आयुष्य अनमोल आहे...


_________________

कधी कधी म्हणजे खरं तर नेहमीच मला काही लोकांच्या   वागण्याचा हेतूच कळत नाही आणि या लोकांना स्वतःला तरी आपल्या आयुष्याचा हेतू समजला आहे की नाही याबद्दल शंका येते. आता मी वाचलेली ही बातमी. >>>रेल्वे रूळावर बसून पब्जी खेळण्यात दंग असणाऱ्या दोन युवकांना रेल्वेने चिरडले <<<<  अरे काय करायचं होतं नक्की? काय झालं ? काय साध्य झालं??

   डिजिटल वगैरे क्रांती झाली खरी पण त्यामुळे शांती नष्ट झाली आणि कदाचित त्याबरोबरच बुद्धीही भ्रष्ट झाली. हातात स्मार्टफोन काय आला नको नको ती थेरं सुचायला लागली. ते एक सेल्फीचं फॅड..बरं फॅड वगैरे ठीक आहे पण मॅड होईपर्यंत नका जाऊ देऊ ना हे फॅड! सेल्फी कुठे घ्यायचा?? तिकडे आंबोली घाटाच्या धबधब्याच्या झोतात ठिसूळ दगडांवर! मरणारच ना रे? घरच्यांचा काही विचार? काय महत्वाचं-- फेसबुक लाईक्स/कमेंट्स की घरच्यांचं प्रेम/माया? स्मार्टफोन म्हणजे अवघड जागचं दुखणं झालंय असं म्हणायची पाळी आलीय हळूहळू. जरा कुठे सगळं सुरळीत चाललंय असं वाटावं तर पुन्हा अशा काही बातम्या येतात आणि मन सुन्न होतं.

मित्रहो,

'आयुष्य खूप सुंदर आहे' है वाक्य फक्त ग्राफिटीमध्ये येणारं किंवा एक दिवसाच्या व्हॉट्सऍप स्टेटसला ठेवण्यासाठी नाहीये रे, अनुभवण्यासाठी आहे. खरंच आयुष्य अनमोल आहे. आयुष्यात करण्यासारख्या इतर अनेक चांगल्या गोष्टी आहेत. विरंगुळा फक्त विरंगुळा म्हणूनच वापरावा. त्याला डोक्यावर बसवू नये. मोबाईल गेम्स फक्त मनोरंजन म्हणून खेळावेत आणि कोणताही मोबाईल गेम खेळताना आपण त्याच्या आहारी जाणार नाही ना याची काळजी घेणं फार महत्वाचं असतं. मागे तो एक 'पॉकेमोन' की कायतरी अशाच नावाचा आत्मघातकी गेम आला होता आणि आता हा पबजी. आयुष्य असं फटक्यात वाया घालवावं इतकंही स्वस्त नाही मित्रांनो. त्याचं मूल्य समजण्याइतकंही वय नसताना तुम्ही त्याला गमावून बसत आहात. का इतकी बेफिकिरी? का इतका उद्दामपणा?

  व्यसन करून हवेत 'धुआँ' वगैरे उडवून, स्टंटबाजी करून क्षणिक सुख  नक्कीच मिळत असेलही पण त्याचवेळी तुमच्या ऍश ट्रेमध्ये तुमच्यासोबत तुमच्या आयुष्याकडे डोळे लावून बसलेल्या मायबापाच्या स्वप्नांची राखही जमा होत असते हे विसरू नका. मोबाईल गेम्सचं व्यसन आता सर्वदूर पसरू लागलंय. त्यातून लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही सुटलेलं नाहीये. वेळीच सावरा. शाळेत असताना एक सुंदर सुविचार वाचला होता,

'' हास्यविनोद चांगला खरा पण त्याचा उपयोग जीवनात मिठासारखा करावा, अन्नासारखा नव्हे ! ''

हे वाक्य प्रत्येक युवकाने कोरून ठेवायला हवं मनावर. गेम्स वगैरे मनोरंजनापुरते असणारे प्रकार जेवढ्यास तेवढेच ठीक आहेत. त्यांचा राक्षस  तुम्हाला गिळेल इतके त्यांच्या आहारी जाऊ नका. आईवडील, भाऊ, बहीण, मित्रमैत्रिणी यांना तुम्ही हवे आहात, आपण यामध्ये अडकला असाल तर आताच यातून बाहेर पडा आणि तुमचा कुणी मित्र अथवा मैत्रीण यात अडकत असेल तर त्यांनाही सावध करा ही हात जोडून विनंती ....

________/\_________

©अनिल विद्याधर आठलेकर, पुणे
  मोबाईल -- 9762162942

{ शेअर करण्याची इच्छा झाली तर जरूर शेअर करा, कदाचित तुमच्यामुळे कुणाचातरी जीव वाचू शकेल... }

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !