आज सकाळी जरा लवकरच जाग आली. खरं तर काल विधानपरिषदेचा निकाल अतिशय रंगतदार झाल्यामुळे की फेसबुकी विचारजंतांच्या पोस्टस् वाचण्याच्या हुक्कीमुळे कोण जाणे. आमच्या कोकणात साधारणपणे राजकारण हा तोंडी लावायचा विषय असतो. म्हणजे खिशात दाणा नसला तरी आम्ही अमेरिकेच्या अध्यक्षाला सद्दाम हुसेनविरुद्ध काय करायला हवं होतं, हा सल्लाही न विचारता देऊन टाकतो, पण ही चर्चा घरात करण्यात अर्थ नसतो. त्यासाठी गावातलं एखादं टपरीवजा हाटेल, पार किंवा गेला बाजार पडक्या घरटानाची जागाही चालते. तिथे मग आंतरराष्ट्रीय चर्चासत्र भरतं. विषय वैज्ञानिक असो वा राजकीय, मत ठोकून द्यायला आपल्या बापाचं काय जातंय, हा एकूण खाक्या! अशावेळी दूध घातलेला असला तर ठीक नाहीतर कोरा चहाही चालतो पण चर्चा मात्र फक्कड, अगदी शंभर नंबरी! गेल्याच आठवड्यातली गोष्ट सहज म्हणून पेपर आणायला नाक्यावरच्या राजू भुस्कुट्याकडे गेलो तर तिथे बाबी खोत दत्त म्हणून उभा. दोघांची घनघोर चर्चा चालू होती.
“बाबी, तुम्हास काय वाटते? कोरोनाची पुढची लाट येईल काय हो?” राजून बॉल टाकलान.
“शिरा पडली! कोरोना-फिरोना आता काय येत नाय, तो गेला कंटाळून. आता सगळे आपल्या मनाचे आणि राजकारण्यांचे खेळ. भित्यापाठी ब्रह्मराक्षस!”
राजकारण हा विषय आला म्हणताच मी हळूच तिथून निसटलो, कारण एकदा त्यात अडकलो असतो तर किमान पुढचे दोन तास तरी मी तिथून हलू शकलो नसतो.
आजची एकूण परिस्थिती बघता बाहेर पडायचं की नाही या विचारात होतो, कारण विधानपरिषदेची निवडणूक आणि त्यानंतरचा गोंधळ यावर गावकरी बोलले नसते तरच नवल! मनाची तयारी करूनच हळूच भुस्कुट्याच्या पेपरस्टॉलवर पोहोचलो. बघतो तर तिथे कुणी नाही, म्हणून पेपर घेऊन हळूच निसटणार तोच पाठीवर एक दणदणीत थाप बसली आणि मागून एक भारदस्त, खमका आवाज आला,
“अहो जावयबापू, पळताय कुठे? असेच जर आपले मावळे मागच्या मागे पाठीला पाय लावून गनिमांना घाबरून पळाले असते, तर स्वराज्य कधी मिळाले असते काय हो?”
अंतू बर्वा ! झालं ! आता कसली होतेय सुटका ? अंतूशेठच्या बोलण्यात दहा हजार हत्तींचं बळ असतं. मी एकटा पामर त्यापुढे कुठे पळणार ? गनिम लेचापेचा नसल्याने, आलेल्या प्रसंगाला तोंड देणं भाग होतं.
“ह्या ह्या ह्या .. नमस्कार अंतूशेठ, कसे आहात ?”
“हुं मजा मां छू ! तमे केम छो ?”
“बाप रे ? अंतूशेठ, आज एकदम गुजराती ?”
“हे बरे हो तुमचे! आम्ही बोललो तर चालत नाही, पण तुमची माणसं राहिली तर कशी चालतात हो त्यांच्या हाटेलात ?” असं म्हणत आपल्या फरड्या आवाजात भुस्कुट्याला ऑर्डर गेली, “राजूशेठ, दोन फडफडीत चहा द्या बघू !”
“तुमच्यापर्यंत पोहोचली पण बातमी ?” मी अंतूशेठना विचारलं.
“तसे नेहमी फाष्टच हो आम्ही ! आमच्या कपड्यावर जाऊ नका, तुमच्या डिशी आल्या तरी आमचा अॅंटेना अजून शाबूत आहे. कावळा बसणार नाही अशी फांदी नाही आणि आमचे खबरे नाहीत अशी जागा नाही जावयबापू !”
अंतूशेठ बोलू लागले की त्यांच्या तोंडून सरस्वती गंगेसारखी वाहते.
“सगळा खेळखंडोबा आहे नुसता !” मी.
“छे छे छे छे... हे मराठीतले छे हो नाहीतर गुजरातीत ऐकाल.. ख्या ख्या sss खेळखंडोबा कसला कर्म आहेत हो आपली. आमचे आमचे म्हणायचे आणि ह्यांनीच आमचे मोजायचे ... ! इंद्र काय चंद्र काय ..अहो राजकारण आहे की सिंधुदुर्गातला दशावतारी नाटक ? ते पार्टी तरी बरे रात्रीच रंग लावतात आणि प्रामाणिकपणे खेळ करतात. ह्यांचे तासातासांचे रंग वेगळे !”
“चालायचंच, राजकारण म्हटलं की ___”
“अहो कसला कपाळाचा राजकारण ? कोणाची अंडी कुठे आहेत हे त्यासच ठाऊक नाही आणि हे चाललेत नुसती पोल्ट्री फार्मची उद्घाटना करत ! बाकी तो देवेन्द्र मोठा हुशार निघाला हो ! ‘परफेक्ट कारेक्रम’ की काय म्हणतात तोच केलान, पाटकनी ... ख्या ख्या ख्याsssssssssssssss”
“तुम्हास बर्या खबरी लागतात हो सगळ्या sssssss”
“ठेवाव्या लागतात! नाहीतर ह्या म्हाताऱ्यास तुम्ही कधी विकून खाल सांगता यायचे नाही.”
“ते जाऊ द्या, तुमचे मत कोणास अंतूशेठ ?”
“ते विचारू नकोस. पडत्या फळाला स्वत:ची मर्जी नसते आणि असली तरी ती त्याने ओरडून सांगायची नसते, कोणी कधी पळवून नेऊन एखाद्या हाटेलात डांबून ठेवील कळायचे पण नाही ! ख्या ख्या ख्याssssss ! बाकी सरकार कोणाचेही येउनदेत हो, आम्हास काय त्याचा फरक पडायचा नाही. आमचे बूड आम्हासच हलवाय्स हवे. तुम्ही आपले खुळे ..त्या तुमच्या २४ तासवाल्या बातमीवाल्यांना एक उद्योग नाही आणि तुम्हाला धंदा नाही ! हा इथे पडला, तो तिथे रडला .. सगळे एकाच माळेचे मणी. एकास झाकावा आणि दुसऱ्यास काढावा! बाकी, तुमचा कसा चाललाय ?”
“मजेतच रहा. निवडणुकीस वगैरे उभे राहू नकोत हो, नाहीतर कधी अण्णू गोगट्या होईल समजायचा पण नाही, वर तुम्ही म्हणणार ‘आम्ही हरलो म्हणजे ते जिंकले असा होत नाही !’ मेल्यानु, आवशीचा घोव म्हणजे बापूस नव्हे म्हटल्यासारख्या झाला हे ! शिव शिव शिव ... तेच्यापेक्षा आमचा गाव आपला बरा."
ऑर्डर देऊन बराच वेळ होऊनही चहा न आल्याने अंतू भुस्कुट्यावर जवळजवळ खेकसलाच,
"अरे ए भुस्कुट्या, आजच्या दिवशी चहा पाजणारेस की स्वर्गात गेल्यावर डायरेक्ट गंगा म्हणून तोंडातच ओतणारेस?”
एवढा वेळ आवरून ठेवलेला मूळ स्वभाव अंतूशेठनी दाखवलाच आणि हायसं वाटलं. हसत हसत दात पाडण्यात कोकणी माणसाचा हात कोणी धरू शकत नाही हे अंतूशेठनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. त्यात दोन-चार दात माझेही पडले तो भाग वेगळा!
“नको नको अंतूशेठ, कशाला ?”
“घ्या हो, कोकणातल्या माणसाकडे पैसा नसेल पण मन आहे हो, आभाळाएवढं. अधूनमधून काही ठिगळं पडतात आभाळाला, ती बुजवत तो आयुष्य घालवतो पण आदरातिथ्याला महाग नाही हो झाला अजून. घ्या आणि परत या. नवीन सरकार आलं तर अजून एक चहा हाणू! नाहीतरी आपल्या बापाचं काय जातंय? ख्या ख्या ख्या sssssssssssssss !”
बोलता बोलता चहाचे घोट संपवत अंतू आला तसा भरर्कन निघूनही गेला. विषय जिथल्या तिथे संपवून जाण्याची ही हातोटी खास होती! अशी माणसं सच्ची असतात, जे मनात ते ओठात! अशा माणसांना भेटत रहायला हवं कारण अशी माणसं नकळत आपल्याला आरसा दाखवतात. असा विचार करता करताच अचानक, त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी मोठयाने बोललो,
“अंतूशेठ, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन .. पुन्हा येईन !”
Comments
Post a Comment