संभाव्य मालिकाविजयाची ऐतिहासिक बोहणी !
काही गोष्टींची आपल्याला सवय नसते, कदाचित अपेक्षाही.. उदाहरणार्थ अलका कुबलने तूफान विनोदी भूमिका केली आहे आणि चक्क आपण पोट धरून हसत जमिनीवर लोळतोय किंवा सरकारने सगळे लोकहिताचे निर्णय घेतले आहेत, सारे पुढारी फक्त जनतेच्याच कल्याणासाठी रात्रंदिवस झटत आहेत वगैरे वगैरे! हे आपलं स्वप्न मात्र जरूर असतं. कधी कधी या गोष्टी घडून जातात आणि आपण आपल्यालाच एक कडकडीत चिमटा घेऊन पाहतो ! काल म्हणजेच 10 डिसेंबर 2018 रोजी पहाटे अशीच एक शक्यता दिसू लागली आणि दुपार होता होता ती खरीही ठरली! ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच घरात दिमाखात धूळ चारली, तीदेखील मालिकेच्या पाहिल्याच सामन्यात!! वाह..क्या बात है! अनेक वर्षे वाट पाहिल्यानंतर आलेला हा एक अतिशय आनंदाचा क्षण होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी पण सलामीवीर स्वस्तात परतले एवढंच नाही तर भारतीय फलंदाजीचा भरवसा असलेला कर्णधार विराट कोहली व त्याच्यामागोमाग अजिंक्य रहाणेही तंबूत परतले. प्रथम फलंदाजीचा फायदा टीआर मिळाला नाहीच उलट भारतीय संघ अडचणीत आला आणि अशावेळी मदतीला धावून आला भरवशाचा शांत, संयमी फलंदाज-- चेतेश्वर पुजारा ! एकीकडे इतर आघाडीचे फलंदाज चुकीचे फटके मारून बाद होत असताना पुजारा मात्र एखाद्या योग्यासारखा आपलं काम चोख करत होता, पाय रोवून खेळपट्टीवर उभा होता. कसोटी क्रिकेट म्हणजे संयम, एकाग्रता आणि मानसिक कणखरपणा या गुणांची सत्वपरीक्षा असते आणि त्यात पास होणे किती कठीण म्हणूनच किती गरजेचे असते हे पुजाराने दाखवून दिलं. पहिल्या डावातील भारतीय धावसंख्येच्या जवळजवळ पन्नास टक्के धावा या एकट्या पुजाराच्या होत्या..यावरून त्याच्या खेळीची उपयुक्तता लक्षात येईल. आपली विकेट फार मोलाची असून ती सहजासहजी कुणाला द्यायची नाही हा निर्धार त्याच्या प्रत्येक फटक्यामधून जाणवत होता. एकेरी-दुहेरी धावांवर भर देत गरज असेल तेव्हाच आक्रमण करणार्या पुजाराची दोन्ही डावातील भरीव कामगिरी महान फलंदाज व माजी कसोटीवीर राहुल द्रविड याची आठवण करून देत होती आणि सामनाही योगायोगाने ऍडलेडलाच होता ! पहिल्या डावात 'धावचित करणे' हा एकच त्याला बाद करण्याचा पर्याय होता अन्यथा त्याने नांगर खोलवर टाकलाच होता. मान्य आहे की त्याच्याकडे विराट, धवन-रोहित सारखं ग्लॅमर नाही, तशी आक्रमकता नाही पण जे त्याच्याकडे आहे तेच त्याला पुजारा बनवतं. उत्तमच बचाव हेदेखील आक्रमणाचंच दुसरं रूप आहे हे तो वेळोवेळी दाखवत असतो आणि आपली उपयुक्त सिद्ध करत असतो. ‘पुजारा केवळ भारतीय मैदानांवरच धावा करतो’ असा जो आरोप टीकाकार त्याच्यावर करत होते त्यालाही या खेळीने अर्थातच चोख उत्तर दिलं आहे!
तसं पाहिलं तर बंदीमुळे बाहेर असलेल्या स्मिथ आणि वॉर्नर या प्रमुख फलंदाजांच्या गैरहजेरीने ऑस्ट्रेलियन फलंदाजी थोडीशी कमजोर वाटत असली तरीही लक्षात घ्या सामना ऑस्ट्रेलियात होत होता आणि घरच्या मैदानांवर खेळताना कोणताही संघ प्रबळच असतो. त्यातच कडवेपणा, आक्रमकता हे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या रक्तातच भिनलेले गुण असतात अगदी अविभाज्य घटक असल्यासारखे. त्यामुळे हा संघ कडवी लढत देणार हे स्पष्टच होतं. कोणी कितीही काहीही म्हटलं तरीही निश्चितच कौतुक करायला हवं ते भारतीय गोलंदाजांचं! ऑसी फलंदाजांना त्यांच्याच भूमीवर नाचवणं सोपं नाही, कधीच नसतं. फक्त चार प्रमुख गोलंदाज घेऊन खेळणर्या भारतीय संघाचं म्हणूनच कौतुक. विशेष म्हणजे नेहमीच आक्रमक खेळ करणार्या ऑसी फलदाजांच्या फलंदाजीला असं काही वेसण घातलं की त्यांच्या संघांच्या फलंदाजीची सरासरी फक्त 2 किंवा दोनच्या आसपासच होती जे फार फार क्वचित दिसणारं चित्र आहे! आपल्या गोलदाजीची अशी दहशत बाहेर फार कमीवेळा पहायला मिळते आणि यावेळी ती मिळाली याचा आनंद काही औरच आहे. पहिल्या डावाच्या जोरावर मिळालेली 15 धावांची नाममात्र आघाडी कमी असली तरी महत्वपूर्ण होती. शमी, बुमराह, अनुभवी इशांत आणि अश्विन यांना एक यूनिट म्हणून ऑसी फलदाजांची शिकार करत असताना पाहून भारतीय संघाला प्रतिस्पर्धी संघाच्या डोळ्यात डोळे घालून पाहणे शिकवणार्या ‘द दादा’ सौरभ गांगुलीला अक्षरश: आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील!
दुसर्या डावात भारतीय फलंदाजांनी थोडा समजूतदारपणा दाखवत म्हणा किंवा पुजाराकडून प्रेरणा घेत म्हणा अधिक चांगला खेळ केला. विशेषत: गेले अनेक सामने आपल्या वकुबाला साजेसा खेळ न करणार्या रहाणेने अर्धशतक झळकावलं. मदतीला भारताची 'दुसरी भिंत' म्हणून हळूहळू ओळखला जाऊ लागलेला पुजारा होताच. भारताने ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी एकूण 323 धावांचं लक्ष्य ठेवलं जे कठीण असलं तरीही अगदीच अशक्य नव्हतं. आता लक्ष होतं ते ऑस्ट्रेलिया प्रत्युत्तर कशी देते याकडे!
तोपर्यंत अनेकांचे प्रायव्हेट एग्जिट पोल्स कामाला लागले होते. इव्हीएम मशीन्स सज्ज होत्या मात्र दोघांचेही समर्थक काळजीत पडले होते कारण शक्यता आणि अंदाज यांचा कितीही गवगवा झाला तरी शेवटी ऐनवेळी कृती करणार्यांच्याच बळावर निकाल लागतो मग तो मतदारराजा असो वा गोलंदाज! इकडे ऑसी फलंदाजानी नेहमीच्या कडवटपणाने किल्ला लढवायला सुरुवात केली पण अश्विन आणि इशांत यांनी किल्ल्याला खिंडारं पाडायला सुरुवात केली. ऑसींनी निकराची झुंज दिली, अगदी शेवटचा सैनिक असेपर्यंत दिली पण भारतीयांनी पूर्ण जोर लावून किल्ला सर केला आणि आपला झेंडा फडकवला तोही दिमाखात पाहिल्याच स्वारीत..!!!
हा धक्का पचवणे ऑस्ट्रेलियाला कठीण जाणार आहे कारण आजवर एकदाही मालिकेतील पहिला सामना न जिंकणार्या भारतीय संघाने यावेळी मात्र चूक केली नाही. दुसर्या सामन्यात अधिक त्वेषाने ते पलटवार करतील, अधिक वेगाने येतील त्यासाठी भारतीय संघानेही तयार रहायला हवंय. यावेळी सर्व लक्ष कोहलीवरच केंद्रीत केल्याने पुजाराचा धोका त्यांच्या लक्षात आला नसावा, आता ते तयारी करून येतील. याबरोबरच काही चिंता करण्यासारख्या गोष्टी विजयाच्या आड जरूर लपल्या आहेत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणारं नाही. प्रतिस्पर्धी संघांचा निम्म्याहून अधिक संघ गारद केलेला असताना त्यांच्या शेपटाला मात्र न गुंडाळता येणे ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. यावेळीदेखील सामना हातातून निसटला असता, थोडक्यात वाचलो. ही अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी यावर काम करायला हवंय. शेवटच्या फलंदाजांना अधिक यॉर्कर्स का टाकण्यात आले नाहीत हाही प्रश्नच आहे. (शिवाय नो-बॉल टाकणार्या गोलंदाजांनी त्यावर काम करायला हवं, नोबॉलमुळे न मिळालेली विकेट खूप नुकसान करू शकते.) त्याचबरोबर सलामीच्या जोडीलाही कानपिचक्या द्यायला हव्यात. योग्य सलामी मिळाल्यास पुढे धावसंख्येला चांगला आकार मिळतो. पंतची यष्टीमागे कामगिरी बरी होत असली तरी ती अधिक चांगली व्हायला हवी आणि फलंदाजीतही त्याचं योगदान अधिक असायला हवं, अन्यथा दिनेश कार्तिक संघात कधीही येऊ शकतो याची त्याला जाणीव करून द्यायला हवी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तळाच्या फलंदाजांचं अपयश ! गोलंदाजीबरोबरच वेळ आल्यास अधिकाधिक धावाही काढता यायला हव्यात हे गोलंदाजांना समजावून सांगणे गरजेचं आहे. याच धावा शेवटी निर्णायक कामगिरी बजावतात. या सगळ्या गोष्टींवर टीम व्यवस्थापन करेलच अशी आशा आहे.
टीकाकार जे बोलायचं ते बोलतीलच पण योग्य गोष्टींचं कौतुक जिथे करायला हवं तिथे करायलाच हवं. भारतीय संघाने धमाका जरी केला नसला तरी धमकी मात्र नक्कीच या विजयाच्या माध्यमातून दिली आहे. पहिला सामना जिंकून बोहणी केली आहे. मालिकाविजयाच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलेलं आहेच आता उरलेल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियाचा इगो पूर्णपणे दुखावून भारतीय संघ परत यावा हीच एक क्रिकेटरसिक म्हणून सदिच्छा!
©अनिल विद्याधर आठलेकर
दिनांक ११ डिसेंबर २०१८

Comments
Post a Comment