साऊथम्पटनमध्ये विजयाचा शुभशकुन
खरं तर कालच्या सामन्याविषयी लिहायचं होतं पण एखादा लेख मनासारखा लिहिला जाण्यासाठी जो वेळ मिळणे आवश्यक आहे तो/तितका वेळ आणि इच्छा यांची गळाभेट काही केल्या झालीच नाही दिवसभर पण लिहिल्यावाचून चैन पडेना कारण हा आपला पहिला सामना!
कालचा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेला सामना आफ्रिकेसाठी फार महत्वाचा होता तर भारत या सामन्याद्वारे वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करत होता. दक्षिण आफ्रिका हा संघ मला नेहमी शापित गंधर्वासारखा वाटतो. शाप तर ते भोगत आहेतच पण त्यांना उ:शापही मिळाला असेल, तो कधी प्रत्यक्षात उतरतोय याची मी एक प्रामाणिक क्रिकेटरसिक म्हणून वाट बघतोय. केप्लर वेसल्स, अॅलन डोनाल्ड, क्रोनिए, ऱ्होड्स, पोलॉक पासून ते कॅलिस, आमलापर्यंत अनेक दिग्गज व गुणी खेळाडू तसेच एबी डिव्हीलीयर्ससारखा दैवी देणगी लाभलेला खेळाडू यांचं योगदान मिळूनही आफ्रिकेची पाटी मात्र कोरीच राहिली. चुकतंय हे कळतंय पण काय..? शोध घ्यायला हवा! हा शोध जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत हा शापित गंधर्व शापमुक्त होणार नाही आणि दैवी सूर आसमंतात घुमणार नाहीत. कालच्या सामन्यातही तेच जाणवलं. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दोन्ही विभागात आफ्रिकेन्स कमी पडले. चहल हा असा गोलंदाज आहे की त्याला बोट दिलं की तो हात नाही थेट मानच पकडतो. काल आफ्रिकेची मान त्याच्या हातात होती! कशीबशी पन्नास षटके खेळून काढली व त्यामुळे काहीतरी लढण्याजोगी धावसंख्या धावफलकावर लागली.
भारत आणि भारताची फलंदाजी हा नेहमीच क्रिकेटविश्वात अधिक चर्चिला जाणारा विषय. त्याबद्दल अधिक बोलायची गरज नाही. कालचा सामना भारताने ज्याप्रकारे जिंकला ते पाहून भारत सामना गांभीर्याने खेळत असून खेळपट्टीवर अधिकाधिक वेळ टिकून फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे असं जाणवलं. रोहितने अजून एक शतक झळकावलं. रोहितच्या फलंदाजीची मजाच वेगळी. इतर सर्वजण गुलाबजाम, जिलेबी, बुंदीचे लाडू वगैरे वाटत असतील तर रोहित आमरस वाटत असतो! जबरदस्त गुणवत्ता असणारा खेळाडू. अलीकडे सातत्य आणि परिपक्वता दोन्ही गुण त्याच्या फलंदाजीत दिसायला लागले आणि साहजिकच त्याचं फळही त्याला मिळू लागलं. कालची मॅच तो आरामात खेळला ( एक-दोन झेल सुटले- पण तो खेळाचा भाग, त्याचा लाभ उठवणे महत्वाचं! ) संघाला विजय मिळवून देईपर्यंत राहिला. ही जबाबदारी जेव्हा दोनपैकी एखादा सलामीचा फलंदाज निभावतो तेव्हा नक्कीच संघ चांगल्या दिशेने वाटचाल करत असतो. विराट बाद झाल्यावर रोहित जबाबदारीने खेळला. वर्ल्डकपच्या मोहिमेत रोहितचा फॉर्म आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. झटपट क्रिकेटमध्ये मॅचच्या कोणत्याही क्षणी गिअर बदलण्याची क्षमता असणारे जे काही मोजके खेळाडू आहेत त्यातला रोहित हा एक आघाडीचा खेळाडू! त्याच्या फलंदाजीला अशीच धावांची चटक लागत राहो.
वर्ल्ड कपसारख्या महत्वाच्या मालिकेची सुरुवात विजयाने होणे हा एकप्रकारे शुभशकुन म्हणायला हवा आणि टीम इंडियाला शुभशकुन तर झालाय आता विराट आणि त्याच्या साथीदारांनी वर्ल्ड कप मोहीम फत्ते करावी हीच छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकदिनी सदिच्छा व्यक्त करतो ...
हरssssहर महादेव...!!
©अनिल विद्याधर आठलेकर
06 जून 2019
#अआ_ड्राइव्हज् #क्रिकेट #टीम_इंडिया #रोहित #Ind_vs_SA #ICC_WC_19


Comments
Post a Comment