चौदावे रत्न दाखवणे
'चौदावं रत्न '
----------------
भाषा हे संवादाचं माध्यम आहे. एकमेकांमधील व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी भाषेचा महत्त्वाचा उपयोग होतो. 'माणूस हा समाजशील/सामाजिक/समाजप्रिय प्राणी आहे' हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोतच. 'समाज निर्माण करणे आणि सामाजिक बनणे' माणसाला केवळ भाषेमुळेच शक्य होतं. मानवी भाषेत वेगवेगळे अर्थ संज्ञापित करण्याचं सामर्थ्य असल्यामुळेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आणि विशिष्ट आहे. साहजिकच भाषेत विविध सौंदर्यवृद्धी करणार्या घटकांची उत्तरोत्तर भर पडत गेली आणि अधिकाधिक मानवी जीवन भाषेच्या अंगानेही अधिकाधिक समृद्ध बनत गेलं आहे.
म्हणी, वाक्प्रचार, अलंकार वगैरे गोष्टी भाषेला मनोरंजक आणि आपलीशी अशी बनवतात. रुक्ष भाषा कोणालाही आवडत नाही. एखाद्या भाषणात वक्त्याच्या आवाजात चढउतार नसेल, वैविध्य नसेल आणि एकसुरीपणा असेल तर सभामंडपात शेवटी वक्ता आणि मंडपवाला असे दोघेच उरतात. हीच खरी भाषेची गंमत आहे आणि आपल्याला ती तिच्या विविध अंगांसह अवगत असेल तर आपलं बोलणं कधीच कंटाळवाणं होत नाही.
वाक्प्रचार हा एक भाषेचा अतिशय मजेदार घटक. अनेकदा वाक्प्रचाराच्या मुळाशी गोष्टी/किस्से/कहाण्या किंवा घटना असतात. आपण वापरताना तर ते सहज वापरतो पण त्याबद्दल माहीत असतंच असं नाही. कधीतरी शांतपणे विचार करत बसतो, तेव्हा मात्र आपल्याला आश्चर्य वाटतं. अरेच्चा ! हा वाक्प्रचार असा का असावा बरं ? तर, आज अशाच एका गंमतीदार वाक्प्रचाराची गंमत आणि माहिती सांगणार आहे.
" अमिता, याद राख ! पुन्हा जर कुणी तक्रार केली, तर मीच तुला चौदावं रत्न दाखवेन !"
रत्न हा मुलींचा आवडता विषय असला, तरी इथे मात्र अमितानं खुश होण्याचं कारण नाही. उलट परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वेळीच तिनं तिथून काढता पाय घ्यायला हवा ! का ? आपल्याला माहीत आहे की चौदावं रत्न म्हणजे शिक्षा करणे, मार देणे/चाबकाने मारणे , पण असं कसं ? काय संबंध ?
त्याची गंमत अशी आहे की देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून 14 रत्ने किंवा मूल्यवान वस्तू बाहेर काढल्या. त्या अशा :
1) लक्ष्मी
2) कौस्तुभ
3)पारिजातक
4)सुरा
5)धन्वंतरी
6)चंद्र
7)कामधेनू
8)ऐरावत
9)रंभा ( आदि अप्सरा )
10)उचैश्रवा सप्तमुखी अश्व
11)कालकूट विष
12) शार्ङ्ग धनुष्य
13) पांचजन्य शंख
आणि
14 ) अमृत
श्लोक :
लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमाः ।
गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥
अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे ।
(रत्नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात् सदा मङ्गलम् )
आता गंमत पुढे आहे.
वरील माहितीवरून लक्षात आलं असेलच की चौदावं रत्न म्हणजे अमृत आहे. मग त्याला चाबकाने वगैरे मारण्याचा अर्थ कसा जोडला गेला ? तर, त्यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे अमृत मिळवताना त्याचा अधिकार कोणाकडे जातो यावरून देव आणि दानव यांच्यात युद्ध झालं. त्यात दानवांना चोप बसला. अशा प्रकारे 14 वं रत्न जे अमृत, ते न मिळताच चांगलाच चोप बसला म्हणून हा अर्थ आला. त्याबरोबरच दुसरं म्हणजे, या श्लोकात ' शङ्खोऽमृतं चाम्बुधे ' असा एक भाग आला आहे. यातील 'चाम्बुधे' शब्दाचा अर्थ ' च अम्बुधे' म्हणजेच ' आणि सागरात' असा आहे पण काही लोकांनी उच्चार साधर्म्यामुळे त्याचा अर्थ चुकीचा म्हणजे 'चाबूक' असा लावला असण्याची शक्यता आहे. ( संदर्भ- ह.अ. भावे)
त्यामुळे चौदावं रत्न म्हणजे चाबकाने मारणे किंवा यथेच्छ चोप देणे असाच पुढे रूढ झाला आणि आज आपण तो त्याच अर्थी वापरतो. आहे की नाही ही भाषेची गंमत ?
आता आलं न लक्षात ? कुणी चौदावं रत्न दाखवत असेल तर थांबू नका, लगेच काढता पाय घ्या !
धन्यवाद !
~ अनिल विद्याधर आठलेकर
Comments
Post a Comment