फणसासारखी माणसा : मुकुंदा



          


"आसय काय गे घरात?"


बाहेर धोधो पडणार्‍या पावसाच्या सरींबरोबर कोसळत एक आवाज भिंतींच्या मर्यादा ओलांडत बेबीआज्जीच्या कानापर्यंत येऊन पोहचला.

" भर दुपारी दत्त म्हणून कोण नेमका दरवाजात आलाय देव जाणे," असं पुटपुटत बेबीआज्जी पुढच्या दारी आल्या.

"मुकुंदा ? अरे, आज कसा काय वेळ गावला तुज इकडे यायस ?"

आज्जीने आश्चर्यानं विचारलं. मुकुंदा ! वर्तुळाशी स्पर्धा करेल असं गोल तुळतुळीत डोकं, गाठ मारून ठेवलेली लांबलचक शेंडी, धारदार नाक, जाड भिंगांच्या आडून भिरभिरणारे शोधक डोळे, अंगात कोणीतरी फारीनवरून आणलेला कोट आणि ढोपरापर्यंत येणारं धोतर सावरत डाव्या हातात छत्री आणि उजव्या हातात आपलं चंबूगबाळं असं एकूण ध्यान असणारा हा साठीपार माणूस म्हणजे शेजारच्या गणू गोर्‍याचा एकुलता एक कुलदीपक. गोर्‍यांच्या घराचं घरटान झालं तरी मुकुंदा अजून इथे येतोच, नेहमी नाही पण अधूनमधून.

"आलो असाच आपला. तू कशी हास? बरी मगे ?

मुकुंदा तसा सहजासहजी दाताला लागणारा गडी थोडाच
होता
? त्याने लगेच प्रतिप्रश्न केला. 


"मज काय धाड भरतेय ? मी आहे बरी. तू विषय बदलू नकोस. लोकांस शेंडी लाव पण माझ्याकडे तुझी डाळ शिजायची नाय.” स्टीलच्या चकचकीत तांब्यात पाणी आणि भांड्यातला गूळ त्याच्या समोर ठेवत आज्जी म्हणाली.

"माझा काय गे ? 'बायल नाय बिर्‍हाड नि बोचास लागला शिराड' अशी गत! पृथ्वीच्या पाठीवर जिथे पोटास काहीतरी मिळेल तिथे र्‍हायचा, झाला. इकडेच आलो होतो विजयादुर्गेस, म्हटला बेबीआज्जीसय बघून जावया. "

मुकुंदा जरी वरुन तसा धडधाकट दिसत असला तरी त्याच्या मनात, खोल आत कुठेतरी त्याच्या तरुणपणी झालेल्या घावाने त्याचं एकूण जगण्यावरूनच मन उडालं होतं. त्यानंतर अचानक गणू गोरे आणि कुटुंब कारवारात जाऊन स्थायिक झालं. होता होता त्याचं लग्नाचं वयही उलटून गेलं तरी याने लग्न करण्यात मुळीच रस दाखवला नाही. कालौघात गणूकाका आणि काकूही निवर्तल्या. तेव्हापासून मुकुंदा अख्खं कोकण पालथं घालत फिरायचा. कोणीतरी आठ दहा जणांचा स्वयंपाक करणं त्याला शिकवलं आणि त्याच्या उदरनिर्वाहाची थोडीफार सोय झाली. नारदाप्रमाणेच सर्वत्र याची भ्रमंती असल्याने त्याला ब्राह्मण भोजनाची कामं मिळत आणि त्यातून तो आपलं पोट भरत असे. स्वभावाने मनमिळाऊ, कुणासोबतही सहज मिसळून जात असल्याने त्याला कोणीही सहज सोबत घेऊन जात असे. आमच्या गावाशी मात्र त्याचा विशेष ओढा. आईवडिलांनी घर सोडल्यानंतरही त्याची गावाशी असलेली नाळ तुटली नव्हती.

“बरा, बरा, तू काय बोलायस मज आईकतलास? फणसाची भाजी आणि आंब्याचा रायता आहे, देऊ तुज?”

बेबीआज्जीचा मुकुंदावर पहिल्यापासून जीव. लहान असताना तिच्या कडेवरून कितीदातरी त्याला तिने बागायत फिरवली होती.

“अगे विचारतेस काय ? तुझ्या हातचा रायता त्या बिल क्लिंटनासपण मिळायचा नाय. आज माझ्या नशिबात राजयोग आहेसा दिसतोय, ह्या ह्या ह्या ....”

विनोदाआड दु:ख लपवणं ही एक कला आहे असं म्हटलं तर मुकुंदाला त्यातलं नोबेलच द्यावं इतका तो त्यात मुरलेला होता.

पण जेवायस वेळ आहे मा? मी तोपर्यंत बागायतीत फिरून येतो गे!”

   बागायतीत फिरणं हा मुकुंदाच्या अत्यंत आवडीचा विषय. उतरत्या स्वरुपाच्या बागायतीच्या शेवटी एक व्हाळ वहायचा. बागायतीच्या सुरुवातीला उभं राहिलं की तिथून तो दिसायचा, वरून बघताना तो व्हाळ जणू बागायतीचे पाय धूत जातोय असंच वाटायचं. शाळेतून घरी आल्यावर मुकुंदा कितीतरीवेळा तासनतास इथे बसायचा. झाडांशी बोलायचा. निसर्गाच्या कुशीत राहणार्‍यांचं बोलणं झाडांना कळतं. मुकुंदाचंही कळायचं. बागायतीत सर्वात शेवटी व्हाळाच्या काठी एक मोठ्ठं उंडलीचं झाड होतं. तिथे तो बसायचा, व्हाळात पाय सोडून. तिथं माडा-पोफळींचं गाणं ऐकायचा. तिथे बसल्या बसल्या त्याचंही मग झाड व्हायचं. त्याचं हृदय झाडाचं होतं. म्हणूनच कदाचित जगाच्या चालीरीती त्याला सहज उमगायच्या नाहीत. आपल्याला लळा लावणार्‍यांवर ती विश्वास ठेवतात. झाडांकडे छक्के-पंजे नसतात. त्याच्याकडेही नव्हते. त्यामुळेच तो फसला, कायमचा. 

  मुकुंदा साधारणपणे दहा-बारा वर्षांचा असेल त्यावेळेची गोष्ट. मुकुंदाला जत्रेचं खूप वेड होतं. एकदा शेजारच्या गावात जत्रा आहे, आपण सगळे मिळून तिथे जाऊ, असं त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं. त्याला आनंद झाला. तो सोबत जायला तयार झाला तेवढ्यात मित्रांनी तिकडे एक पैसे दुप्पट व्हायचा एक गेम असल्याचं सांगितलं. जाताना भरपूर पैसे सोबत नेले तर येताना दुप्पट पैसे मिळतील, या प्रलोभनाने त्याला भुरळ घातली आणि कधी नव्हे ती मुकुंदाने घरात चोरी केली. वडिलांनी किडूकमिडूक करून गोळा केलेले पैसे एका दमात त्याने उचलले आणि जत्रेला मित्रांसोबत रवाना झाला. ज्या झाडांना फळं लागतात त्यांच्या नशिबी दगडच येतात, हे काही खोटं नसावं. मुकुंदाचे पैसे कधी दुप्पट झालेच नाहीत आणि होते ते परतही मिळाले नाहीत. दुसर्‍या दिवशी प्रचंड दुखवला गेलेला मुकुंदा घरी परत आला, तो तोंड पाडूनच. त्यादिवसापासून त्याने जगाशी व्यावहारिक संबंध तोडला. तो जे बोलायचा ते केवळ औपचारिकता म्हणून. त्याच्या आतलं झाड दुखावलं होतं, माणसांवर आता विश्वास ठेवण्यास ते तयारच नव्हतं. तिथून पुढे मुकुंदाच्या विश्वात भविष्यकाळ नव्हताच, तो जे जगायचा, बोलायचा ते सगळं त्याच्या भूतकाळात. बेबीआज्जी हे त्याच्या भूतकाळातलं एक महत्वाचं मदिर होतं म्हणून तिथं आवर्जून तो पाया पडायला यायचा.

   बागायत फिरता फिरता तो उंडलीपाशी आला, तिला घट्ट मिठी मारली. झाडं दगा देत नाहीत. उंडलीच्या खोडाच्या स्पर्शाने तो सुखावला. नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि व्हाळाला जाऊन मिळाले. व्हाळ वाहतच होता निसर्गनियमाप्रमाणे. त्याने व्हाळात पाय सोडले, माडा-पोफळींचं गाणं ऐकलं. त्यात अजूनही माधुर्य होतं.

“झाडं दगा देत नाहीत...”

तो पुटपुटला. उंडलीच्या झाडाने दिलेला ओलावा कोणत्याही माणसाने दिलेल्या हजार जखमांवर मलमपट्टी करणारा होता. लहानपणी मिळालेल्या एका दग्यापुढे त्यानंतर त्याच्या मनावर झालेल्या हजार जखमांचं त्याला भानच नव्हतं, पण या ओलाव्याने त्याही बर्‍या झाल्या. त्याने व्हाळात सोडलेले पाय अलगद वर घेतले आणि त्याच्या लक्षात आलं. बेबीआज्जीचं एव्हाना जेवण तयार झालंही असेल. तिच्या हातचं रायतं आणि फणसाची भाजी खायची म्हणजे पर्वणी ....

 

“अरे मेल्या, तिकडे गेलास तो तिकडेच चिकटलास! तुझी वाट बघत माझा इकडे वाळवण झाला, तेचा काय ? बस, वाढलाय सगळा आणि जे हवाय ते मागून घे, तुज काय हे घर परक्या नाय !       

आज्जी तिच्या खास शैलीत मुकुंदावर खेकसली.

मुकुंदा भरपूर दिवसांनी मनसोक्त जेवला. त्याक्षणी मुकुंदाच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहिला असता तर, भूक या शब्दाची आणि भावनेची व्याख्या करणं शास्त्रज्ञांनाही जमलं नसतं. समोर असणार्‍या केळीच्या मुळात मुकुंदाने हात धुतले.    

“येतो गे..”

अन्नपूर्णेला नमस्कार करत मुकुंदा म्हणाला.

“आता कधी ?”

निरोप देताना आज्जीचेही डोळे नकळत पाणावले होते.

“ ते मज तरी कुठे माहिताय? येतलो इतक्या नक्की मात्र ....”

 

बोलता बोलता मुकुंदाने वहाणा पायात सरकवल्या आणि तो निघालादेखील. पुन्हा हजार जखमा होतील, पुन्हा मुकुंदा गावी येईल, पुन्हा उंडलीच्या झाडाला मिठी मारेल. पुन्हा त्याचे अश्रू वाहतील. हे सगळं पुन्हा पुन्हा होत राहील ...

 

कारण त्याला फक्त इतकंच माहीत आहे ___

 

झाडं दगा देत नाहीत!

 

@अनिल विद्याधर आठलेकर      


Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !