कवी आणि कविता : चिंतन


•============•
कविता म्हणजे विश्व आहे, कवेत न सामावणारं. मनाचं एक अंगच जणू. कवितेची व्याख्या करण्याचा खूप जणांनी प्रयत्न केला आणि प्रत्येकाने त्याची त्याची अनुभूती मांडली. कवी कोणत्याही भौगोलिक प्रदेशातील असो त्याचं आणि कवितेचं नातं सारखंच असतं फक्त मांडणी निरनिराळी असते इतकंच!
Aristotle म्हणतो
''Poetry is finer and more philosophical than history; for poetry expresses the universal, and history only the particular. ''
तर Wordsworth म्हणतो,
'Poetry is the spontaneous overflow of powerful feelings: it takes its origin from emotion recollected in tranquillity.'
खरं तर कविता आणि कवी एकमेकांशी एक अतूट धाग्याने बांधले गेलेले असतात एकमेंकांच्या सुखद:खाचे वाटेकरी असतात. विविध घटनाक्रम त्यांचं महत्व अधोरेखित करत असतात, यातूनच कवी वेगवेगळे प्रदेश पादाक्रांत करत असतो.
म्हणूनच Matthew Arnold म्हणतो,
'Poetry is simply the most beautiful, impressive, and widely effective mode of saying things, and hence its importance.'
कविता कुठून येते कुठे नेते कशी नेते हा सगळा एक विलक्षण प्रवास असतो. तो ज्याने अनुभवला तो अर्थातच तिच्या प्रेमात पडतो. एकदा कवितेने तुमचं बोट धरलं की तिच्या स्वाधीन व्हायचं असतं, संपूर्ण समर्पण भावनेने.. ती नेईल तिथे निश्चितच आपल्यासाठी जणू स्वर्गच असतो! याचं यथार्थ वर्णन करताना लोकप्रिय कवी Robert Frost लिहितो,
''I have never started a poem yet whose end I knew. Writing a poem is discovering. ''
कविता म्हणजे जणू हातावर अलगद येऊन बसलेलं फुलपाखरू, त्या शहा-याची काय आणि कोणती व्याख्या करणार ? आमचे प्रिय मित्र, आदरणीय खलील मोमीनजी कवीची जणू ही अवस्थाच वर्णन करताना त्यांच्या एका प्रसिद्ध कवितेत म्हणतात :
''मी भरून घेतो सारे
हृदयाच्या काठोकाठ
शब्दातून देताना का
पाझरता होतो माठ.. ''
 
तर प्रसिद्ध गझलकार, कवी अनिल कांबळे किती सुंदर शब्दांत कवीचं नेमकं मनोगत मांडतात पहा..
कांबळे म्हणतात,
 
'' कळले न ऋतू शब्दांचे
हलकेच बहरले केव्हा
कवितेचे रंग रुपेरी
प्राणात मिसळले केव्हा... ''
 
अशी ही कविता, नित्यनूतन रूपात भेटणारी. जगणं शिकवणारी. किती किती म्हणून व्याख्या मांडायच्या? कविता म्हणजे आनंदाचा उत्सव, कविता म्हणजे प्रातिबिंबांची प्रतिमा! जो कवितेच्या डोहात उतरतो तो तिथे हरवल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच कवितेची ही जी नशा आहे ती अवर्णनीय आहे फक्त ती समरसून अनुभवता आली पाहिजे..

~ अनिल विद्याधर आठलेकर

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !