किनारा तुला पामराला!
रात्री झोपण्यापूर्वी मला छोटे छोटे व्हिडिओज पाहून झोपायची सवय आहे.
फेसबुक किंवा यू-ट्यूबवर ‘शॉर्ट्स’ अशा नावाखाली असणारे हे व्हिडिओ रंजक
असतात त्यामुळे दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो आणि ताण हलका होऊन
शांत झोप लागते. असेच व्हिडिओ पाहत असताना अलीकडेच दोन परस्परविरोधी
व्हीडिओज पाहण्यात आले. पहिल्या व्हिडिओत वाघ एका तळ्यात पाणी पीत असतो आणि
तेवढ्यात अचानक मगर त्याच्यावर झडप घालून पाण्यात ओढून नेते आणि गिळंकृत
करते. त्यानंतर काही वेळातच दुसरा व्हिडिओ समोर आला यात वर कुठेतरी झुडुपात
बसलेला वाघ थेट पाण्यात झेप घेऊन तिथून महाकाय मगरीला आपल्या जबड्यात
पकडून वर आणतो आणि फस्त करतो. व्हिडिओ छोटेसेच होते पण विचारांना चालना
देणारे होते. त्यामुळे काही केल्या नजरेसमोरून ते जाईनात.
पहिली कसोटी (अॅडिलेड) :
आता गंमत पहा, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू झाल्यापासून भल्या पहाटे
उठून टीव्हीकडे डोळे लावून बसत असतानाही हे अर्थातच कुठेतरी आत सुरूच
असायचं. वाघ तो वाघच असं जारी असलं तरी मगरही काही कमी नाही ना ? मग वाघाने
काय खबरदारी घ्यायला हवी होती ? वगैरे वगैरे. तेवढ्यात भारत पहिला सामना
सपाटून हरला, ऑल आऊट 36, मगरीने आपला घास घेतला होता ! अरेच्चा !
तर्कसंगती! हळूहळू दोन्ही घटनांमध्ये नकळत तुलना होऊ लागली आणि आता अर्थातच
क्रमाने मी वाघाच्या बदल्याची वाट बघू लागलो.
ऑस्ट्रेलिया दौरा कधीच सोपा नसतो. अगदी पूर्ण तुल्यबळ संघ असूनही अनेकदा
अनेक संघ तिथे ढासळतात, पराभूत होऊन येतात. आताची ऑस्ट्रेलियन फलंदाजी
लबुशेन व स्मिथ वगळता पूर्वीइतकी घणाघाती नसली तरीही आपल्या घरात सिंहाचा
बछडासुद्धा राजाच असतो. त्यात आजघडीची जगातील सर्वात दर्जेदार वेगवान तिकडी
त्यांच्या ताफ्यात होती आणि त्यांच्या जोडीला 100व्या कसोटी सामन्याच्या
उंबरठ्यावर असणारा जागतिक दर्जाचा फिरकी गोलंदाज लायन ! आता आपल्याकडील
जमेच्या बाजू पाहू. जमेच्या बाजू ? पहिली कसोटी झाली आणि सगळा खर्चच झाला,
उधारी येईल की काय इथवर पाळी आली. पहिल्याच कसोटीत झालेल्या मानहानीकारक
पराभवाचं शल्य, जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणारा भारतीय कर्णधार
अॅडिलेड कसोटीनंतर पालकत्व रजा घेऊन स्वदेशी परत. इशांत शर्मा, रोहित शर्मा
यासारखे महत्वाचे खेळाडू अनुपलब्ध. सगळं चिंताजनक आणि अशातच दुसरी कसोटी
आली.
दुसरी कसोटी (मेलबर्न) :
विराटच्या अनुपस्थितीत आता संघाची धुरा होती शांत,संयमी अजिंक्य रहाणेच्या
हाती. पहिल्या कसोटीतील सर्वबाद 36 ही अश्वत्थामाची भळभळती जखम घेऊन
खेळायची होती दुसरी कसोटी आणि विराटही नव्हता. अजिंक्यने मात्र नावाप्रमाणे
किल्ला लढवला आणि भारताला विजयी केलं. जबरदस्त कमबॅक! पहिल्याच कसोटीत
आजवरची सर्वात नीचांकी धावसंख्या नोंदवल्यानंतर भारतापासून
ऑस्ट्रेलियापर्यन्त सर्व क्रिकेटपंडितांनी भारताच्या मालिका पराभवाची,
व्हाईट वॉशची भाकीतं करायला सुरुवात केलेली असताना हा विजय, तोदेखील
त्यांच्याच अंगणात म्हणजे समोर कौरव सेनेतील रथी-महारथी असताना अभिमन्यूने
केलेला महापराक्रम होता.झालं! कांगारुंची एक अडचण आहे त्यांना पराभव
झोंबतो, खूप झोंबतो आणि तो झोंबला की मग त्यांची महानता, खिलाडू वृत्ती
वगैरे लोप पावते आणि त्यांच्यातील शकुनीमामा, दु:शासन, जयद्रथ, शिशुपाल
वगैरे डोकं वर काढू लागतात. प्रतिस्पर्धी संघ जिंकू नये म्हणून मग त्यांची
कोणत्याही थराला जयची तयारी असते आणि ते याही मालिकेत दिसू लागलं: पण हा
विजय खास होता, कारण तो खूप मोठ्या पराभवानंतर आला होता. ऐतिहासिक विजय,
पूर्ण जगाला दखल घ्यायला लावणारा. अजिंक्यच्या फलंदाजीबरोबरच त्याच्या
कप्तानी कौशल्यांचं सगळीकडे कौतुक होऊ लागलं. ही नवी सुरुवात होती.
तिसरी कसोटी (सिडनी) :
पुढचा किल्ला जिंकायचा तर तत्पूर्वी एक एक शिलेदार जायबंदी होत होते.
आता मुख्य गोलंदाज शमी, उमेश यादव जखमी! यादी लांबतच होती. दुसरा सामना तर
जिंकला पण आता तिसर्याह सामन्यात काही भारताचं खरं नाही असं सर्वांना वाटू
लागलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात जवळपास शंभर धावांची मोठी आघाडीही
घेतली आणि दुसर्याा डावत झटपट आघाडी वाढवून भारताला चौथ्या डावात खिंडीत
गाठायची योजना आखली. पहिल्या दोन सामन्यात शांत राहिलेली स्टीव्हन स्मिथची
बॅट फार काळ शांत राहणार नव्हतीच. भारताला जवळपास 131 षटकं खेळून काढायची
होती. मरा किंवा मारा! प्रसंग आणीबाणीचा होता पण आपल्या योद्ध्यांच्या मनात
काही वेगळंच होतं. असं म्हणतात की जखमी वाघ जास्त खतरनाक असतो. आपला संघ
तर जखमी वाघांनीच भरलेला. सलामी चांगली झाली असली तरी तेवढी पुरेशी नव्हती
मग काय ? भारताची नवी भिंत ‘द चेतेश्वर पुजारा’ पुन्हा उभा राहिला आणि
दुसर्या बाजूला आतापर्यंत टीकांचा भडिमार झेलत असणारा, ट्रोलर्सचं लक्ष्य
ठरत असणारा तरुण तडफदार आक्रमक ऋषभ पंत बहुधा काहीतरी निश्चय करून आला
होता. त्याच्या तडाखेबाज खेळीने कांगारूंना हतबल केलं आणि पुढे मग ऐतिहासिक
भागीदारी झाली. मॅरेथॉन भागीदारी. कुणामध्ये ? जखमी आर अश्विन आणि हनुमा
विहारी यांच्यामध्ये ! निकाल ? सामना आश्चर्यकारकरित्या अनिर्णीत.
ऑस्ट्रेलियाला जवळजवळ गतप्राण झाली होती. इतकी की इतिहासाचा हवाला घेत
पेनला गाबावर (तरी !)आम्ही नक्की जिंकू असा आशावाद स्लेजिंगमध्ये व्यक्त
करावा लागला!
चौथी आणि निर्णायक कसोटी (ब्रिस्बेन) :
तीन कसोटी सामन्यांनंतर मालिकेची स्कोअर लाइन होती 1-1 ! अर्ध्याहून अधिक
खेळाडू जायबंदी ! आधीच कमी होती की काय म्हणून जखमींच्या यादीत स्टार
गोलंदाज बुमरा, अष्टपैलू रविंद्र जाडेजा, तिसर्याी कसोटीचे हीरो अश्विन,
विहारी यांचीही आता भर पडली. शेवटचा सामना जवळजवळ सर्वच नवोदितांना घेऊन
खेळावा लागणार होता. चौथ्या कसोटीतल्या आपल्या गोलंदाजांच्या एकूण बळींची
संख्या दहाच्या आसपास आणि समोर 1000 हून अधिक बळी घेणारी चौकडी ! तरीही
भारताने हार मानली नाही. हा भारतीय संघ वेगळाच भासला. पहिल्या कसोटीने
दिलेली जखम मालिका जिंकल्याशिवाय बहुधा भरून निघणार नव्हतीच. भारताची भिंत
पुजारा जणू दत्ताजी शिंदेंच्या थाटात म्हणत होता, “बचेंगे तो और भी लढेंगे
!”
पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया मोठी आघाडी घेणार असं वाटत असतानाच
पुन्हा एकदा नव्या भारतीय हिरोंनी एंट्री घेतली! यावेळी कमान सांभाळली ती
पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकुर ! या दोघांच्या अंगात काय
संचारलं होतं देव जाणे पण किमान 15-20 कसोटींचा अनुभव गाठीशी असल्यासारखे
दोघे खेळले. ऑस्ट्रेलियाच्या तोंडचं पाणी पळवलं. नाममात्र आघाडी घेऊन
दुसर्याी डावाला प्रारंभ करणार्याा ऑस्ट्रेलियाला दूसरा डाव कधी घोषित
करावा हेच कळेना, इतकी दहशत पोरांनी निर्माण केली तीही स्वभावत: आक्रमक
असणार्यात कांगारुंवर ! वाह रे वाघांनो ! आता फक्त एक घाव शिल्लक होता !
दुसर्या डावात शुभमन गिलने झकास सुरुवात केली. थोडक्यात शतक हुकलं तरीही आव्हान जिवंत ठेवलं. ऑस्ट्रेलिया खरं तर मूळ स्वभावाप्रमाणे आक्रमक डावपेच खेळणारी पण नवोदितांच्या कामगिरीचा इतका धसका त्यांनी घेतला होता की जणू कांगारू पराभव टाळण्यासाठी खेळत होते. त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला! जिंकण्यासाठी भारताला शेवटच्या दिवशी चौथ्या डावात 328 धावा करायच्या होत्या किंवा अख्खा दिवस खेळून काढायचा होता, कुठे ? तर गेल्या 32 वर्षात एकही सामना ऑस्ट्रेलिया न हरलेल्या गाबाच्या खेळपट्टीवर! पुजारा पुन्हा उभा राहिला ! पुन्हा लढला ! छातीची ढाल करून !
“ अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा ,
किनारा तुला पामराला !”
असंच
जणू त्याची प्रत्येक खेळी, तो अंगावर झेलत असलेला प्रत्येक घाव सांगत
होता. गिल बाद झाल्यावर आलेल्या कर्णधार रहाणेने आल्याआल्या आपला इरादा
स्पष्ट केला. जिंकण्यासाठी खेळायचं! त्यानंतर शेवटचा घाव घालण्याचं काम
केलं तरुण तडफदार ऋषभ राजेंद्र पंत याने !! वॉशिंग्टन सुंदर पुन्हा
एकदा मदतीला आला. हेजल्वुडच्या चेंडूवर पंतने निर्णायक वार केला आणि
ऑस्ट्रेलिया कोसळली ! पंतची खेळी अविस्मरणीय अशी होती. ही खेळी अनेक दशके
लक्षात राहील. पंतांच्या हल्ल्याने ऑस्ट्रेलिया कोसळली ! होय, 2-1 ने
कोसळली ! कुठे ?? अजेय अशा गाबा खेळपट्टीवर !! रोमहर्षक ! अविश्वसनीय !
कितीतरी हृदये बंद पडता पडता वाचली असतील ! घराघरात हा सामना पाहिला गेला
आणि जल्लोष पूर्ण भारताने केला ! पूर्ण दुंनियेने भारताची जिगर पाहिली!
जिद्द पाहिली! रहाणेचं नेतृत्व, पुजाराचा अभेद्य किल्ला, अश्विनची विश्वासू
फिरकी, जडेजाचं अष्टपैलू प्रदर्शन, वेगवान गोलंदाजांची परक्या मुलखातील
दादागिरी आणि पदार्पण करणार्या नवोदितांची समर्पणवृत्ती, सारं काही पाहिलं
! सलाम !! जगातील सर्व भारतीयांची कॉलर ताठ झाली ! वाघानं आता पाण्यात
झेप घेऊन पाण्यातून मगरीला बाहेर आणलं होतं कसं जबड्यात धरून ! एक वर्तुळ
पूर्ण झालं होतं आणि माझं विचारचक्रही !
इतिहास बदलला, इतिहास घडला आणि तिरंगा ऑस्ट्रेलियात फडकला, डौलाने आणि अभिमानाने !!
__ अनिल विद्याधर आठलेकर

मी आधीही तुला म्हटलं आहे ,
ReplyDeleteक्रिकेट समीक्षक हो ,
छानच लिहिलंय
सलाम तुझ्या लेखणीला!!!