ठाव नाही घेतला केव्हा मनाचा
ठाव नाही घेतला केव्हा मनाचा
भरवसा द्यावा तरी कोणी, कशाचा ?
कासवे हसतात आता शर्यतीला
जन्म हा म्हणतो नको, वंशज सशाचा
नावही बहुधा पुढे बुडणार आहे,
नेमका करणार तू धावा कुणाचा ?
केवढी जादू तुझ्या हातात आहे,
नाचवत आहेस घोडा कागदाचा
चिंब भिजलो केवढे छत्रीत आपण
दोष नाही त्यात काही पावसाचा
रंगली बागेत चर्चा ही दिवसभर
काढला काटा कुणी रात्री फुलाचा ?
काळजी घे नीट आता आपलीही
काळ आहे फार उलट्या काळजाचा ...
~ अनिल विद्याधर आठलेकर
Comments
Post a Comment