वृत्तबद्ध कविता, भाषा आणि शब्दनिर्मिती
भाषा हा कोणत्याही प्रकारच्या लेखनाचा आधार. संवादाचं माध्यम म्हणजे भाषा. आपण सारे जाणतोच की लिखित आणि बोलली जाणारी असे साधारणत: वापरानुसार भाषेचे दोन भाग पडतात. दुसर्या प्रकारात विशिष्ट असेचं शब्द येतील किंवा आले पाहिजेत असं काहीही बंधन नसतं, नसावं पण लिखित प्रकारामध्ये मात्र तसं असतं. (त्याची कारणं आणि स्पष्टीकणं नंतर पाहू, तो आताचा मुद्दा नाही. ) ही लिखित भाषादेखील कालानुरूप बदलत असते आणि त्याचवेळी त्यात नवीन भरही पडत असते. यावेळी अजून एक घटक या भाषाबदलाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे परकीय/द्वितीय भाषेचा प्रभाव. या सर्व मंथनातून अनेकदा होतं असं की दुसर्या भाषेतले सोपे शब्द आपल्या भाषेत घेतले जातात (बॉरोड). वापरानुकूलता हा निकष लावता ही एक स्वागतार्ह प्रक्रिया म्हटली पाहिजे पण याचवेळी अजून एक गोष्ट घडत असते ती म्हणजे आपल्याच भाषेतले पूर्वीचे शब्द हळूहळू कमी वापरले जातात. त्यामुळे अनेकदा पुढील पिढीला पर्यायी मराठी शब्दचं आठवत नाही. वाचन मर्यादित असेल तर ही अडचण अधिक परिणामकारकरित्या जाणवते. याला ठोस असा काही उपाय नसला तरी उत्तम वाचनाने तुमचं शब्दसंकलन वाढू शकतं, समृद्ध होऊ शकतं. याव्यतिरिक्त आणखी काही शक्यता आहेत का ? तर याचं उत्तर होय, असं आहे. कसं ते पाहू.
वर म्हटल्याप्रमाणे भाषा हाच कोणत्याही लिखाणाचा आधार असतो, भाषा हेच माध्यम असत. याच माध्यमाचा वापर करून हेच शब्द पुनर्वापरात आणता येऊ शकतात. लिखाणाचे गद्य आणि पद्य असे दोन मुख्य प्रकार लक्षात घेतले तर गद्यात तुलनेने भाषा वापराला, शब्द योजनेला सूट असते. मुभा असते. पद्यात (म्हणजेच सोप्या शब्दात - कवितेत) मात्र तुम्हाला जागा आणि आकृतीबंधाचं बंधन असतं त्यामुळे त्या त्या जागी चपखल बसणारा असा शब्द तिथे योजावा लागतो. आता, कवितेपुरता विचार केल्यास, स्फुट किंवा मुक्त कवितेत पुन्हा या शब्दयोजनेत शिथिलता/सूट असू शकते मात्र वृत्तबद्ध/छंदोबद्ध कवितेचा विचार करता इथे मात्र तुम्हाला अचूकतेकडे अधिक लक्ष द्यावं लागतं. केवळ यमकाला यमक (ट ला ट वगैरे !) जुळवून सचेतन रचना सिद्ध होत नाही तर त्यासाठी सकस आशयाला पूरक आणि सशक्त असा नेमका शब्द तिथे आला तर त्या रचनेची उंची वाढते. म्हणूनचं वृत्तबद्ध कवितेचं हे एक बलस्थान म्हणू शकतो की वृत्तबद्ध कवितेद्वारे विस्मृतीत गेलेले अनेक शब्द पुन्हा वापरात येऊ लागलेले आहेत. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे ; कारण नवनवीन हात वृत्तबद्ध कविता लिहू पाहत आहेत आणि त्यासाठी साहजिकच व्याकरणापासून ते शब्दसंग्रह वाढवण्यापर्यंत मेहनत घेत आहेत ( नसतील घेत तर घ्यायला हवीच!) आणि हे चित्र फार आशादायक आहे. भाषासंवर्धनात कवितेची महत्वाची भूमिका असतेच ती अशा प्रकारे जर साध्य होत असेल तर मराठीसाठी ही फार आनंदाची गोष्ट आहे. एक पाऊल पुढे जाऊन मी असंही म्हणेन की कधीकधी विषयानुरूप नवीन शब्दाची निर्मितीही ( coining a word) होत आहे. भाषावाढीच्या दृष्टीने हीदेखील एक महत्वाची प्रक्रिया आहे.
वृत्तबद्ध कविता लिहिताना म्हणूनच कवीने ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्यासाठी तशी मेहनतही घेतली पाहिजे. आशय, विषय, व्याकरण, शब्दकळा, शब्दनिर्मिती या सर्व महत्वाच्या बाजू आहेत. मराठी भाषेच्या संवर्धनाचा केवळ सप्ताह किंवा पंधरवडा साजरा करून काहीही होणार नाही त्यासाठी सर्वांनी हा ध्यास निरंतर घेतला आणि त्यानुसार आपल्या लिहिण्या-वाचण्यात त्याचा अंतर्भाव केला तर मला वाटतं असे सप्ताह जबरदस्तीने साजरे करण्याची वेळ आपल्यावर तरी येणार नाही.
_ अनिल विद्याधर आठलेकर
Comments
Post a Comment