श्लेष आणि पुनरुक्तवदाभास अलंकार

 कविता आणि भाषा


अंजली लिमये-कुलकर्णीची 'खलिता' शीर्षक असणारी एक उत्तम कविता वाचली. कविता उत्तम आहेच, पण त्यातली एक ओळ खास वाचकांसाठी इथे उद्धृत करून आपण त्या अनुषंगाने दोन अलंकारांबद्दल आज जाणून घेऊ. ती ओळ अशी आहे :

' मनात आशा एकच केवळ फुटेल अंकुर ना त्याला?'
( अंजली लिमये -कुलकर्णी )

आता गंमत पहा. शेवटच्या दोन शब्दांकडे नीट लक्ष दिल्यास असं लक्षात येईल की उच्चार करत असताना हे सलग उच्चारले तर ती ओळ अशी होईल ...
'मनात आशा एकच केवळ फुटेल अंकुर नात्याला?'

अर्थातच अर्थ बदलेल आणि कवयित्रीलाही अपेक्षित असा तो अर्थ नाही. तरीही ओळ मात्र नक्कीच अर्थपूर्ण आहे. आता या दोन ओळींचा संदर्भ घेऊन जर आपण अशी एक रचना केली :

फार अपेक्षा नकाच ठेवू जगवा आधी नात्याला,
मनात आशा एकच केवळ फुटेल अंकुर ना त्याला?

( वृत्त वगैरे विषय तूर्तास बाजूला ठेवून अलंकाराच्या दृष्टिकोनातून आपण या ओळींकडे पाहू )
आठवलं का काही ? बरोबर !

श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न वरी

हे उदाहरण कुठेतरी वाचल्याचं आठवलं ना ? आता आणखी एक ओळ पहा :

'मित्र' तू नाहीस केवळ,
प्रेरणा आहेस तू ....

या उदाहरणमध्ये अवतरणात असणार्या एकाच शब्दाचे 'सूर्य' आणि 'स्नेही' असे दोन अर्थ निघतात.
पहिलं उदाहरण, ज्यात, शब्दांची फोड केल्यावर ( नात्याला, ना-त्याला / नवरी, न-वरी ) दोन अर्थ समजतात, लक्षात येतात या प्रकाराला 'सभंग श्लेष' असं म्हणतात तर दुसर्या उदाहरणात एकच शब्द दोन अर्थ व्यक्त करतो या प्रकाराला 'अभंग श्लेष' असं म्हणतात.
श्लिष् म्हणजे आलिंगणे किंवा एकमेकांत मिसळणे. एकाच शब्दाला दोन अर्थांची मिठी बसलेली असते, म्हणून श्लेष ( आलिंगन/मिठी ) असं या अलंकाराला नाव देण्यात आलं आहे. आपण अनेकदा सहज म्हणतो, अरे यात श्लेष आहे. त्याचा अर्थ हा आहे. अलंकारांनी भाषा सजते, अधिक सुंदर बनते आणि काव्यात अलंकार आल्यास काव्याचं सौंदर्य अधिकच खुलतं यता शंका नाही.

आता आणखी एक गंमत पहा. श्लेष अलंकाराशी जवळीक साधणारा आणखी एक अलंकार आहे, तो म्हणजे 'पुनरुक्तवदाभास' अलंकार !

एकाच अर्थाचे वाटणारे दोन शब्द एकाच अर्थाने वापरले आहेत, असा म्हणजेच पुनरुक्तीचा आभास काही वेळा निर्माण होतो पण खरे तर ते शब्द भिन्न अर्थांनी वापरलेले असतात आणि हे समजल्यावर एक प्रकारच्या चमत्कृतीचा अनुभव येतो.

उदाहरण पहा :
जाय तो रडत दाटत कंठ,
प्राप्त होय मजला दशकंठ
पद्मिनी उपडितो गज हस्तीं
ने तसा उचलुनी मज हस्तीं.
( सौ. - 'लोपामुद्रासंवाद' ~ वामन / मराठी विश्वकोश )

तिसर्या ओळीतील शेवटचे दोन शब्द जरी सारखे वाटत असले तरी इथे 'हस्तीं' याचा अर्थ सोंड/सोंडेने असा आहे. ही एक शब्दचमत्कृती आहे. आता हे उदाहरण पहा :

भूक पुन्हा का उभी अंगणी आहे माझ्या?
कसा कळेना तिला द्यायचा आता थारा
काय आणखी बाकी आहे माझ्यापाशी !
'झाला आहे देउन यंदा सारा सारा .... '
( अनिल आठलेकर )
या कडव्यातील चौथ्या ओळीत सलग आलेले दोन शब्द सारखेच वाटत असले (पुनरुक्ती ) तरी त्यात अर्थभेद आहे. सारा ( जमिनीवरील कर आणि सर्व/काहीही बाकी न ठेवता ) हा शब्द इथे पुनरुक्तवदाभासाचा अनुभव देतो. ही आहे भाषा आणि तिच्या वापरामधील गंमत.
आपली भाषा खूप समृद्ध आहे. तिचा वापर तुम्ही कसा करता त्यावर सगळं अवलंबून आहे. भाषेच्या वेगवेगळ्या पैलूंचा असा आनंद घ्या, आनंद द्या. मग बघा, तुम्हाला बाकी कुठल्याही 'नादाच्या नादी' लागण्याची गरज भासणार नाही !
धन्यवाद!

~ अनिल विद्याधर आठलेकर, पुणे

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !