एका जिद्दीची 'कसोटी '


________________




काही गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागत नाहीत त्या आपोआप तुमच्याकडून होतात नाही केल्या जातात. 'लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्यसंपदा लाभे' हे सुभाषित लहानपणापासून आतापर्यंत लाखवेळा आईवडिलांकडून गुरुजनांकडून ऐकून, घोकून झालं असेल तरीही त्याची अंमलबजावणी तितकी काटेकोरपणे कधीच झाली नसेल; पण ऑस्ट्रेलियात मॅचेस आहेत म्हटल्यावर मात्र अलार्म न लावता पहाटे पाचला कशी जाग येते हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला क्रिकेटप्रेमीचं हृदय असलं पाहिजे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू झाल्यापासून (डे नाइट मॅचेस वगळता) हा अलिखित नियमचं झाला होता जणू. पहिल्या कसोटीत आपण वाईट हरलो, अगदी आजपर्यंतची सर्वात कमी सांघिक धावसंख्या नोंदवली पण आम्ही आशा सोडली नाही. म्हणतात ना,

“ उम्मीद पे दुनिया कायम है !”

रहाणेच्या मनात मात्र काही वेगळंचं असावं. विराट पालकत्व रजा घेऊन भारतात परतला, शमी, उमेश यादव यासारखे आघाडीचे वेगवान गोलंदाज जायबंदी झाले. रोहितही नव्हता पण लढवय्या अजिंक्य नावाप्रमाणे लढला. टीम हडलमध्ये बहुधा त्याने असाच कानमंत्र दिला असावा. मेलबर्नमध्ये इतिहास घडला पण यावेळी विजयश्री भारताने खेचून आणली म्हणून! जबरदस्त कमबॅक! हा सामना गाजला. कांगारुंनी लोटांगण घातलं आणि आता तिसर्‍या सामन्यापूर्वी मालिकेची स्कोअरलाईन होती : 1-1 !

दरम्यान, मैदानातील असभ्य कुरघोड्यांसाठी कुप्रसिद्ध असणार्‍या ऑस्ट्रेलियन्सचा मैदानाबाहेरील दुटप्पीपणाही गाजू लागला. ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघासाठी कडक विलगीकरण असल्याची माहिती समोर आली. स्थंनिकांना एक आणि भारतीयांना एक असा तुघलकी कायदा तिसर्‍या सामन्यावर प्रभाव पाडणार अशी चिन्हं दिसू लागली तरीही आपल्या संयमी नेतृत्वाने प्रभावित करणार्‍या अजिंक्य रहाणेने सर्वांना सामन्यावरच लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आणि तिसरा सामना सुरू झाला.

सात जानेवारी हा दिवस माझ्यासाठी खास आणि याच दिवशी सामना सुरू झाला. कांगारूंनी टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. भारतीय गोलंदाजांनी बर्‍यापैकी नियंत्रणात ठेवूनही स्टार फलंदाज स्टीव स्मिथचं दमदार शतक आणि लबुशेन व पुकोवस्कीच्या अर्धशतकांमुळे चांगली धावसंख्या गाठली. ‘सर’ म्हणून गाजलेल्या अष्टपैलू रविद्र जडेजाची उत्तम गोलंदाजी आणि स्मिथला थेट फेकीने केलेला रन-आऊट ही भारतीयांसाठी विशेष बाब ठरली. उत्तरादाखल गिल आणि पुजारा यांनी अर्धशतके केली पण भारतीय डाव 244 धावांत संपला,ऑस्ट्रेलियाला भक्कम 94 धावांची आघाडी देऊन!

दुसर्‍या डावातही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी तडाखेबाज फलंदाजी केली. पुन्हा स्मिथ नामक मेरूपर्वत आडवा आला. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत शांत राहिलेली बॅट या सामन्यात दुप्पट वेगाने तळपली. 312 धावा करून डाव घोषित. भारताला 407 धावांचं आव्हान! जवळपास दीड दिवसांचा कालावधी बाकी होता. इथे खरी परीक्षा होती. चौथ्या डावात फलंदाजी, तीही ऑस्ट्रेलियात, तीही चेसमास्टर विराट नसताना आणि कुणासमोर ?ऑस्ट्रेलियाच्या तिखट चौकडीसमोर !

संघ चौथ्या डावासाठी मैदानात उतरला तेव्हा कसाबसा तरी ड्रॉ करावा पण हरू नये अशी चाहत्यांची इच्छा होती. नाही म्हणायला विरेन्द्र सेहवाग आठवलाच. एखादी अशी इनिंग झाली तर ? पण क्रिकेटमध्ये 'जर तर'ला अर्थ नसतोच, हो हेच टीम पेनही स्वत: ला म्हणत असेल. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आपले दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते आणि अजून अख्खा पाचवा दिवस खेळून काढायचा होता ! त्यात दिवसाच्या सुरूवातीलाच जहाजाचा कप्तान धारातीर्थी पडला. आता पुढे काय ? असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडला आणि अशावेळी ‘मै हूं ना !’ असं म्हणत नेहमीच किल्ला लढवणारा चेतेश्वर पुजारा पुढे आला पण दुसर्‍या बाजूला सळसळत्या रक्ताचा शिलेदार ऋषभ पंत बहुधा,

“सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है!”

असा जयघोषच करत उतरला असावा. आक्रमक शैलीच्या पंतला प्रमोशन देऊन लेफ्ट-राइट कॉम्बिनेशन ठेवत एका बाजूने हल्ला आणि एका बाजूने बचाव असा दुहेरी डावपेच अजिंक्य आणि व्यवस्थापनाने घेतला आणि तो कमालीचा यशस्वी ठरला. पंत प्रतिभावंत खेळाडू आहे फक्त थोडीशी परिपक्वता कमी आहे, त्यामुळे तो खेळत असताना धाकधूक होतीच पण यावेळी पंत निर्धार करून आल्याप्रमाणे खेळत होता, शतकाच्या जवळ आल्यावर मात्र त्याचा मूळ चंचल स्वभाव आड आला आणि तो 3 धावा कमी असताना बाद झाला. मात्र, पठ्ठ्याने तोवर त्याची पुजारासोबत ऐतिहासिक भागीदारी केली होती ! पंत असेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या तोंडचं पाणी पळालं होतं कारण भारत जवळजवळ मॅच जिंकत आला होतं पण पंत गेला आणि पाठोपाठ धीरोदात्त पुजाराही परतला. आता मात्र काही क्षणातच तारू बुडतंय की काय असं वाटू लागलं, कारण आता क्रिजवर होते जखमी हनुमा विहारी आणि पाठदुखीने त्रस्त रविचंद्रन अश्विन ! असं म्हणतात की जखमी वाघ अधिक घातक असतो. याआधी हे अझरने दाखवून दिलंय, कुंबळेने दाखवून दिलंय आणि आता पाळी विहारी अश्विन जोडगोळीची होती. एक षटक, दोन षटके असं करता करता जवळपास ४० हून अधिक षटके बघता बघता खेळून काढली या जोडीने !

कधी ?
#चौथ्या डावात !
कुठे ?
#ऑस्ट्रेलियात !
कुणाविरुद्ध ?
#ऑस्ट्रेलियाविरुद्ध !!!

कमाल !! लाजवाब !! जबरदस्त !! हरण्याची चिन्हं दिसू लागली की अतिशय वाईट प्रकारे, कोणत्याही थराला जाऊन स्लेजिंग करण्यामध्ये तरबेज असणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्ध,त्यांच्या जगप्रसिद्ध आरमारासमोर तीही जखमी अवस्थेत अशी कामगिरी करणं हा विजयच होता, आहे! शेवटी, शेवटी ऑस्ट्रेलियन खेळांडूंचा सुटत चाललेला धीर आणि जीभ यातून त्यांची मानसिकता कळत होती, त्यांनी पराभव स्वीकारला होता. कागदोपत्री अनिर्णीत अशी नोंद झालेल्या या सामन्यानं ऑस्ट्रेलियाचं मनोधैर्य खच्ची केलं आणि भारताची मान उंचावली एवढं नक्की !

असा सामना बघता येणं हे क्रिकेटप्रेमी म्हणून सुख असतं! माझ्या वाढदिवसादिवशी सुरू झालेला हा सामना राहुल द्रविडच्या वाढदिवसादिवशी संपला! भारताची भिंत म्हणून प्रसिद्ध असणार्‍या द ग्रेट राहुल द्रविडला याहून उत्तम वाढदिवसाची भेट काय असू शकली असती ? पहाटे पाच वाजता उठून असे सामने बघायला मिळणार असतील तर मी बाराही महीने पाच वाजता उठायला तयार आहे!!

अभिनंदन टीम इंडिया ! अभिनंदन पंत,पुजारा, विहारी आणि अश्विन !
आम्हाला तुमचा अभिमान आहे ...
जय हो !
__

©अनिल विद्याधर आठलेकर

#INDvAUS #drawtest #history #sydney #imashwin #rishabhpant #vihari #Pujara

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !