पर्बा हा काही तसा पिढीजात गवंडी नव्हे, पण परिस्थितीला त्याला दुसरं काही बनवणं शक्य नसल्यामुळे गवंडी बनवलं असावं. पर्बाचं नाव खरं तर प्रभाकर पण नाव केंडून घेण्याच्या पद्धतीमुळे तो गावभर पर्बा या नावानेच ओळखला जात असे इतका की स्वतःच खरं नाव जवळजवळ विसरूनच गेला होता. पर्बाला जन्माला घालत असताना परमेश्वर बहुधा फेसबुक वापरत असावा अन्यथा इतक्या ठिकाणी डागडुजी बाकी राहिली नसती यामुळेच की काय परिस्थितीने त्याला दुसऱ्यांच्या घराची डागडुजी करण्यासाठी घडवले असावे.

पर्बाला इकडून तिकडून ऐकलेले भारी भारी शब्द वापरायची खूप आवड मग भले त्या शब्दाचा अर्थ माहिती असो वा नसो. असाच कुठेतरी पर्बाला 'विनामूल्य' हा शब्द सापडला असावा. एकदा का एखादा शब्द सापडला की त्याचा पुरेपूर वापर करण्यात नंतर परबा अजिबात कसर ठेवीत नसे, याबाबतीत साक्षात कर्णही त्याचा हात धरू शकला नसता . एकदा आमच्या घरच्या ओट्याचं काम निघाल्यामुळे आम्ही पर्बाला बोलावलं. आईने त्याला विचारलं:
''पर्बा, ओट्याचा काम करूंचा आसा, येशीत काय रे?''
प्रश्न विचारला गेल्यावर नेमक्या त्याच प्रश्नाचं उत्तर पर्बाकडून येईल याची काही शाश्वती नसे. पर्बाच्या कानपूर लाईन्स टाकत असताना परमेश्वराने केलेल्या हलगर्जीचा हा परिणाम! त्यामुळे प्रश्नांच्या नशिबी अनेकदा भलतीच उत्तरे यायची. गाडी रूळ सोडून खाली पडायचा धोका लक्षात घेऊन आईने पुन्हा (यावेळी मोठ्या आवाजात) विचारलं :
''पर्बा, ओट्याचा काम करूंचा आसा, येशीत काय रे?''
"होय वैनी, तू काय्येक काळजी करू नको, सगळा काम विनामूल्य करून देवया....''
वेगवान गोलंदाजाने नुकतंच शिकलेलं यॉर्करास्त्र बेफिकिरीने एखाद्या फलंदाजावर सोडावं त्याच बेफिकिरीने अर्थाची पर्वा वगैरे मुळीच न करता पर्बाने नुकताच पकडलेला तगडा शब्द आमच्या तोंडावर फेकून मारला..
~ अनिल वि. आठलेकर

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !