आप्पा नावाचं आभाळ!
आई वडील म्हणजे आपल्या हृदयाचा हळवा कप्पा. आईविषयी बरंच काही लिहिलं जातं, लिहिलं गेलंय पण वडील तसे फारसे प्रकाशात येत नाहीत. आई आणि वडील दोघांच्याही उत्तम संस्कारामुळेच आपली मूर्ती घडत असते, आपण घडत असतो. आज फादर्स डे - पितृदिन त्यानिमित्ताने माझे वडील विद्याधर लक्ष्मण आठलेकर म्हणजेच आमचे 'आप्पा' यांच्याबद्दल चार शब्द ..
माझे वडील त्याकाळचे इंटर. त्यामुळे इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व. चेहरा करारी आणि वृत्ती बाणेदार. आमची आई कर्नाटकची असल्याने वडिलांना आम्ही भावंडे 'आप्पा ' म्हणत असू. आप्पांचं लग्न झालं तेव्हा महाराष्ट्रात कर्नाटकहून फार कमी मुली लग्न होऊन आलेल्या होत्या आणि ज्या होत्या त्यांच्या घरात कन्नड बोलण्यास
कडक विरोध होता. आप्पांनी मात्र आईला आणि नंतर आम्हाला कन्नड बोलण्याची मुभा दिली, कन्नडच नव्हे तर कुठलीही भाषा बोलण्यास कधीच विरोध असू नये कारण भाषा हे ज्ञानाचे द्वार आहे असं त्यांचं मत होतं. त्यामुळे, 'विरोध वृत्तीला करावा व्यक्ती वा भाषेला नव्हे' असं त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणूनच आज मराठी-मालवणी सोबतच गोअन कोंकणी तसेच कन्नड भाषा मी लिहू-वाचूही शकतो. इंग्रजीवरील त्यांच्या प्रभुत्वाचाही फायदा आम्हाला झालाच. शालेय अभ्यास कसा करावा याच मार्गदर्शन त्यांनी नेहमी केलं, अगदी अलीकडेपर्यन्त आप्पा खर्डा इंग्रजीमध्येच लिहीत असत.आज आमच्यात जे काही भाषाज्ञान आहे, लेखनकौशल्य आहे ते केवळ आप्पांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच. त्यांचा एकूण व्यासंग इतका दांडगा होता की किती आणि काय लिहिलं तरी कमीच असेल. त्यांनी इतकं ज्ञान दिलंय, इतकी शिकवण दिलीय की लक्ष्मी नसली तरी सरस्वतीची कृपा सदैव आहे.

दोन जाड भुवयांच्या मध्ये लावलेलं जाड कुंकू (पिंजर), भरदार मिशा, करारी नजर आणि खणखणीत आवाज असं व्यक्तिमत्व असलेले आप्पा मनाने तेवढे हळवेही होते. कोकणात पारंपरिक चालत असलेल्या कौटुंबिक वादविवादाना आमचं घरही अपवाद नव्हतं त्यामुळे आप्पांना मुंबईसोडून त्यांच्या आईसाठी (आमची आजी ) कोकणात, सिंधुदुर्गात यावं लागलं तरी त्यांनी अत्यंत हिंमतीने आम्हाला शिकवून मोठं केलं. पौरोहित्य असो वा कौलं परतण्याचं काम असो, अबोलीची रोपं पावसाळ्यात पुन्हा लावण्याचं काम असो की इंग्रजी-मराठी म्हणी-वाक्प्रचार समजावून सांगणं असो त्यांनी ते तितक्याच मेहनतीने, तन्मयतेने केलं आणि गावातही नाव कमावलं. आप्पांच्या विद्वत्तेचा आणि त्यांच्या शिकवणीचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांचं नाव माझ्या नावासोबत जोडलेलं आहे याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांचा शेवटपर्यंत आम्हाला आदरयुक्त धाक वाटायचा. अजूनही वाटतो.
लिहिण्यासारखं खूप आहे पण नाही अजून शब्दबद्ध करता येत. याच महिन्यात आप्पांना जाऊन दोन वर्षे झाली पण आप्पा त्यांच्या शिकवणीच्या, संस्कारांच्या रूपाने जवळच आहेत. सामान्यपणे कुणाला देवाज्ञा झाली की नंतर त्याचा तारा बनतो आणि तो आकाशातून आपल्याकडे बघत असतो असं म्हणतात. आमच्या जडणघडणीकडे नेहमीच लक्ष असणार्या आप्पांचं आभाळातूनही असंच लक्ष असणार आहे याची मला खात्री आहे.
आप्पा, तुमचं हे छत्र आम्हाला कायम हवं आहे. आप्पांनाच अर्पण केलेल्या 'मनाचा वॉर्डरोब' गझलसंग्रहातील आप्पांसाठीच लिहिलेली एक गझल :
आजही सज्ञान नाही बाळ बाबा
राहु द्या डोक्यावरी आभाळ बाबा
आठवांवर केवढे वळ देत आहे,
केवढा सोकावला हा काळ बाबा
नम्रतेचा होउ दे माझ्यात विक्रम
होत आहे वल्गना वेताळ बाबा
होत आहे मौन माझे एकतर्फी
भूक आहे फार ही वाचाळ बाबा
आधुनिक आहेत इथली सर्व पात्रे
आणि जपतो मी जुने घंगाळ बाबा
रोखतो आहे स्वतःला याचसाठी
आसवे आहेत ही ओढाळ बाबा
ही मनाच्या वॉर्डरोबातील घुसमट
ही मनाच्या आतली आबाळ बाबा ...!
~ अनिल विद्याधर आठलेकर

Comments
Post a Comment