'लेटेस्ट फॅशनची दुखरी नस

 


                                                                                                                                                                                 

 

   सकाळी सकाळी जरा मस्त मूड होता म्हणून सुहासराव सहज नाट्यगीतं आळवत बसले  होते, तेवढ्यात आतून जोरात काहीतरी आपटल्याचा आवाज आला आणि त्यामागोमाग फर्मान सुटलं __ 

“पुरेssssssssssss! गाणीच गात बसणार आहात की घरात काय संपलंय, काय नाही, हे बघून किराणाही भरणार आहात?

खरं तर किराणा घराण्यावरून कोटी करायची त्यांना हुक्की आली होती, पण आतून झालेला भूकंप नक्की कुठे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आला होता, काही कळेना. अधिक न बोलता सुहासराव निमूटपणे पिशवी घेऊन बाजारात जाण्यास निघाले.

जाताना डोक्यात चक्र मात्र सुरूच होतं. बाईसाहेब एरव्ही कधी अशा चिडत नाहीत, गाताना तर नाहीच नाही. मग नेमकं पाणी कुठे मुरतंय म्हणायचं? स्वारी निघाली चालत. डोक्यात विषय तोच. चालता चालता वाटेत काही ओळखीची मंडळी भेटली. सर्वांशी बोलत बोलत सुहासराव त्यांच्या नेहमीच्या भुसारी दुकानात पोहचले. आपल्या यादीप्रमाणे सुहासरावांनी सामान घेतलं आणि ते निघणार, इतक्यात दुकानदार म्हणाला,

“काका, तुमचे पैसे परत घेतले नाहीत तुम्ही. हे घ्या..”

“खरंच की ! विसरलोच!” असं म्हणत सुहासरावांनी पैसे घेतले आणि ते परत घरी जाण्यास निघाले. हे सगळं एका बाजूने सुरू असताना सुहासरावांच्या डोक्यातून बायकोचं चिडणं काही गेलं नव्हतं.

“आणलंत का सामान सगळं ? तुमचं म्हणजे सोमग्या गेला आणि पाट,परुळे पाहून आला अशी परिस्थिती असते.गाडी तरी घेऊन गेला होतात का ?

आता हुशारीऐवजी भुसारीने काम चालवून घ्यावं लागणार होतं.

“सगळं सामान आणलंय. लिहूनच घेतलं होतं मी तसं. तुझ्या आवडीच्या ब्रॅंडच्याच सगळ्या वस्तू आणल्यात बरं का सुलू...”

सुहासरावांनी भुसारीत हुशारी मिसळून शेवटचा शब्द जरा हळुवारपणे उच्चारला.

“जावा तिकडे. मस्का नका मारू.”

गाडी रुळावर येत होती, आता क्रॉसिंग लागून चालणार नव्हतं. तोच धागा पकडून सुहासराव हळूच म्हणाले,

“आज एक माणूस आमच्यावर रागावलंय जणू ...”

रागावणार नाही तर काय? किती दिवसांपासून सांगतेय, सन स्क्रीन लोशन आणून द्या, फेसपॅक आणून द्या, फेशियल किट आणून द्या, पार्लरमध्ये घेऊन जा, तर नाही !” 

“अगं हो हो.. आणू की पण इतकं रागवायला ____

त्यांचं बोलणं पूर्ण होणार तोच त्यांची लाडकी बहीण सुनयना जवळजवळ पाय आपटतच आणि इंग्लिशमध्ये “माय फूटsss!” असं काहीसं पुटपुटत, तणतणत प्रवेश करती झाली.  

“काय झालं तुझ्या फूटला ?”

यावेळी मात्र सुहासराव स्वत:ला आवरू शकले नाहीत, पण सुनयना तिसर्‍याच विश्वात असल्यामुळे तिला कोटी कळली नाही.

“काही नाही!”

जवळजवळ ताशी १५० किलोमीटर वेगाने असे दोन शब्द फेकून सुनयना आपल्या खोलीत निघून गेली आणि अडून बसलेल्या आमदारांसारखं तिने जोरात दार लावून घेतलं. ते दार ओढताना आलेला “दाssss!” असा आवाज सुहासरावांच्या कानावर आदळलाच.

“कुछ तो गडबड है दया!”

आधी सौ. आणि आता भगिनी यांच्या रणदुदुंभी नाटकामागचा नेमका सूत्रधार कोण असावा याचा छडा लावायलाच हवा, असं आता सुहासरावांना प्रकर्षाने जाणवलं.

डोकं काही चालेना. अशावेळी जरा फेसबुक चाळून बघावं म्हणून सुहासरावांनी मोबाइल हातात घेतला. फेसबुक उघडलं तोच त्यांना समोर एक करोड फॅशन समर्थक बायकांचा ग्रुप दिसला. काही कॉमन फ्रेंडसही त्यात दिसल्याने त्या पब्लिक ग्रुपमधल्या पोस्टवरुन सुहासरावांनी नजर फिरवली. अनेकजणी तावातावाने मुद्दे मांडत होत्या, खोडत होत्या. कुणी आपणच कशा प्रगत आहोत हे सांगत होत्या तर कुणी त्या कशा मागास आहेत हे सांगत होत्या. इतक्यात एका फोटोने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यात एका बुटीकवाल्या मॅडमनी नवीन फॅशनची पोस्ट टाकली होती. त्यात ब्लाऊजच्या मागे अमुक तमुकची बायको अमुक तमुकची वधू वगैरे लिहिलेलं होतं. ही करंट फॅशन आहे, असं त्यांनी त्यात आवर्जून लिहिलं होतं.  

“अरेच्चा, अशीही फॅशन आली आहे वाटतं..”

सुहासराव मनाशीच पुटपुटले. त्याखाली असलेल्या कमेंट्स तर त्याहून भारी होत्या आता आपण कसं बदललं पाहिजे, कसं मॉड राहिलं पाहिजे, नवीन फॅशन कशी स्वीकारली पाहिजे वगैरे गोष्टींचं हिरीरीने समर्थन सुरू होतं. सुहासराव विचार करत राहिले.

“फॅशनचा स्वीकार करणं काही गैर नाही, पण आपल्यासाठी फॅशन की फॅशनसाठी आपण ?

कंटाळून त्यांनी फेसबुकही बंद केलं आणि फेरफटका मारावा म्हणून खाली पार्किंगमध्ये आले

तोच समोरच्या गुप्तावहिनी त्यांना पाहून म्हणाल्या,

“अंकल, सुलूआंटी कशा आहेत? दिसल्या नाहीत गेले दोन दिवस!”

“सुलू बरी आहे आणि घरी आहे.”

आपल्या नेहमीच्या सवयीने उत्तर दिलं आणि तेवढ्यात त्यांच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला!

“ओह, हे असं आहे तर ...!”

म्हणजे या गुप्तावहिनीच बहुधा सूत्रधार असाव्यात. चौकशी करून त्या वळल्या मात्र आणि त्यांच्या पाठीवरची अक्षरं सुहासरावांना दिसल्याशिवाय राहिली नाहीत,

“विक्रमची बायको!”

ते तडक घरी आले आणि त्यांनी बायकोला हाक मारली.

“सुलूsssssssssss ! माय डियर सुलू...”

बायको आल्यावर त्यांनी सुनयनालाही बोलावलं आणि म्हणाले,

“बरं, सुहासची बायको आणि सुहासची बहीण काय म्हणतेय?”

दोघीही एकदम चमकून सुहासरावांकडे बघतात.    

हे बघा, उद्याच्या उद्या दोघीही पार्लरमध्ये जाऊन या. काहीही हरकत नाही, पण एक लक्षात ठेवा आधुनिकता म्हणजे फक्त बाह्यरूप नव्हे. सौंदर्य म्हणजेच सर्वस्व नव्हे. तुम्हाला कुणी आंटी म्हटलं म्हणून तुम्ही आंटी किंवा काकूबाई ठरत नाही. प्रत्येकाची मान देण्याची एक विशिष्ट पद्धत असते. एखादा असतोही नाठाळ, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याएवढे आपण प्रगत असायला नको का? नाहीतर मग राहणीमान मॉडर्न आणि विचारसरणी मात्र मागास, असं होईल ना ?

“हो,पण लोक ...”

“लोक? संत तुकोबाराय काय म्हणतात पहा,

लोक जैसा ओक, धरिता धरवेनां ।

अभक्ता जिरे ना, संतसंग॥    

मनाचे खेळ आहेत सगळे. सोडा बघू राग आता आणि मस्तपैकी हसा बघू.”

  दोघीही मनापासून हसल्या. अगोदरच्या वादळवार्‍याचं रूपांतर आता मस्त झुळकीत झालं होतं. त्या झुळकेसरशी आतून येणारा फक्कड चहाचा सुगंध अलगद हॉलमध्ये पसरू लागला होता. सुहासरावांनी रेडिओ ऑन केला तर हृदयनाथ गात होते___ 

 

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या, बाहूंची

तू ssssssssssss  तेव्हा तशी ssssssss !

 













~ अनिल विद्याधर आठलेकर,

   मो. : 9762162942

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !