मुखपृष्ठ किती महत्वाचं ?
''Don't judge a book by its cover!"
असं आपण कितीही म्हटलं ना, तरीही नाव किंवा लेखक अगोदर माहिती नसल्यास पुस्तक लक्ष वेधून घेतं ते दोन गोष्टींमुळे :
१. शीर्षक
२. मुखपृष्ठ
शीर्षकाबद्दल बोलायचं झाल्यास अनेकदा ती वेगवेगळ्या विचारातून आलेल्या प्रभावामुळे त्या त्या प्रकारे दिलेली असतात. कधी विषय तर कधी पात्र शीर्षकातून कळतं पण अनेकदा शीर्षक एक तर लहान अक्षरांत असतं किंवा त्याचं चटकन आकलन होत नाही. अशा वेळी मुखपृष्ठच लक्ष वेधून घेतं आणि ते पुस्तक उचलून घेत आत डोकावायला प्रवृत्त करतं. म्हणूनच मुखपृष्ठ हाही पुस्तकाचा एक महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. मुखपृष्ठ हे पुस्तकातील विषयाला पूरक असावं, समर्पक असावं. मुखपृष्ठ पाहताच पुस्तकात डोकावण्याचा मोह व्हावा असं असावं. प्रत्येक वाचकाची आवड निवड, रंगाकडे आकर्षित होण्याची वृत्ती वेगवेगळी असते. काहींना भडक रंग आवडतात तर काहींना सौम्य. माझं म्हणाल तर मला सौम्य रंगातली आशय-विषयाशी नातं सांगणारी मुखपृष्ठे फार आवडतात. पुस्तकाचा विषय किंवा आशय अगोदर माहिती नसल्यास मी तरी भडक मुखपृष्ठापासून जरा लांबच राहतो. रंग जेवढा डोळ्यांना सुखावणारा असेल तेवढा तो अधिक भावतो. (साहसकथा किंवा रक्तरंजित रहस्यकथा यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे अनेकदा भडक असतात, त्यावरून त्या विषयाचा अंदाजही येतो पण त्यामुळेच कदाचित एखादा भडक रंग न आवडणारा माणूस ते पुस्तक हाती घेण्याची शक्यताही मावळते असं मला वाटतं. )
एखाद्या पुस्तकालयात किंवा ग्रंथ प्रदर्शनात जेव्हा एखादा वाचक शिरतो तेव्हा त्याच्याकडे वेळ कमी असण्याची शक्यता असते. अशा वेळी सूचक आणि समर्पक मुखपृष्ठ त्याला अपेक्षित विषयाच्या पुस्तकापर्यंत पोहचवतं. यासाठीच मुखपृष्ठ सुटसुटीत, सूचक आणि समर्पक असण्याबरोबरच डोळ्यांना सुखावणारी उत्तम रंगसंगती असणारं मुखपृष्ठ पुस्तकाच्या यशातही काही प्रमाणात महत्वाचं ठरतं आणि वाचकाला एक वेगळाच आनंदही देऊन जातं. अनेकदा तर केवळ मुखपृष्ठ आवडलं ( किंवा एकूण बांधणी आवडली) म्हणून पुस्तकं संग्रही ठेवणारी माणसेही असतात. कारण वाचकांमध्ये ग्रंथप्रेमी आणि ग्रंथवेडे (बिब्लिओफाईल आणि बिब्लिओमेन : संदर्भ - 'लीळा पुस्तकांच्या' ) असे दोन उपप्रकार पडतात. दुसर्या गटातील माणसे या प्रकारे पुस्तके संग्रही ठेवण्यावर भर देतात. कधी कधी किंवा अनेकदा वाचक या दोन्ही गटांत एकाचवेळी मोडणारा असतो. अशावेळी मुखपृष्ठ नक्कीच महत्वाची भूमिका बजावते.
अजून एक मुद्दा असा की काहीवेळा चोखंदळ वाचक जाता जाता दुकानात फेर्या मारत असतो. वेळ कमी असल्यास तो लांबूनच एक नजर टाकून निघत असतो.विशेषत: बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनवरील बुक स्टॉल्स या गटात मोडतात. अशावेळी शीर्षकाबरोबरच मुखपृष्ठही सुंदर व सुबक असेल तर वाचक तिथे रेंगळतो आणि कदाचित ते विकतही घेतो. तीच गोष्ट ऑनलाइन पुस्तकविक्रीबाबत. इथे तर पुस्तक चाळायलाही वाव नसतो (अपवाद : बुकगंगासारखी संकेतस्थळे) अशा वेळी तर मुखपृष्ठ अधिकच महत्वाची भूमिका बजावतं असं मला वाटतं.
अर्थात, पुस्तकातील आशय, विषय दमदार आणि सकस आहेत हे गृहीत धरुनच मी हे मत मांडलं आहे. नुसत्या मुखपृष्ठाच्या सुबक व सुंदर असण्याने पुस्तक उत्तम ठरत नाही, ठरणार नाही पण केवळ लिखाण सकस आहे म्हणून मुखपृष्ठाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मात्र मोठी चूक ठरेल असं मला एक वाचक आणि एक ग्रंथप्रेमी म्हणून प्रामाणिकपणे वाटतं.
@अनिल विद्याधर आठलेकर

Comments
Post a Comment