अक्षरगणवृत्तात काटेकोरपणा का महत्वाचा आहे ?
मी अनेकदा ( गुणिले अनेकदा) सांगत असतो की अक्षरगणवृत्तात सूट घेताना विचार करा. कोणती सूट घेतल्यास चालेल, कोणती सूट त्या वृत्ताला पोषक नाही, याबद्दलही अनेकदा बोलत असतो. अनेकदा केवळ नवोदितच नाही तर प्रस्थापितांनादेखील हे थोडे जाचक वाटते, त्याहीपेक्षा अकारण वाटते. समोर बोलून दाखवत नसले तरी एकूण वर्तनावरुन ते लक्षात येतेच. असो.
ज्यांना निर्दोष, सकस आणि वैश्विक लिहायचं आहे तसेच ज्यांना नियम पाळणे म्हणजे अन्याय वाटत नाही त्यांच्यासाठी हा पोस्टप्रपंच. इतर मान्यवरांनी दुर्लक्ष (नेहमीप्रमाणे) केल्यास त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम.
आता मुद्दयाकडे वळू. आपण सर्वजण जाणतोच, अक्षरगणवृत्त म्हटले की त्यात दोन नियम प्रामुख्याने पाळावेच लागतात. त्यातील पहिला नियम म्हणजे योग्य 'लगक्रम,' अर्थात, र्हस्व-दीर्घ अक्षरांचा योग्य क्रम. अक्षरगणवृत्ताच्या व्याख्येत/लक्षणात सांगितल्याप्रमाणे या अक्षरांचा योग्य क्रम, ते वृत्त त्या नावाचेच वृत्त असण्यास महत्वाचा असतो. दुसरा अतिशय महत्वाचा आणि काटेकोरपणे लक्षात ठेवायलाच हवा असा नियम म्हणजे 'अक्षरसंख्या!' या नियमाकडे अनेकदा लोकांचे दुर्लक्ष होते आणि मग आपण लिहिलेली रचना अमुक एका वृत्तातच आहे असे ठामपणे संगितले जाते. वास्तविक, केवळ लगक्रम या एकाच मुद्दयाकडे नको तितके लक्ष दिल्यामुळे त्यात दुसरा महत्वाचा नियम नजरेतून/विचारातून निसटून जातो किंवा तो मुळात माहितीच नसतो. इथेच घोळ होतो.
★ कोणती सूट घ्यावी आणि कोणती घेऊ नये ?
वृत्तबद्ध कवितेचा विचार करता, मुळात मी सहसा सूट वगैरे घेत नाही आणि ती फारशी घेऊही नये असं मत मांडतो. याचं कारण असं की त्यामुळे पर्यायी शब्द शोधण्यासाठी आपण आपल्या मेंदूला त्रास देत नाही आणि तयार साच्यात सापडेल ती माती भरावी त्याप्रमाणे पटापट मिळतील ते शब्द 'भरत' जातो. मग सूट घेणे हे चूक किंवा पाप वगैरे आहे का ? तर त्याचं उत्तर आहे, 'मुळीच नाही !' सूट ही जेवणातल्या मीठासारखी आणि मीठाइतकीच असावी तर त्यात मजा, अन्यथा ती केवळ शाब्दिक उठाठेव वाटते किंवा ठरते. क्वचित अपरिहार्यता म्हणून, अर्थाचा अनर्थ होणार नाही याची दक्षता घेऊन र्हस्व अक्षर दीर्घ करणे किंवा दीर्घ अक्षर र्हस्व करणे, समजू शकते पण पूर्ण कवितेतच जर सूट घेतली गेली तर ती शब्दश: 'सुटसुटीत' कविता होईल.
◆ कोणती सूट घेऊ नये ?
वर अमुक एका अक्षरगणवृत्ताचे नाव दिले असेल आणि त्यातच आपण रचना करत आहोत/केली आहे असा दावा करत असाल तर तुम्ही 'लगक्रम' पाळत असताना अक्षरसंख्येच्या नियमाकडे दुर्लक्ष करणे अक्षम्य ठरेल. केवळ क्रम पाळण्यासाठी आणि पर्यायी शब्द न सापडल्यामुळे 'एक गुरु = दोन लघु' हा फंडा(!) वापरायचा तुम्ही विचार करत असाल, तर थांबा. यामुळे लगक्रम साधला गेला असं तुम्हाला वाटेल, पण मग अक्षरसंख्येचे काय ? अक्षरगणवृत्ताची मूलभूत अट काय आहे ? एका गुरुची दोन अक्षरे केल्यामुळे अक्षरसंख्या वाढेल आणि तिथे हे वृत्तभंग होईल, त्याचबरोबर लघु-गुरु क्रम (र्हस्व-दीर्घ अक्षरांचा क्रम ) बदलल्यामुळे पुन्हा, वृत्त बदलेल ! यामुळे होईल काय तर तुम्ही वर नाव दिलेलं असेल एक आणि लिहित असाल भलत्याच वृत्तात !
थांबा, एक उदाहरण देतो म्हणजे नीट समजेल :
आता या दोन ओळी पहा :
१) मित्रा तुझ्या कृपेने श्रीमंत आज झालो
२) सखया तुझ्या कृपेने धनवंत आज झालो
या ओळी वरवर पाहता तुम्हाला सारख्या वाटतील पण नीट निरखून पाहिल्यावर लक्षात येईल की दुसर्या ओळीत अर्थ तोच राहत असला तरी दोन ठिकाणी सूट घेतलेली आहे पण त्यामुळे अक्षरसंख्या तर वाढलीच आहे शिवाय वृत्तही बदललं आहे.
पहिली ओळ 'आनंदकंद' वृत्तातील असून दुसर्या ओळीत 'अनुराग' वृत्त आहे.
लगक्रम म्हणजेच सोप्या भाषेत या वृत्तांची लगावली पाहू :
*आनंदकंद : गा |गालगाल |गागा ! गा | गालगाल | गागा
*अनुराग : लल | गालगाल | गागा ! लल| गालगाल | गागा
म्हणजेच आनंदकंद नाव वर देऊन आपण रचना कोणत्या वृत्तात लिहिली ? 'अनुराग' वृत्तमध्ये! बरं, यातही सातत्य आहे का ? असेल तर अनुराग वृत्त म्हणता तरी येईल तीही नसेल आणि प्रत्येक ओळीत वेगवेगळी सूट घेतलेली असेल तर मग अधिकच कठीण होऊन जाईल.
म्हणून सूट घेताना हा सारासार विचार केला पाहिजे. जबाबदारीने लिहिलं पाहिजे. घोटाळा काय कुणीही करू शकतो, तो होऊ नये याची खबरदारी घेणं आपलं काम आहे.
आता नेहमी ऐकू येणार्या आक्षेपांच्या अंगाने विचार करता आपण दोन घटक पाहू :
◆ 'मग काय सूटच घ्यायची नाही का ? हे असले नियम काय कामाचे ? आमच्या भावना बघा ना,' वगैरे.
- आहेत ना, तुमच्या भावना महत्वाच्याच आहेत. तुम्हाला अपरिहार्यपणे सूट घ्यायची असेल, लिखाणाला नुकतीच सुरुवात करत असाल, शिकण्याचा प्रयत्न करत असाल, तर काहीच हरकत नाही. अशावेळी कवितेच्या वर शीर्षकाच्या जागी वृत्ताचं नाव देऊ नका. त्यामुळे काय होईल की ती छंदोबद्ध कविता नक्कीच होईल पण वृत्तभंगाचा दोषही लागणार नाही. शक्य झाल्यास 'एक प्रयत्न' असं लिहिल्यास ते अधिक छान होईल.
◆ इतर काव्यप्रकारात तर सूट नेहमीच घेतली जाते, मग आम्ही सूट का घेऊ नये ?
- त्या त्या काव्यप्रकाराला पोषक असे काही नियम असतात. ते पाळून सूट घेत असाल तर काहीच हरकत नाही. शेवटी आशय हाच आत्मा आहे पण केवळ आत्मा सुंदर असून चालणार नाही तर त्याला देहही नीटनेटका असेल तर त्या सौंदर्यात भरच पडेल नाही का ? देह नसेल तर आत्म्याचं अस्तित्व सामान्य माणसाला कसं कळेल ? राहता राहिला प्रश्न वृत्ताचा तर त्याचं नाव वर लिहू नका. त्यामुळे तुम्हाला म्हणायचं आहे तेही पोहचेल आणि काही दोषही राहणार नाही.
मला वाटतं एवढ्यावरून अक्षरगणवृत्तात लघुगुरुची सूट का घेऊ नये हे समजलं असेल. नाहीच काही समजलं तर मी मदतीला आहेच. तूर्तास इतकंच, बाकी बोलत राहूच..
@अनिल विद्याधर आठलेकर
Comments
Post a Comment