बेन स्टोक्सचा मास्टरस्ट्रोक




“पूर्वीसारखं पुणं आता राहिलं नाही” 

असं म्हणणारी एक प्रजात जशी अस्तित्वात आहे तशीच “पूर्वीचं क्रिकेट आता राहिलं नाही, आमच्यावेळी काय प्लेयर्स होते…” वगैरे म्हणणारीदेखील एक प्रजात अस्तित्वात आहे. म्हणजे हे सगळीकडेच असतं. काही माणसं कालानुरूप बदलायला तयार नसतात, त्या जुन्या त्याच गोष्टी उराशी कवटाळून बसलेल्या असतात पण “Change is the only constant thing” हा सृष्टीचा, निसर्गाचा नियम असताना क्रिकेट तरी त्याला अपवाद कसं ठरेल ? 1975 साली सुरू झालेल्या पहिल्या विश्वचषकापासून ते आताच्या  2019 च्या बाराव्या विश्वचषकादरम्यान अनेक बदल झाले, अनेक नियम आले, टी-20 सारख्या अतिझटपट क्रिकेटचा प्रसार झाला, त्याचाही विश्वचषक आयोजित होत असतो. अनेक छोटे मोठे बदल झाले, होत आहेत. त्यामुळे 50 षटकांच्या क्रिकेटचं वलय कमी झालेलं असलं तरीही ती एकदिवसीय सामन्याची जादू अजूनही कायम आहेच. कारण टी-20 हा टीझर असेल तर 50 षटकांचा सामना हा अख्खा चित्रपट आहे आणि कितीही सुंदर टीझर बनवला तरीही पूर्ण चित्रपट पाहिल्याशिवाय पोट भरत नसतं! तर असा हा अतिशय प्रिय असा क्रिकेटचा खेळ आणि त्याचा हा महोत्सव आता इंग्लंडमध्ये सुरू झालेला आहे, त्यात एक भाविक म्हणून सामील होणे हेच प्रत्येक क्रिकेटप्रेमीचं आद्यकर्तव्य....
         कालचा दिवस फार महत्वाचा दिवस होता. जागतिक राजकारण आणि क्रीडाविश्व दोन्ही क्षेत्रात फार महत्वाच्या दोन घटना अssहं.. दोन सोहळे कालच्या दिवसापासूनच सुरू झाले. पहिला दिल्लीत होणारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या डावाचा डंका वाजवणारा शपथविधी आणि दुसरा, इंग्लंडमध्ये होणारा इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये विश्वचषकातील पहिला सामना! दोन्ही सोहळ्यांची सुरुवात दिमाखात झाली. आता खरा सोहळा जेव्हा उत्तरोत्तर रंगत जाईल तेव्हा अजून मजा येईल. मनोरंजन तर दोन्हीकडे असणार आहे. फक्त तुम्ही टीव्हीसेट समोर सेट होऊन बसणं गरजेचं आहे. यावेळी भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड तसेच पाकिस्तान हे संघ मजबूत तयारीसह मैदानात उतरले आहेत. दक्षिण आफ्रिका संघ हा संघ म्हणावा तर कमनशिबी म्हणावा तर आत्मघातकी. त्यांनी स्वत:चं स्वत:ला मदत केली तरच ते विश्वचषक जिंकू शकतील अन्यथा ब्रह्मदेवही काही करू शकणार नाही. वेस्टइंडिज हा संघ म्हणजे कुंभकर्ण! योग्यता आहे, क्षमता आहे पण कधीतरीच यांना जाग येते आणि त्याचवेळी जर कुठलं युद्ध ओह सॉरी स्पर्धा असेल तर ते चॅम्पियनशीपसुद्धा सहज घेऊन जातात. हा विश्वचषकही ते नेऊ शकतील  फक्त त्यांचे कुंभकर्ण वेळीच जागे व्हायला हवेत! श्रीलंका मला नेहमीच सायलेंट किलर वाटते. यावेळी त्यांचा संघ तुलनेने जरा कमी मजबूत वाटतो पण एकजुटीने खेळल्यास श्रीलंकन्स कोणत्याही संघाला पराभूत करू शकतात. एकंदरीत यावेळी फार मजा येणार आहे आणि सुरुवात तर झाली आहे.
    काल पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान खेळला गेला. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला खरा पण तो त्यांच्या तितका पथ्यावर पडला नाही उलट इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत उत्तम धावसंख्या उभारली. एक वेळ तर अशी होती की इंग्लंड 350 धावा सहज पार करेल असं वाटत होतं. सुदैवाने आफ्रिकन गोलंदाजीला उत्तरार्धात थोडा सूर सापडला आणि त्यामुळे थोडा डाव आटोक्यात आला. रॉय,रूट, मॉर्गन यांच्याबरोबरच स्टार खेळाडू बेन स्टोक्स यानेही अर्धशतक झळकवले. काय किमयागार खेळाडू आहे हा! क्रिकेटच्या मैदानावर अशी कोणती गोष्ट आहे की जी तो करू शक्त नाही? अष्टपैलू बिरुद सार्थपणे मिरवणाऱ्या  खेळाडूंमध्ये स्टोक्स अग्रक्रमाने येईल. नुकत्याच संपलेल्या आयपीएल मध्ये फारशी समाधानकारक कामगिरी न करू शकलेला स्टोक्स वर्ल्ड कप सुरू झाल्याबरोबर मात्र आपल्या मूळ रंगात परतला आणि इंग्लंडचा जीव भांड्यात पडला ! धावांचा पाठलाग करताना आफ्रिकन्स धडपडले. डी कॉकशिवाय इतर कुणी फलंदाज तग धरू शकला नाहीच. ऐनवेळी वर्ल्ड कपची लॉटरी लागलेल्या जोफरा आर्चरने मिळालेली संधी हसत हसत स्वीकारली आणि लगेच संघाच्या इमारतीमध्ये आपल्या नावाची एक वीट पक्की करून टाकली. सामना दक्षिण आफ्रिका हरणार हे स्पष्ट दिसत असताना एक कssssडssक क्षण आला तो बेन स्टोक्सच्या माध्यमातून! हा माणूस येडा आहे. काय झेल पकडला याने! अहाहा.. “डोळ्यांचे पारणे फेडणे” हा मराठीमधील वाक्प्रचार जर कुठे अचूक ठिकाणी  वापरायचा असेल तर याहून दुसरा क्षण नसेल. काल आफ्रिकन फलंदाज फेलूकवायोचा बेन स्टोक्सने घेतलेला अविश्वसनीय  झेल बघितल्यावर अर्जुनाने पाण्यात बघून त्या माश्याचा डोळा कसा फोडला असेल याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका उरलेली नाही. बेन स्टोक्सचा कालचा परफॉर्मन्स बघता दक्षिण आफ्रिकन फॅन्सनी यापुढे बॅन स्टोक्स असे फलक आणले तर आश्चर्य वाटू नये. पूर्ण सामना म्हणजे एक गजल असेल तर हा झेल म्हणजे ‘हासिल-ए-गजल’ शेर होता! हा झेल फक्त एक चुणूक होती विश्वचषकाच्या पुढील रणसंग्रामाची! आगे आगे देखो होता है क्या ....

@अनिल विद्याधर आठलेकर 

#AAa_Drives #ICC_WC_19 #Eng_vs_SA #अआ_ड्राइव्हज्

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !