जावे नवरोबांच्या वंशा तेव्हा कळे !
असं म्हणतात की बदल हाच एकमेव स्थायीभाव आहे. काही बदल आपण स्वखुशीने करतो तर काही बदल मात्र नाइलाजाने करावे लागतात. आठवड्यातून एखादी सुट्टी मिळणं, ती कुटुंबासोबत मजेत घालवणं, बाहेर फिरायला वगैरे जाणं आणि मनसोक्त खादाडी वगैरे करणं हा क्रम आपल्याला पाठ असतो मात्र एकामागून एक अनेक आठवडे सक्तीची सुट्टी मिळणं आणि वर बाहेरही जाता न येणं, घरात स्थानबद्ध असणं हा भाग आपल्याला नवीन असतो. किंबहुना याची कल्पनाही आपण केलेली नसते पण ‘होनी को कौन टाल सकता है!’ गेल्यावर्षी कोविड नावाचा मानवजातीचा शत्रू थैमान घालू लागला आणि मग माणसाला घरात बसावंच लागलं.पूर्ण दिवस नवरा घरात असला की अर्थातच त्याच्यावर काय परिस्थिती येते हे वेगळं सांगायला हवं का ? गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये अनेक कला त्यामुळे अवगत झाल्या आणि आपल्याला असणार्या दोन हातांनी ऑफिसच्या कामाव्यतिरिक्तही आपण बरंच काही करू शकतो हा साक्षात्कारही झाला ! त्यामुळे त्यादरम्यान घराच्या साफसफाईपासून ते भांडी घासण्यापर्यंत अनेक कलांमध्ये अस्मादिक निपुण झाले. हळूहळू लॉकडाउनचा काळ संपला. न्यू नॉर्मल वगैरे शब्द कानावर पडू लागले आणि आता आपण पुन्हा एकदा ऑफिसच्या कामात पूर्णपणे गढून जाऊ असं ठरवणार इतक्यात दुसर्या लाटेने असा काही तडाखा दिला की पुन्हा एकदा आयुष्याच्या काठावर त्सुनामी आली. पुन्हा कोविडची भीती.. पुन्हा लॉकडाउन ! पुन्हा तेच! पुनश्च घरी .. होम !
गेल्या लॉकडाउनमध्ये अनेक कला आधीच शिकून झाल्यामुळे अस्मादिकांनी यावेळी जरा मोठी उडी घ्यायची ठरवली. ठरलं ! यावेळी किचनवर आक्रमण करायचं! दिवसभर नाना तर्हेच्या लष्कराच्या भाकर्या भाजण्याचं काम करणारे आम्ही! आम्हाला किचन वगैरे काय मात देणार ! हॅssssss ! (किचनमध्ये प्रत्यक्ष शिरण्याआधीच मनातल्या मनात एक मांडा खाऊन झाला होता !) बायकोच्या अधिपत्याखाली असणारं किचनचं साम्राज्य सर करणं हे लाखांच्या उलाढाली करणार्या आपल्यासारख्या सिकंदराला केवढंसं कठीण जाणार आहे ! हां हां म्हणता कामगिरी फत्ते करू आणि सर्वांना तोंडात बोटं घालायला लावू ! असं मनातल्या मनात म्हणत एक चांगला दिवस पाहून स्वारी किचनच्या दिशेने कूच करू लागली. कोणत्याही कठीण प्रसंगात नवी ऊर्जा देणार्या चहानेच मोहिमेला सुरुवात करावी असा बेत आखला खरा पण शेगडीवर दुसर्या बाजूला ठेवलेलं दूध तेवढ्यात उतू गेलं. झालं! प्रथमग्रासे मक्षिकापात: ! हरकत नाही, एवढ्यातेवढ्याने खचून जायला आपण काही रडूबाई नाही आहोत ! ताठ मानेनं तसाच ओटा पुसून काढला आणि चहा पीत पीत पुढचे बेत आखू लागलो.
आज बायकोला पूर्ण विश्रांती ! नेहमी ‘आम्हाला दिवसभर घरात राबावं लागतं, तुम्हाला काय ? आले की बसले जेवायला’ वगैरे वाक्य ऐकून कंटाळा आल्याने हे काम किती सोपं आहे हे एकदा दाखवून द्यायचंच असा आतल्या नवरोजींनी चंग तर बांधला होताच. आता मागे हटण्यात हशील नव्हतं. तडक फ्रीजमध्ये डोकावलो. आत काही लालेलाल टोमॅटो फिदीफिदी हसत होते, मिरच्या वाकुल्या दाखवत होत्या. कोथिंबीर अंग चोरत कोपर्यात बसली होती. त्यांच्या हसण्याची मुळीच पर्वा न करता दोनचार टोमॅटो तसेच हातासरशी बाहेर काढून घेतले. टोमॅटो बाहेर आलेले पाहिल्यावर इतका वेळ शांत असलेले कांदे आणि बटाटे त्यांचे नऊ हजार नऊशे डोळे उघडून माझ्याकडे आणि टोमॅटोंकडे आळीपाळीने पाहत जागीच खुडबुडू लागले. माझ्या निर्धाराची ऐशीतैशी करण्याचे सर्व प्रयत्न मी हाणून पाडत होतो. गनिम हुशार होता पण मीही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हतो. त्यांच्या निषेधाला बळी न पडता मी टोमॅटो, कांदे आणि बटाटे हवेतसे चिरून घेतलेच. टोमॅटो बटाटा रस्सा भाजी, पोळ्या,वरण आणि भात असा एकूण नियोजित बेत होता. भाजीची सर्व पूर्वतयारी करून घेऊन गॅसवर कढई ठेवली. फोडणीसाठी कढईत तेल ओतलं खरं पण काय झालं कोण जाणे माझ्या अंगावर काही गरमागरम शिंतोडे उडाले! (कढईत राहिलेल्या चुकार पाण्याने आपला इंगा दाखवला होता !) नंतर जिरं आणि मोहरी टाकण्याची वेळ होती पण सिनियोरिटी कुणाची हेच ठरेना. मग वाद नको म्हणून जिरं आणि मोहरी एकाचवेळी टाकून दिली. तरी व्हायचं ते झालंच. मोहरी तडतडू लागली. तिला शांत करण्यासाठी लगोलग कांदा घातला. कांदा घातल्यावर बराच वेळ तो फिरवत बसलो, तो काही केल्या शिजेना म्हणून मग हॉलमध्ये एक चक्कर टाकावी म्हणून बाहेर आलो. इतक्यात आतून आवाज आला,
“अहोssss धूर कसला येतोय इतका ? काय करपवलंत? “
बाप रे ! विरुद्धपक्षाच्या तोफा कडाडल्या होत्या! तडक किचनमध्ये आलो! बघतो तर काय? कढईतल्या कांद्याचा कोळसा झाला होता आणि त्याचा धूर पूर्ण घरभर पसरला होता. एका बाजूला जळलेला कांदा आणि दुसर्या बाजूला बायकोचा जळजळीत कटाक्ष यात माझी पाककलेचा निश्चय जागीच पूर्ण करपून गेला होता. दुपारचे दोन वाजत आले तरी भाजीतला ‘भ’देखील तयार नव्हता. आजचा दिवस हवाभक्षण करूनच घालवावा लागणार की काय अशी शक्यता समोर दिसू लागलेली होती आणि पोटात तर कावळे ओरडायला लागले होते.
“ करून दाखवायची हौस फिटली असेल तर व्हा आता बाजूला...”
किचनसम्राज्ञीचा आदेश! त्याला विरोध करण्याचे त्राण माझ्यात उरले नव्हतेच. तरीही चेहर्यावर साळसूद भाव ठेवून भिंतीचा आधार घेत घेत हळूच हॉल गाठण्यातच आपले सौख्य सामावलेले आहे, हे माझ्यातील चाणाक्ष नवर्याने ओळखले. घरभर पसरलेल्या धुराची जागा काही वेळाने स्वयंपाकघरातून येणार्या खमंग वासाने घेतली आणि पोटाने अॅडव्हान्समध्येच सुटकेचा निश्वास सोडला.
जग सुधारण्याच्या, लष्कराच्या भाकर्या भाजण्याच्या कितीही गप्पा आम्ही मारल्या ना तरीही बायका ऑफिसबरोबरच घरात किती आणि कशी कसरत करत असतात याची चुणूक यानिमित्ताने मिळाली. बोलायला एखादी गोष्ट नक्कीच सोपी असते पण ती गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा ती किती कठीण आहे हे समजतं. नोकरी करून दमुनभागून घरी आल्यावरही घरातल्या सर्वांना हवं नको ते करून देणारी आई, बहीण, बायको म्हणूनच ग्रेट असते. बिनपगारी बारमाही ड्यूटी असं स्वरूप असणार्या या जबाबदारीबद्दल ना तिची कधी कुरबुर असते ना खंत. तीदेखील माणूसच आहे हे लक्षात घेऊन आपण आपलं वागणं जरी बदललं तरी खूप झालं. त्यासाठी किचनवर स्वारी करण्याची तरी मुळीच गरज नाही एवढं निश्चित !
__ अनिल विद्याधर आठलेकर
( प्रसिद्धी : दै. दिव्य मराठी, मधुरिमा पुरवणी, दिनांक ११ / ०५ /२०२१ )

Mast Lihilay Anil , maja aali wachun
ReplyDelete