कविता स्फुरणे आणि कविता लिहिणे
'आवड असली की सवड मिळते' हे वाक्य ऐकायला-बोलायला सोपं वाटतं पण आवडीसाठी वेळ काढताना काय काय दिव्यं करावी लागतात ते ती आवड आणि आपल्यालाच ठाऊक! उदाहरणार्थ लेखन. मग ते गद्य असो किंवा पद्य, विचार करायला जितका वेळ अधिक तितका तो साहित्यप्रकार सकस होण्याची शक्यता जास्त.हे सर्व खरं असलं तरी असं वातावरण आणि वेळ मिळणं फारच दुरापास्त. तरीही आपली आवड जोपासत राहणं, तिला पैलू पाडत राहणं हे सर्व अधिकाधिक रस घेऊन करणं महत्वाचं असतं, आनंदाचं असतं.
गद्यलेखन करताना परिच्छेद-परिच्छेद टप्प्याटप्प्यात लिहीत पूर्ण करता येऊ शकतात. एक मध्यवर्ती कल्पना किंवा कथाबीज घेऊन त्याभोवती इतर पात्रे स्थळ-काळ-परिस्थितीनुसार यथावकाश रंगवता येतात, येऊ शकतात. अर्थात गद्यलेखनही तितकंच कठीण आहे पण मोठ्या कालावधीत ते पूर्ण करता येऊ शकतं किंबहुना त्या कथेची/लेखाची तशी मागणी असते पण कवितेचं मात्र तसं नाही, नसतं. निदान माझ्या अनुभवानुसार तरी. कविता ज्या मूडमध्ये असताना सुचते त्या मूडमध्ये/ट्रान्समध्ये असतानाच पूर्ण झाल्यास/केल्यास ती दमदार बनते,असते पण यालाही दोन बाजू आहेतच. त्या अशा-
◆ कविता स्फुरणे व कविता लिहिणे : -
कविता स्फुरणे व कविता लिहिणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्हीही तितक्याच महत्वाच्या आहेत. कविता स्फुरण्याची/सुचण्याची वाट पाहणे व ती आल्याबरोबर येईल त्याच जोरकसपणे कागदावर उतरवणे हा एक भाग. तर एखाद्या घटनेवर, प्रसंगावर किंवा कल्पनेवर वेळ घेऊन विचार करून कविता लिहिणे हा दुसरा भाग. माझं मत/मन जरी अगोदरच्या म्हणजे स्फुरण्याच्या बाजूने अधिक असलं तरी मी लिहिण्याच्या बाजूचाही आहे; कारण या दोन्हीही गोष्टी प्रतिभेशिवाय शक्य नाहीत, नसतात. कविता स्फुरण्याची स्थिती खूप त्रासदायक असते कारण ती वेळ काळ पाहत नाही. एखादी अतिशय महत्वाची, संवेदनशील विषयावर सभा वगैरे सुरू असताना छोट्या मुलाने भर मीटिंगमध्ये येऊन आईला ताबडतोब उचलून घ्यायला सांगणं जसं एकाचवेळी अपरिहार्यपणे प्रिय आणि त्रासदायक असतं तसंच या प्रकारच्या कवितेचं असतं. तुम्ही काय करता हे ती पाहत बसत नाही तिला तिचा हक्क हवा असतो, तिच्यासाठी तुम्ही जन्मदाते असता मग तुम्ही मिटिंगमध्ये असा नाहीतर आणखी कुठल्या समारंभात! हा त्रास जरी असला तरी नंतर मिळणारं समाधान अवर्णनीय असतं. यासाठीच ही स्थिती मला जास्त आवडते.
दुसरा प्रकार म्हणजे कविता लिहिणे. या बाजूनेही माझा कल असण्याचं प्रमुख कारण मी वर सांगितलं आहेच पण त्याशिवायही अनेक कारणं आहेत. लिहिणं ही एक कला आहे, कौशल्य आहे. तुमच्यातील प्रतिभा ती तुमच्याकडून करवून घेते फक्त या प्रकारात तुम्ही तुम्हाला हव्या त्या विषयावर, घटनेवर, प्रसंगावर लिहिता, ठरवून. हा प्रकार वरच्या प्रक्रियेहून वेगळा असला तरी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे त्याकडे पाहताना त्या अँगलने पाहणं गरजेचं आहे. मी फक्त स्फुरेल तेव्हाच कविता लिहीन असं म्हणून हटून बसलात आणि उद्या कुणी तुम्हाला गीतकार बनायची ऑफर दिली तर तुम्ही काय करणार?? दिलेल्या कालावधीत त्यांना गाणं पूर्ण करायचं असतं त्यामुळे गीतकारानेही तेवढ्या अवधीत ते लिहून द्यायचं असतं. प्रतिभावंत यासाठीच म्हटलं जातं की त्याच्यावर प्रतिभा प्रसन्न असते. म्हणूनच जर उत्तम कारणाकरता प्रतिभा वापरावी लागली तर हरकतच नाही. उलट आपल्यातील कौशल्य पणाला लावून उत्तमोत्तम रचना लिहून प्रसंगी नवनवे (योग्य) प्रयोग करून पाहिल्यास उत्तमोत्तम रचना, गाणी जन्माला येतील यात शंकाच नाही. अर्थात ही फक्त शाब्दिक कसरत असू नये. त्यासाठीही वेळ, मेहनत व साधना लागतेच. वाचन, चिंतन, मनन करून या विविध बाबींवर काम केल्यास सकस व निर्दोष रचना लिहिल्या जाऊ शकतील हे निश्चित समजा.
कविता कसोटी बघणारच मग तुम्ही पहिला प्रकार निवडा किंवा दुसरा, फक्त तिला आपली दासी समजण्याची चूक करू नका. ती साध्य होते ती अथक प्रयत्न व साधनेमुळे. वरवर चांगली भासणारी सवंग रचना फेसबुकवर वगैरे लोकप्रिय होईल, चार ठिकाणी वाजेलही पण ती काही काळापुरतीच. काळाच्या कसोटीवर टिकणारं, वैश्विक असं लिहायचं असेल तर अभ्यास, सराव आणि साधनेला पर्याय नाही, भले तुमच्या साधनेचे, अभ्यासाचे मार्ग, पद्धती वेगवेगळ्या असोत पण परिणाम एकच असेल एवढं नक्की. त्यामुळे कारणं द्यायची सवय लावून घेऊ नका व मेंदूलाही लावू नका. याकडे वेगळ्या अँगलने पहा, मजा येईल आणि कसही लागेल.
आता आताच लिहू लागलेल्या मित्रमैत्रिणींनी तर सजग राहणं फार गरजेचं आहे. साहित्य असो की भाषा स्थळ-काळ-परिस्थितीनुसार बदल होतच राहतो, झाला पाहिजे. त्याच्याकडे डोळसपणे पाहत हा बदल आपल्या सूक्ष्म नजरेने टिपून शब्दात मांडणं आणि सामान्य नजरेला न दिसणारं आपल्या शब्दांमधून दाखवणं हे जमवलं पाहिजे, जमलं पाहिजे. निदान माझा तरी हा अनुभव आहे, माझी तरी ही पद्धत आहे, तुम्हाला पटते आणि आवडते का पहा, आवडल्यास नक्की विचार करा...
मस्त मनोगत अनिल भाऊ ❤
ReplyDelete