‘अहवाल’ : मराठी गझलेचा खणखणीत उद्गार

 

   माणसाचं आयुष्य अनेक भावभावनांनी नटलेलं असतं, सजलेलं असतं. या भावभावनांची आंदोलनं, त्यांचं गारुड आणि त्यांची ओढ या सगळ्याचा परिणाम माणसाच्या प्रत्यक्ष जगण्यावर होत असतो. अपेक्षा, आकांक्षा, स्वप्नं ही याचीच काही रुपे म्हणता येतील ज्यांच्यामुळे मानवी जीवन सुलभ, सुकर होत असतं, सुसह्य होत असतं. अपेक्षाभंगाचं किंवा स्वप्नभंगाचं दु:ख म्हणूनच मोठं असतं. या दु:खावर मात करणं खूप कठीण असतं; पण जर स्वप्नांनाच धुडकावण्याची वृत्ती तुमच्या अंगी असली तर.. तर तुम्हाला त्या दु:खाचं काही वाटत नाही, कारण मुळात तुम्ही स्वप्नापेक्षा सत्यावर जास्त विश्वास ठेवता व सत्याचा सामना करण्याची ताकद अंगी बाळगता. ही वृत्ती हा तुमचा बाणा बनते. जगण्याकडे अधिक डोळसपणे पहायला शिकवते, जगायला शिकवते. म्हणूनच कल्याणचे ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य जेव्हा म्हणतात,

 

सुरुवातच आयुष्याची स्वप्ने धुडकावत केली

जगण्याची ही रणनीती मी तेव्हा अवगत केली ..

 

तेव्हा त्यांच्या ओळींमधील हा जोरकसपणा तुमच्या मनावरही ठसा उमटवल्याशिवाय राहत नाही.

 

       गझलसम्राट आदरणीय सुरेश भट यांच्या मार्गदर्शनाखाली गझल लेखनाची सुरुवात करणार्‍या काही महत्वाच्या शिलेदारांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे कल्याणचे प्रशांत वैद्य. साधारणपणे १९९० पासून सातत्याने गझल लेखन करणारे प्रशांत वैद्य हे मराठी गझल इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण पान आहे. आपल्या खणखणीत आणि सडेतोड शैलीसाठी ज्ञात असणारे वैद्य आज महाराष्ट्राच्याच नाही तर गोवा, कर्नाटक, गुजरात तसेच जिथे जिथे मराठी गझल आहे अशा जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचलेलं एक लोकप्रिय नाव आहे. केवळ आपलीच गझल कुरवाळत न बसता नवोदितांना नेहमी प्रेरणा देणारे, मार्गदर्शन करणारे प्रशांत वैद्य हे म्हणूनच दादा या संबोधनाने ओळखले जातात. प्रशांत वैद्य यांचा अहवाल हा गझलसंग्रह थोडा उशिरा म्हणजे २०१८ साली प्रकाशित झाला असला तरी त्यांची गझल मराठी रसिकांपर्यंत विविध माध्यमातून त्याअगोदरपासून पोहचत होतीच. विविध मुशायरे, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी मार्गाने त्यांची गझल मराठी रसिकांशी संवाद साधत होती. तरीही त्यांची गझल पुस्तकस्वरुपात येणे हे सर्वसामान्य मराठी गझल रसिकांसाठी, गझल अभ्यासकांसाठीही फार महत्वाचे होते. तो योग २०१८मध्ये आला, त्याविषयी शायर म्हणतात,

 

हो मीच ठेवला होता अहवाल गोपनीय माझा

ती कागदपत्रे आता मी खुली करावी म्हणतो !

 

  अहवाल गझलसंग्रह देखण्या व नेमक्या मुखपृष्ठापासूनच आपले म्हणणे थेट मांडण्यास सुरुवात करतो. असे म्हटले जाते की गझलमधील प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते. ही किमया गझलकाराला दोन ओळींमध्येच साधायची असते. वैद्य यांच्या गझला वाचल्यावर आपल्याला त्याची खात्री पटत जाते. एक एक शेर म्हणजे सुविचार ठरावा इतकी सुस्पष्ट समज प्रत्येक शेरातून आपल्याला व्यक्त होताना दिसते. वानगीदाखल हे काही शेर पहा ..

 

तुझा नि माझा तितका परिचय

जितके माझ्या अश्रूंचे वय

बेरजा होऊनसुद्धा शून्य मोठे होत आहे

हा न झंझावात आहे! हा तुझा एल्गार नाही !

त्या बहराचा दोष न काही, जो अवकाळी गळून गेला

ज्या झाडावर होता तो..त्या झाडाला आजार असावा !

 


     विषय कोणताही असो त्यातील मर्म जाणून तो नेमक्या शब्दात मांडण्याची हातोटी त्यांच्या विविध गझलांमधून दिसून येते. कल्पनाविलासाबरोबरच भोवतालच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवरही अचूक भाष्य करताना वैद्य डगमगत नाहीत. राजकाकारणी लोकांविषयी एका शेरात ते म्हणतात –

 

येथल्या सत्ताधीशांची आसवे आहेत स्वार्थी

जे न सत्ताधीश - त्यांचे हुंदके खोटे हरामी!

 

   करारीपणा, आत्मविश्वासपूर्ण कथन, रोखठोकपणा, विचारांची स्पष्टता, विषयवैविध्य ही वैद्य यांच्या गझलेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणता येतील. स्वभावत: अतिशय रोखठोक असणारे वैद्य तितक्याच रोखठोकपणे आपले म्हणणे मांडतात.

 

हजार सूर्यांच्या वस्तीतुन जातो माझा रस्ता

माझी वाट यमालासुद्धा परवडणारी नाही !

 

असं यमाला ठणकावून सांगणारे वैद्य अजून एका शेरात म्हणतात,

 

संकटांनो घ्या तुम्ही हातात शस्त्रे

येत आहे चालुनी तुमच्यावरी मी !

 

    असे अनेक शेर अहवाल गझलसंग्रहात आहेत. त्यांच्या गझलेत जितका रोखठोकपणा आहे तितकाच हळुवारपणादेखील आहे. सौंदर्य, प्रेम, जवळीक व्यक्त करताना वैद्य जणू लेखणीला फुलाचा स्पर्श देतात. हे शेर पहा –

 

केवढा मी लाघवी होतो कळेना

भेटले जे जे मला- माझेच झाले !

 

कधी अचानक एखादी सर इतकी नाजुक कोसळते की

असे वाटते एखादा पाऊस तिच्या प्रेमात असावा !

 

नवखी नाही तुझ्या मनाची वाट मला ही

तरी येउनी तुझ्या जवळ मी चुकतो आहे!

 

ऋतू कुठला तुझ्या दारी गडे रेंगाळतो आहे

तुझ्या शहरातला रस्ता फुलांनी वाहतो आहे !

 

   वैद्य यांची गझल अगोदरच्या पिढीशी नातं सांगणारी असली तरी नव्या पिढीशी तिचं खूप जवळचं आणि प्रेमाचं नातं आहे. एखादा प्रवास म्हटला की त्यात सहप्रवासी आले. सोबती आले. गझलचा एक वसा घेऊन निघालेल्या निष्ठावंताला तो वसा पुढे नेणार्‍यांविषयी जी तळमळ असते, प्रेम असते ते साहजिकच त्यांच्या गझलेत दिसून येते. वैद्य म्हणतात,

 

नवे सोबती छान मिळाले

गझलेला जिवदान मिळाले

 

प्रशांत वैद्य यांची लेखणी जशी सामाजिक, राजकीय दबावांना जुमानत नाही तशीच ती भाषिक बंधनही मानत नाही. परकीय भाषेतून आलेले परंतु मराठीत स्थिरावलेले बाय’, लेट’, थेट यासारखे इंग्रजी किंवा गजाली यासारखे मालवणी शब्द त्यांच्या गझलेत ते सहज वापरतात.

 

 

नम्र हा आदर्श आहे ठेविला सार्‍यांपुढे मी

शब्द माझे ताकदीने मी करूनी सेट आलो !

 

किंवा

 

आजच्या वाचस्पतींनो बौद्धिके झोडू नका रे

ऐकल्या आहेत आम्ही मोठमोठ्यांच्या गजाली !

 

   पूर्ण गझलसंग्रह एकापेक्षा एक सरस गझलांनी बहरलेला आहे. छोटी बहर असो वा मोठी, विषय नाजूक असो की गंभीर.. प्रशांत वैद्य यांची कल्पकता, विषयवैविध्य आणि सशक्त गझलियत कुठेही रसिक वाचकाला नाराज करत नाही. अहवाल वाचून झाल्यावर महत्वाचा दस्तऐवज हाती लागल्याचं समाधान रसिकाच्या चेहर्‍यावर नक्की उमटतं.

 

   या गझलसंग्रहातील गझला या वेगवेगळ्या काळात लिहिल्या गेलेल्या असल्याने शैली आणि भाषा यामध्येही त्याप्रमाणे पुढेपुढे हे बदल झालेले जाणवतात. वैशिष्ट्य हे आहे की आकलन होण्यात मात्र त्याची कोणतीही अडचण येत नाही. हेच बहुधा वैद्य गझलेला उद्देशून म्हणतात,

 

अजूनही तरुणाई माझी वयात आहे

उगीच का हे तुझ्याभोवती भिरभिरते मन ?

 

ज्येष्ठ गझलकार म.भा. चव्हाण यांची उचित प्रस्तावना लाभलेला अहवाल म्हणजे मराठी गझलेचा खणखणीत उद्गार आहे. प्रत्येक रसिकाने मनात जतन करून ठेवावा असा हा अहवाल आहे. प्रशांत वैद्य यांचा जरी हा पहिलाच संग्रह असला तरी त्यांची कितीतरी कागदपत्रे अजूनही गोपनीय आहेत ती सर्व त्यांनी लवकरात लवकर रसिकांसाठी अशीच खुली करावीत आणि आम्हाला असाच आनंद द्यावा हीच अपेक्षा ..

 

 __ अनिल विद्याधर आठलेकर,पुणे

 

गझलसंग्रह : अहवाल

प्रकाशन : संवेदना प्रकाशन, पुणे 

मूल्य : रु. १५०/-

Comments

  1. वाह👌🏻 खूप सुंदर परिचय करून दिला आहे पुस्तकाचा💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !