माही Way
सामान्यत: एखादा संघ जिंकला की त्या संघातीलच एखादा खेळाडू प्रमुख योगदान देतो आणि तो सामना त्याच्यामुळे लक्षात राहतो पण क्वचितच असं घडतं की जिंकणार्या संघापेक्षाही प्रतिस्पर्धी संघाचा एखादा खेळाडू अशी खेळी खेळतो की सामन्याच्या निकालापेक्षाही त्या खेळाडूची ती विलक्षण खेळी अधिक लक्षात राहते, चर्चेत राहते. आज झालेल्या बेंगलोर आणि चेन्नई संघातील सामन्यात नेमकं हेच झालं आणि यासामन्याचा हीरो होता भारताचा माजी कर्णधार, सुपरकुल यष्टीरक्षक फलंदाज एम.एस. धोनी ! अशा खेळी अनेकदा तो खेळून गेलाय तरीही या खेळीबद्दल लिहावंसं वाटतंय कारण ही खेळी त्याचं क्रिकेटिंग करिअर एका वेगळ्या वळणावर असताना आलेली आहे.
महेंद्रसिंग धोनी ! नावात काय आहे असं शेक्सपिअरने म्हटलंय म्हणे पण या नावात जादू आहे आणि या नावामागे मेहनत, जिद्द आणि चिकाटी यांचं पाठबळ आहे! या नावामागे कितीतरी अटीतटीच्या सामन्यांचा अनुभव आहे. या नावामागे कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्यामुळे क्रिकेटविश्व अजूनही ''धोनीssss धोनीssss" च्या घोषणा देत असतं. कधी घरबसल्या तर कधी स्टेडीयममधून. धोनीचा हा प्रवास अनेक टप्प्यातून इथवर आला आहे. या दरम्यान त्याची हेअर स्टाइल बदलली, बॅटिंग स्टाइल बदलली, दाढी वाढली, अनेक दृश्य-अदृश्य गोष्टी कालानुरूप बदलत गेल्या.. बदलली नाही ती त्याची जिद्द. मेहनत घेण्याची वृत्ती आणि क्रिकेटवरचं प्रेम आणि स्वत:वरचा विश्वास ! आपल्या शारीरिक बदलाची जाणीव योग्य वेळी त्याला झाली आणि त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि वेळीच एकदिवसीय क्रिकेटचं कर्णधारपदही सोडलं. स्वत: तरुण असताना जे त्याने निर्णय घेतले होते ते अर्थातच त्याच्या मनात असतील. त्याने वेळेप्रमाणे आपली भूमिका बदलली. एक सीनियर खेळाडू म्हणून संघात वावरतांना आपल्या अनुभवाचा फायदा तरुण खेळाडूंना करून दिला, अजूनही देत आहे.कुलदीप यादव, युज्वेंद्र चहल यांच्या गोलंदाजीच्या वेळी त्यांना केलेलं मार्गदर्शन असो की डीआरएस कौल घेताना दिलेला अचूक सल्ला असो. त्याच्यातील नेतृत्वगुण नेहमीच दिसत राहिले. अगदी विराट कोहलीसारखा आक्रमक वृत्तीचा कर्णधारदेखील धोनी संघात असल्यास सर्व सूत्रे निश्चिंतपणे धोनीच्या हाती देऊन मोक्याच्या वेळी डीपला क्षेत्ररक्षण करतो यातच सारं आलं! परस्परविरोधी क्रिकेटिंग स्टाइल्स असतानादेखील सुपरकुल धोनी आणि अॅंग्रीयंग मॅन किंग कोहली यांच्यामध्ये मैदानात दिसून येणारी केमिस्ट्री ही धोनीच्या योगदानाचंच महत्व दर्शवते.
खरं तर धोनीबद्दल इतकं लिहिलं- वाचलं-पाहिलं गेलंय की धोनी ही एक परिकथा वाटावी इतका त्याचा प्रभाव जनमानसांत आहे. 'धोनी संपला, त्याचे रन्स होत नाहीत, त्याला संघातून काढून टाका.. ' वगैरे टीका अलीकडे सतत होत होत्या. गेल्या मोसमात ' मॅन ऑफ द सीरिज' किताब मिळवून त्याने आपण काय चीज आहोत हे दाखवून दिलं होतंचं. आज त्याने त्यावर कळस चढवला. यंदाच्या (२०१९) आयपीएल सीझनमध्ये तो उत्तम खेळत आहेच परंतु आजची खेळी पुन्हा एकदा जुन्या माहीची आठवण करून देणारी होती, एकहाती सामना फिरवण्याची ताकद असणारी जबरदस्त खेळी! तसा मी काही धोनीचा कट्टर चाहता वगैरे नाही पण अद्वितीय 'क्रिकेटिंग ब्रेन' आणि अफाट संयम यांच्या संगमातून उगम पावलेली त्याची नेतृत्वक्षमता आणि सातत्याने संघासाठी उत्तम योगदान देण्याची सवय यामुळे त्याच्या प्रेमात पडायला तो भाग पाडतो हे मात्र मान्यच करावं लागेल! वर्ल्डकप तोंडावर असताना पुन्हा बहरत असलेला धोनीचा फॉर्म पाहून जगातील भल्या भल्या गोलंदाजांच्याही तोंडचं पाणी पळालं असेल. भारतासाठी मात्र ही अतिशय सुखावह बाब आहे.
एम.एस. -- तू ग्रेट आहेसच. भारतीय संघाच्या नेतृत्वादरम्यान तू ते सिद्धही केलं आहेस आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी "लिडिंग फ्रॉम द फ्रंट " चं उदाहरण स्थापित करत आहेस. तुझ्या पदार्पणापासून ते आजतागायत आम्ही तुला पाहत आलो, तुझ्या नावच्या घोषणा दिल्या (कधी कधी शिव्याही दिल्या पण प्रेमाखातर ) आणि अजूनही तुझ्यातील लढवय्या खेळाडू पुन्हा पुन्हा आम्हाला तुला सलाम करण्यास भाग पाडतो आहे. वर्ल्डकप नंतर कदाचित तुझ्या शैलीप्रमाणे तू सन्मानाने आणि शांतपणे निवृत्तही होशील पण त्या आधी तू केलेल्या स्फोटांचे आवाज मात्र सदैव आमच्या कानात गुंजत राहतील इतकं निश्चित...!
@अनिल विद्याधर आठलेकर, पुणे
मोबाइल -- 9762162942

Comments
Post a Comment