. ईश्वराने निर्माण केली, राजाने केली, निसर्गाकडून माणूस शिकला वगैरे वगैरे. यापैकी कोणत्याच तर्काने मात्र, भाषेची निर्मिती पुरेशा प्रमाणात स्पष्ट करू शकत नाहीत. आपल्या गरजा आणि आवश्यकता यांना अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी विचार करत असताना मनुष्याला आपल्या तोंडातील विशिष्ट पद्धतीने ध्वनि निर्माण करण्याच्या बलस्थानाचा शोध लागला असावा आणि त्यातून पुढे भाषा निर्माण झाली असावी.
आपल्या आयुष्यात भाषेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपली प्रत्येक कृती, आपले विचार भाषेच्या माध्यमातूनच सिद्ध होतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोप येईपर्यंत किंबहुना रात्री झोपल्यावरही स्वप्नातदेखील भाषेचा वापर होत असतो. बोलता यायला लागल्यापासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत माणूस भाषा वापरत असतो. आपल्याला माहीत आहेच की माणूस हा समाजशील प्राणी आहे, त्यामुळे समाजात वावरतांना विविध लोकांशी त्याचा संपर्क, संबंध येतो आणि त्यावेळी प्रत्येक व्यक्तीशी बोलताना माणूस भाषाच वापरुन व्यवहार करत असतो.
भाषा बोलण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आवाजातील चढउतार, आरोहअवरोह,विशिष्ट हेल, खास शब्दयोजना यानुसार प्रत्येक व्यक्तीची काही वैशिष्ट्यं असतात. व्यक्ती, विभाग, प्रदेश त्याचबरोबर अनेक असे घटक असतात ज्यामुळे प्रत्येकाच्या भाषेत वेगळेपणा असतो. मराठी भाषेचाच विचार केला तर एकूण एक लाख चौरस मैल इतका मराठीच क्षेत्रविस्तार आहे आणि मराठी भाषकांची संख्या जवळपास सात कोटींहून अधिक आहे. भाषा साधारणपणे बारा कोसांवर बदलते. कारण, भाषा ही सतत बदलत राहणारी गोष्ट आहे. यामुळेच दोन विविध शहरांमध्ये, गावांमध्ये राहणार्या लोकांच्या बोलण्यात तंतोतंत साम्य असत नाही. कोणत्याही प्रदेशात स्थानिक भाषाभेद असतातच, ते लक्षात घेता दैनंदिन व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून एका सर्वसाधारण बोलीची कोणत्याही प्रदेशाला गरज असते. अशाच प्रकारे, चांद्यायापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या मराठी भाषाकांमधील व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून एक सर्वसाधारण बोली म्हणून देशी मराठी भाषेला प्रमाण भाषेचं स्थान दिलं गेलं आहे.
आता, बोली म्हणजे तरी काय ? बोलण्यामध्ये जास्तीत जास्त साम्य आढळणार्याय व्यक्तींचा एखादा गट विशिष्टपणे वेगळा ओळखू येईल इतका जाणवू लागल्यास, त्या गटाच्या स्वाभाविक बोलण्याच्या पद्धतीला ‘बोली’ असं म्हणता येईल. एखादया भौगोलिक प्रदेशात किंवा संस्कृतीमधील लोकांच्या अंगवळणी पडलेले आणि मुद्दाम शिकावे न लागणारे शब्द हे बोलीमध्ये येतात. बोली मुखपरंपरेतून पुढे चालत जाते. महाराष्ट्रात साधारणपणे साठहून अधिक बोलल्या जातात. त्यात वर्हाूडी, नागपुरी,हळबी, अहिराणी, डांगी आणि मालवणी अशा प्रमुख बोली मानल्या जातात. कोकणीदेखील पूर्वी मराठीची बोली मानली जात असे, पण काही जणांना ते मान्य नाही आणि आता तर कोकणी ही गोव्याची राजभाषा आहे.
बोली म्हणजे मुख्यत: प्राथमिक स्वरुपात असणारं संभाषण माध्यम असतं. लहान मुलाची वेगळी भाषा असते, शाळेत जाणार्या मुलाची वेगळी, तरुणाईची वेगळी आणि ज्येष्ठ नागरिकांचीही वेगळी. स्थल,काल,वयोमानपरत्वे हे बदल होत असतात. 'संवाद साधणे किंवा भावना व्यक्त करणे' या प्रमुख गरजेपोटी मुखावटे विविध पद्धतीने काढलेल्या ध्वनींची एक अर्थपूर्ण साखळी म्हणजे 'बोली' असं आपण म्हणू शकतो. बोलीची स्वत:ची अशी वैशिष्ट्यं असतात ती यामुळेच. प्रत्येकाची सवय, लकब आणि क्षमता वेगवेगळी असल्याने आवाजातही तो बदल जाणवतो आणि आपण त्या त्या आवाजांच्या अनुरोधाने त्या व्यक्तीला ओळखतो किंबहुना त्याचं गाव, जिल्हा किंवा राज्यही ओळखतो.
बोलींच्या आपल्या-आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे लक्षात राहणं सोपं होतं. मालवणी बोलणारा 'माका,तुका' करतो तर नागपुरी बोलणारा 'मले,तुले' करतो. कोणी 'बे' म्हणतं तर कोणी 'रे', कोणी 'अगं' म्हणतं तर कोणी 'अगो' म्हणतं. ही गंमत बघायची असेल तर चार-पाच विविध प्रदेशातील मित्र एकत्र भेटले की त्यांच्यात होणारा अनौपचारिक संवाद कान देऊन ऐकावा. अगदी कोणत्याही आडपडद्याशिवाय बोलली जाणारी बोली अशा मैफिलींमध्ये अनुभवायला मिळते.
आपण ना, विनाकारण आपल्याच कृतीनं आपलं साधं, सोपं आणि सुंदर जीवन उगाच क्लिष्ट आणि कुरूप करून टाकतो. नको नको ते वाद, भांडणं, भेदाभेद आणतो आणि अस्सल सोन्याची माती करतो. भाषा हे सोनं आहे आणि बोली म्हणजे त्या सोन्याची झळाळी. हे लक्षात न घेता 'प्रमाण' श्रेष्ठ की 'बोली' श्रेष्ठ असे काहीही गरज आणि आधार नसलेले वाद करत-उकरत बसतो. भाषा ही कोणत्याही एका विशिष्ट वर्गाची मालकी नसते. भाषा सर्व ‘ती बोलणार्याघ आणि बोलता येणार्या व्यक्तींची’ असते. त्यामुळे मग त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद उद्भवतच नाही. आपण डोळे उघडून बघतच नाही आणि आंधळेपणा हा आपला आजार असल्याचं निदान आपणच करून बसतो. डोळे उघडून बघा, जग सुंदर आहे आणि हे सुंदर जग भाषेच्या माध्यमातून तुम्ही अनुभवू शकता. विविध परदेशांतील लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला. त्यांची भाषा वेगळी असेल, ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. शब्द कळले नाहीत तरी त्यातील आवाजावरून मथितार्थ नक्की लक्षात येईल आणि मग तुम्ही त्या भाषेच्या, लोकांच्या प्रेमात पडाल. एकदा असे डोळसपणे प्रेमात पडलात की जग सुंदर असल्याचं तुम्हाला नक्की जाणवेल.
बोली म्हटलं की आपल्याला ‘इरसालपणा’ आठवतो. साहित्यातूनही या बोलींना अनेक लेखकांनी अमर केलं आहे. श्री.म.माटे, बहिणाबाई चौधरी, ग.दि. आणि व्यंकटेश माडगूळकर, द.मा.मिरासदार,शंकर पाटील, आनंद यादव, रा.रं.बोराडे, उद्धव शेळके, गंगाराम गव्हाणकर यांच्यासह अगदी पु.ल.देशपांडे, बा.भ.बोरकर यांनीही या ना त्या प्रकारे बोली मुख्य प्रवाहात आणली. पु.ल. देशपांडे यांचा अनुनासिक कोकणी बाजाची मराठी बोलणारा अंतु बर्वा असो, कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील कानडी प्रभावाखाली असणारी मराठी बोलणारे रावसाहेब आपल्याला आवडतात आणि लक्षातही राहतात. बोरकरांनी गोमंतकीय कोंकणी भाषेत लिहिलेली 'तुजिं गो पांयजणां' आजही जवळजवळ प्रत्येक मराठी रसिकाच्या हृदयात आहे. भाषा कधीच भेद करत नाही, भेद माणसं करतात. भाषा काय करत असेल तर ते ‘जोडण्याचं काम’ करते, भाषा दोन संस्कृती जोडते, दोन प्रदेश जोडते, दोन मनं जोडते.
बोलीच्या निर्मितीची कारणं अनेक असू शकतात जशी की विशिष्ट भूभाग आणि इतर उर्वरित भाग यांच्यात दळणवळणाची साधने नसणे, दुष्काळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे झालेली स्थलांतरं,सत्तांतरं, राजकीय हस्तक्षेप, युद्धप्रसंगांमुळे झालेल्या निर्वासितांच्या समस्या, व्यवसाय, लिंगभेद, सांस्कृतिक सामाजिक दर्जा, भौगोलिक परिस्थिती, वैवाहिक नातेसंबंध त्याचप्रमाणे विविध कारणांमुळे होणारे पर्यटन, प्रवास इत्यादी गोष्टींमुळे बोलींमध्ये विविधता येत जाते.
महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रमाणभाषा आणि बोली यांचा खूप जवळचा संबंध आहे. खरंतर, प्रमाण आणि बोली एकमेकांना पूरक आहेत. प्रमाणभाषेला अनेक नव्या शब्दांची देणगी बोलीकडूनच मिळते तर प्रमाण भाषेतून जवळजवळ अदृश्य झालेले शब्द बोली भाषाच जपून ठेवते, जिवंत ठेवते. या अर्थी, बोली ही एक अत्यंत जिवंत भाषापद्धती आहे. प्रमाण भाषेला एक चौकट असते, त्या चौकटीत तिला वागणं क्रमप्राप्त असतं, पण बोलीचं तसं नाही. बोली स्वयंभू असते, स्वतंत्र असते. बोलीला वेगळी लिपीदेखील नसते, कारण ती सामान्यातल्या सामान्य माणसाच्या मनाची भाषा असते. लोकांनी लोकांसाठी जगवलेली व जपून ठेवलेली लोकांची भाषा म्हणजे बोली. शिव्या असोत की ओव्या, बोलीत त्या अमृतासारख्या वाटतात, कारण त्यातला भाव शुद्ध असतो. प्रमाण भाषा ही शासनव्यवहार तसेच इतर राज्यांतर्गत व्यवहार सुरळीत व सुलभ व्हावेत म्हणून निश्चितच गरजेची आहे. त्यामुळे तिच्याबद्दल आकस वा गैरसमज असण्याचं कोणतंही कारण नाही. बोलीला उत्तम म्हणण्यासाठी प्रमाण भाषा वाईट म्हणण्याची गरजच नाही मुळी. दोघांचंही स्वतंत्र सहअस्तित्व मान्य केलं की वादाचं रूपांतर सुसंवादात होतं आणि हे एक प्रकारे माध्यमांतर शक्य होतं ते भाषेमुळेच.
आज माणुसकी हरवत चाललेल्या काळात अस्सल जगण्याची ओळख असणार्याह बोलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बोलीकडून तिचं शुद्ध सत्व घेऊन मराठी भाषेची पताका सदैव फडकवत ठेवण्यासाठी प्रमाण भाषेचीही मदत घेऊ. मायबोली म्हणजे आईची भाषा, आईची माया करणारी भाषा. मग, आई कधी सापत्नभाव करते का? आई ही आई असते. आईच्या मायेने आपल्या पंखाखाली घेतलेल्या या सर्व बोली जपू. त्यांना मान देऊ. आपल्या बोलीत बोलणार्याप सामान्य माणसाला कमी न लेखता, त्याचा अभिमान असणारी बोली जाणून घेऊ. मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे हे स्वत: अगोदर जाणून घेऊ आणि सर्वांना समजावून देखील सांगू. भाषा जगली तर संस्कृती जगेल आणि संस्कृती जगली तरच मानवता जगेल. म्हणूनच आपली भाषा आपणच जपू आणि तिची पालखी सदैव आपल्या खांद्यावर वाहू. ‘भाषेचे भोई’ होण्यात मिळणार्याा समाधानाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य आणखी कशातच नसेल, नाही का?
~ अनिल विद्याधर आठलेकर
[ संदर्भसूची : *मालशे,इनामदार,सोमण (संपादक), भाषाविज्ञान:वर्णनात्मक आणि ऐतिहासिक, पद्मगंधा, 1982 | *मालशे,पुंडे,सोमण, भाषाविज्ञान परिचय, पद्मगंधा,1987 | *गोखले करुणा, प्रामाणिकही,सुंदरही..., राजहंस, 2021, |* मराठी विश्वकोश ]
( पूर्वप्रसिद्धी : साहित्य वैभव : अंक 2023, संस्कार भारती पिंपरी-चिंचवड )

Million Kudo's
ReplyDelete