रूढ अर्थाच्या पलीकडे पाहणारा कवी : ग्रेस

  ''मी महाकवी दु:खाचा प्राचीन नदीपरी खोल ___ ''

 असं सहज पण सूचक विधान करणाऱ्या महाकवी ग्रेस यांच्याबद्दल किंवा त्यांच्या कवितेबद्दल बोलायचं तर धाडस हवं, धाडस या खोल नदीत डुंबण्यासाठी आणि शक्य झाल्यास तरून जाण्यासाठी. न जाणो या प्रवासात आपल्यातील दगडाचं एखादं फुलही होईल कदाचित, म्हणून हे डुंबणं ...

कवी ग्रेस यांची कविता दुर्बोध आहे, सहजासहजी कळत नाही वगैरे कितीतरी वाक्ये, समज किंवा विधाने कविता हा शब्द परिचित झाला तेव्हापासून कुणा ना कुणाकडून सतत ऐकलेली. त्यामुळे सुरुवातीला एक दोन कवितांव्यतिरिक्त मजल जाऊ शकली नव्हतीच पण जसा जसा कविता आणि तिच्या व्यापकतेचा अंदाज आला, तिच्याशी वारंवार संवाद साधण्याइतपत समज आली तेव्हा मात्र ग्रेस खुणावू लागले अर्थात मनात दडी मारून बसलेल्या सर्व पूर्वग्रहांसह. ग्रेस वाचता वाचता लक्षात आलं हे रसायन वेगळं आहे. काहीतरी जादू आहे या लिखाणात. ही कविता वेगळी आहे. ती गारूड करते, खेचते आपल्याकडे..पुन्हा पुन्हा. का? शोध सुरू झाला अजूनही सुरूच आहे.

ग्रेस आणि त्यांच्या कविता वाचता वाचता हा माणूस आपला वाटत जातो. आत घुसत जातो. खोल काहीतरी हलत राहतं नेमकं कळत नसलं तरी आपलं दु:ख, आपली भावना नेमकी अशीच आहे असं सारखं वाटत राहतं. ग्रेस कळावेत म्हणून मग त्यादृष्टीने वाचन सुरू केलं. त्यांच्या कविता एका वाचनात समजणाऱ्या नाहीत किंबहुना त्या तशा वाचूच नयेत असं वाटणं साहजिक आहे पण त्यासाठी त्यांच्या कवितांची धाटणी आणि व्याप्ती समजून घेणे ही तितकंच गरजेचं आहे. आपल्याला कळत नाही म्हणजे दुर्बोध असा साधा सोपा मार्ग आपण काढलेला असतो.ग्रेस यांची कविता वेगळी आहे तर ती कशी वेगळी आहे आणि तिचं स्वरूप कसं आहे हे हळूहळू कळत जाईल तोवर वाचत रहाव्यात या कविता आपल्या आतील सल त्यामधून व्यक्त होत आहे असं वाटेपर्यंत. ग्रेस यांची शैली खास आहे. ती वेगवेगळ्या प्रतिमा वेगवेगळ्या अर्थाने
घेऊन येते. 

'' ग्रेस यांच्या कवितेत एकाच वेळी रूढ प्रतिमेचा अंत आणि पुनर्जन्म होत असतो '' अशा अर्थाचं एक विधान  ''चंद्रमाधवीचे प्रदेश'' या संग्रहाच्या मलपृष्ठावर आलेलं आहे ते याबाबत फार बोलकं आहे. रूढ प्रतिमेचा अंत म्हणजे हे एकवेळ कळेल पण त्यांचा पुनर्जन्म म्हणजे काय? त्यावेळी नेमकं काय घडतं?  इथे अनेक प्रश्न निर्माण होतात. ग्रेस ह्यांच्या कवितेतील दुर्बोधतेच्याच संदर्भात नव्हे तर एकूणच कवितेच्या आकलनाच्या त्याचप्रमाणे कवितेची निर्मिती, आस्वाद आणि मूल्यमापन या संदर्भात हे प्रश्न महत्वाचे ठरतात.

[ संदर्भ : ग्रेस आणि दुर्बोधता /जयंत परांजपे ]

या सर्व पार्श्वभूमीवर ग्रेस यांची ही एक कविता पहा :

 'ओळख '
________

मालविल्या सांज-दिव्यांची
      तम-मार्गावरती खंत,
वृद्धेच्या ओवींमधला
      उरिं दाटुन ये भगवंत.

पानांच्या जाळींमधले
    वाऱ्याचे कुंडल डुलतें,
ओठांची मिथिला ल्याया
    पदरांतुन नभ व्याकुळतें

तुटलेली ओळख विणतां
     प्राणांची फुटते वाणी
पायांतुन माझ्या फिरतो
     अवकाश निळा अनवाणी.

( संध्याकाळच्या कविता | ग्रेस )

   या कवितेतील विविध अर्थ शोधत जाणे हे खरे आव्हान आहे. कवीला अभिप्रेत असलेला अर्थ आणि वाचकाला आकलन होणारा अर्थ यामध्ये प्रतिमांचा पूल आहे. तो ज्या वाचकाला सापडला त्याला खरा त्यातील आनंद समजला.

ग्रेस यांची कविता वेड लावते, गारूड करते आणि भिनत जाते आत आत. कळत नकळत सर्व संवेदना जागृत करत अर्थाच्या वेगळ्याच झुल्यावर तुम्हाला ती नेऊन ठेवते आणि प्रत्येक झुल्याबरोबर नशा उत्तरोत्तर वाढत जाते न उतरण्यासाठी ...

©अनिल विद्याधर आठलेकर, पुणे
२६ मार्च २०१९, रात्री ११ वा. ५५ मि.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !