व्याजोक्ती आणि व्याजस्तुती अलंकार

 शेर आणि भाषा

माझ्या गझलमध्ये एक शेर आहे :

लेक परततो जेव्हा मागे तेव्हा आई कळते,
हसून म्हणते, ''माझ्या डोळ्यांमध्ये पाणी नसते ...''
- अनिल आठलेकर

संवेदनशील मन असणाऱ्या व्यक्तीला या शेराचा अर्थ फार उलगडून सांगण्याची गरज नाही, पण या शेरातील एक गंमत सांगतो. या शेराच्या मांडणीत एक मराठी भाषेतील अलंकार वापरलेला आहे. कोणता?
त्याचं नाव आहे :
'व्याजोक्ती'
म्हणजे काय? सांगतो.
व्याजोक्ती (व्याज + उक्ती ) म्हणजे खोटे कथन करणे. एखाद्या ठिकाणी जेव्हा खरी गोष्ट लपवून/दडवून तसे काही नाही असे भासवण्यासाठी वेगळेच (खोटे) सांगितले जाते, त्याला 'व्याजोक्ती' अलंकार म्हणतात.
बाहेर पडणाऱ्या मुलाला वाईट वाटू नये म्हणून आपल्या डोळ्यांत पाणी वगैरे काहीच नाही असं सांगणारी आई, आतून मात्र दु:खी आहे, पण मुलाला सांगताना ती वेगळंच सांगते.
आता आणखी एक गंमत. नावात असलेलं साधर्म्य पण अर्थ वेगळा असा याच्या जवळचा दुसरा अलंकार म्हणजे
' व्याजस्तुती '
याचं एक उदाहरण पहा :
विठ्ठला जा तुला हवे ते कर
मी तुला टिंब घाबरत नाही ...
~ वैवकु
( सौजन्य : 'गझल-विठ्ठल' गझलसंग्रह )
या शेरातली गंमत पहा. इथे कवीचं विठ्ठलावर प्रेम आहे. विठ्ठलाशिवाय खरं तर त्याला चैन पडत नाही, पण विठ्ठल भाव खातोय जणू. म्हणून मग रागाने कवी त्याला आव्हान देतो. आपण मुळीच घाबरत नसल्याचं सांगतो. वरकरणी कवीनं विठ्ठलाला आव्हान दिलेलं आहे, धमकी दिलेली आहे, ज्यात रुसवा, राग किंवा भांडण असल्याचा भास होतो, पण आत मात्र कवी त्याच्या विठ्ठलावर मनापासून प्रेम करतो म्हणून तो असं म्हणत आहे.
हे 'व्याजस्तुती' अलंकाराचंच उदाहरण आहे.'बाह्यत: निंदा पण आत स्तुती किंवा बाह्यतः स्तुती पण आत निंदा ' असं वर्णन जेव्हा असतं तेव्हा तो 'व्याजस्तुती' अलंकार असतो.
धन्यवाद.

©अनिल विद्याधर आठलेकर

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !