तो परत आलाय : दिनेश कार्तिक द फायटर !
तो 'परत' आलाय !
______________
सकाळ होते म्हणता म्हणता रात्रच झाली तर ?
काळोखाची फक्त पालखी दारी आली तर ... ?
कल्पना करा! काय वाटेल ? काळोखानंतर उजेड आणि रात्रीनंतर पहाट होणे हा तसा निसर्गक्रम, पण असं झालं नाही तर? हे असं होऊ नये आणि आपल्याला ते भोगावं लागू नये अशी इच्छा सर्वांचीच असते, पण नियती कुणाच्या नियंत्रणाखाली असते का ? नशीब कुणाचं कधी ऐकतं का ? जर नियतीने कुणाचं ऐकलं असतं तर कृष्ण कुमार आणि पद्मिनी कृष्ण कुमार यांच्या मुलाची ससेहोलपट रोखता आली असती ना? तसं होणं हे विधिलिखित नव्हतं. त्यामुळे या दांपत्याच्या मुलाच्या नशिबात अनेक चढउतार आले. डोळ्यांसमोर काळोख दाटला, चटके सोसावे लागले, धक्के मिळाले, निराश झाला पण पुन्हा उभा राहिला. नशिबाशी दोन हात करण्यास पुन्हा सज्ज झाला. त्याचं करियर संपलं संपलं म्हणेपर्यंत पुन्हा उगवला. अशा या जिद्दी मुलाचं नाव आहे - कृष्ण कुमार दिनेश कार्तिक ! होय, आपला यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक !
तमिळनाडू राज्यात चेन्नईमध्ये ०१ जून १९८५ रोजी जन्मलेल्या दिनेशचे वडील कृष्णकुमार प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते आणि आपल्या मुलानेही क्रिकेटमध्येच नाव कमवावं अशी त्यांची इच्छा होती. सुरूवातीला वडिलांच्याच देखरेखीखाली क्रिकेटचे धडे गिरवल्यानंतर माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू रॉबिन सिंग यांच्याकडे त्याने प्रशिक्षण घेतलं. सुरूवातीला फक्त फलंदाज असणाऱ्या दिनेशने काळाची गरज ओळखून यष्टीरक्षणही शिकून घेतलं. लवकरच त्याची निवड तमिळनाडूच्या U-19 संघात झाली. या काळात त्याने केलेल्या उत्तम राष्ट्रीय कमगिरीनं निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि २००४ साली त्याची निवड भारतीय एकदिवसीय संघात झाली तीही केवळ वयाच्या १९ व्या वर्षी!
कार्तिक एक एक यशाच्या पायऱ्या चढत होता. नजर लागेल अशी त्याची घोडदौड सुरू होती. सन २००४ मध्ये त्यानं भारतीय संघात पदार्पण केलं. तो संघातील आपली जागा पक्की करणार, इतक्यात महेंद्रसिंग धोनी नावाचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज संघात आला. सन २००४ च्या उत्तरार्धात धोनी टीममध्ये आला खरा पण मग त्यानं तिथून मागे वळून पाहिलंच नाही. कार्तिकच्या देशांतर्गत उत्तम कामगिरीनंतरदेखील धोनीच्या धडाक्यामुळे त्यालाच झुकतं माप दिलं गेलं आणि कार्तिक आत-बाहेर होत राहिला. २००७ ला धोनी संघाचा कप्तानही झाला आणि तो संघात नसताना त्याला पर्याय म्हणून मग कार्तिकचा विचार होऊ लागला! धोनीला सिनियर असणारा कार्तिक नंतर फक्त धोनीला पर्याय बनून राहिला, हा दैवदुर्विलास नाही तर काय आहे ?
बरं, हे इथं थांबलं असतं तर ठीक होतं, पण पुढे बरंच काही घडायचं होतं. आपली बालपणीची मैत्रीण निकिता वंजारा हिच्याशी त्याने २००७ साली लग्न केलं. भारतीय संघात आत-बाहेर असणं सुरू असलं तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरी करत होता आणि म्हणूनच त्याला तमिळनाडू संघाचा कप्तानही बनवण्यात आलं. एकूण राजकुमारसारखा सर्व प्रवास सुरू असताना कुठे माशी शिंकली देव जाणे. दिनेशचा मित्र व एकेकाळचा तमिळनाडूचाच संघसहकारी, माजी भारतीय क्रिकेटपटू मुरली विजय याचं आणि दिनेशच्या पत्नीचं अफेयर सुरू झालं. कार्तिकला याची काहीच कल्पना नव्हती. एके दिवशी मात्र निकीताने बॉम्ब टाकला. आपण मुरली विजयच्या बाळाची आई होणार असून आपल्याला घटस्फोट हवा असल्याचं तिनं कार्तिकला सांगितलं. कार्तिकला काय वाटलं असेल, कल्पना करा. बालपणीची मैत्रीण आणि संघसहकारी, मित्र दोघांनीही धोका दिला होता ! बायको आणि मित्र यांचं अफेअर?? विश्वास ठेवावा तरी कुणावर ? तरीही तो उभा राहिला !
असं सगळं चाललेलं असताना त्याच्या आयुष्यात दोन चांगल्या गोष्टी घडल्या एक म्हणजे त्याला दीपिका पल्लीकलच्या रूपाने मिळाली त्याची योग्य सहचारिणी ! म्हणतात ना, ‘भगवान के घर में देर होती है, पर अंधेर नही!’ त्याच्या सुदैवाने त्याला भेटली स्क्वॅश प्लेयर दीपिका पल्लीकल ! दीपिकाशी ( हे नावच तसं खतरनाक आहे नाही ? मग तो खेळ असो की बॉलीवूड!) मैत्री झाल्यावर डीकेचं आयुष्यच बदललं. हजारो मैल पसरलेल्या वाळवंटात अचानक ‘ओऍसिस’ दिसावं, महासागरात भरकटलेल्या गलबताला अचानक किनारा दिसावा तसं डीकेला झालं. दीपिका आणि दिनेश ही जणू परमेश्वराने आपल्या चुकीची केलेली सुंदर दुरूस्तीच! दीपिका आणि दिनेशने ऑगस्ट २०१५ साली लग्न केलं आणि ऑक्टोबर २०२१ला त्यांनी गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला!
दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा गेलेला फॉर्म आणि कॉन्फिडन्स परत आणण्याची गरज असताना तो भेटला त्याचा मित्र ( आणि नंतर फ्रेंड,फिलोसोफर,गाईड !) मुंबईचा खेळाडू अभिषेक नायर याला. अभिषेक नायरने दिनेशला त्याची फलंदाजी सुधारण्यात खूप मदत केली. कार्तिक त्याला आपला मेंटॉर मानतो. अभिषेकमुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला. दीपिकाच्या आणि अभिषेकच्या परिसस्पर्शाने डीकेला लय सापडली, तो पुन्हा धावा करू लागला, भारतीय संघात निवड झाली, आयपीएलमध्येही तो कोलकता नाइट रायडर्सच कॅप्टन झाला! तिथून पुढे अडचणी आल्या नाहीत असं नाहीच. नियतीची डीकेवर विशेष मर्जी असावी, पण आता सोबतीला दीपिका असल्यानं तो पुन्हा वर आला आणि यावेळी त्याने वयाच्या ३६ व्या वर्षी दोन स्वप्नं पाहिली. एक म्हणजे जवळपास ३ वर्षांनी(२०१९ नंतर २०२२ ) भारतीय संघात पुनरागमन आणि दुसरं म्हणजे अलिशान घर घेण्याचं स्वप्न! खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन फक्त आयपीएल ख्रेळायचं त्यानं ठरवलं होतं, त्यासाठी त्याने कमेंट्री क्षेत्रातही पदार्पण केलं, पण अभिषेक आणि दीपिकाने डीकेमधील फिनिक्स जागा केला! त्याला स्वप्न पहायला लावलं!
कुणालाही कल्पना नव्हती की आयपीएलचा २०२२चा हंगाम एक वेगळा डीके सर्वांना दाखवणार आहे. सीएसके डीकेला घेऊ इच्छित होती पण ऐनवेळी आरसीबीने बाजी मारली तेव्हा त्यांना तरी कुठे माहीत होतं की त्यांनी एबी ला पर्याय म्हणून डीके घेतलाय ! एबीडीच्या गैरहजेरीत खरं तर आरसीबी एक उत्तम फिनिशरच्या शोधात होती, त्यात माजी कर्णधार किंग कोहलीचा फॉर्म त्याच्याशी पाठशिवणीचा खेळ खेळत होता, अशावेळी डीके आरसीबीसाठी अल्लाउद्दीनचा दिवाच घेऊन आला! खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन एकहाती सामना फिरवू लागला. स्ट्राईक रेटही किती ? तर १८० -१९० च्या घरात ! डीकेचा अवतार भल्याभल्यांना चकित करणारा होता. त्याने एकामागोमाग एक केलेल्या जबरदस्त खेळी पाहून केवळ त्याच्या फॅन्सनाच नव्हे तर आजीमाजी दिग्गज खेळाडूंनाही म्हणावं लागलं,
“ ये बंदा इंडियन टीम में होना(ही) चाहिये!”
वय वर्ष किती ३७ ! क्रिकेटमध्ये दोन म्हणी कायम वापरल्या जातात. ‘एज इज जस्ट अ नंबर!’ आणि ‘फॉर्म इज टेंपररी, क्लास इज परमनंट!’ क्लास होताच त्याच्यामध्ये, फक्त नियतीच्या खप्पामर्जीमुळे नजरेआड होत होता, आयपीएल २०२२ने त्याला तो दाखवायची संधी दिली आणि त्याने ती साधलीदेखील! वयाच्या ३६ व्या वर्षी केवळ जिद्द, चिकाटी, मेहनत आणि परफॉर्मन्स यांच्या आधारे त्याची भारतीय टी२० संघात पुन्हा निवड झाली! तत्पूर्वी त्याने आणि दीपिकाने मेहनत करून, जिद्दीने त्याच्या स्वप्नातलं आलिशान घरही घेतलं आणि भारतीय संघात पुनरागमन करायचं त्याचं स्वप्नही आता पूर्ण होतंय.
होय, तो परत आलाय..
तो परत आलाय!
महत्वाच्या सामन्यात मायकेल वॉनला सूर मारत यष्टीचीत करून सामना फिरवणारा दिनेश परत आलाय, निदाहास ट्रॉफीमध्ये ८ चेंडूंमध्ये २९ धावा काढून भारताला अशक्यप्राय विजय मिळवून देणारा कार्तिक परत आलाय, इंग्लंड दौऱ्यावर ओपनिंगला येऊन भारताला कसोटी मालिका जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा डीके परत आलाय, शापित राजकुमार ते फिनिक्स असा प्रवास असणारा कृष्णकुमार दिनेश कार्तिक परत आलाय! आयुष्यात आलेल्या अनेक चढउतारांवर मात करून, तावून सुलाखून, केवळ कामगिरीच्या जोरावर, १०० नंबरी सोन्याच्या रूपात तो परत आलाय.
नियतीच्या नजरेला नजर भिडवणं म्हणजे काय असतं हे डीकेकडून कसं शिकावं याचं उदाहरण म्हणजे वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने टी०२० मालिकेत झळकावलेलं त्याचं पहिलं अर्धशतक ! कितवं - पहिलं ! कितव्या वर्षी ? ३७ व्या वर्षी ! पदार्पणानंतर तब्बल १६ वर्षांनंतर पहिलं अर्धशतक! नियतीही क्षणभर थांबून ज्याला सलाम करेल, दृष्ट काढेल असा जिद्दी, मेहनती योद्धा !
आलाय ...
तो परत आलाय !!



Comments
Post a Comment