स्थिती ( समुदितमदना)


अंधाराची भेदुन कारा नवी प्रगटता प्रभा
क्षणक्षण मोहित काळ अचंबित विस्मय वाटे नभा
ठुमकत मुरडत नाचत नाचत ओढ जातसे पुढे
हलके हलके दृश्य दिसतसे.. एक भरतसे सभा


तरूवेलींच्या अंगांगावर धुंद शहारा खुले
जिकडे तिकडे मुक्त उमलती दवबिंदूंची फुले
दिशादिशांची करित चौकशी मोद जातसे पुढे
घेई गिरक्या विहंगमाला कल्पतरुही डुले

उभ्या कमानी जशा दुतर्फा तशा ठाकती कडा
पहाटद्वारी निसर्ग घाली हिरवाईचा सडा
स्पर्श तनूवर घेत मखमली ऊब जातसे पुढे
चतुर विहरती स्वैर, लावण्या कृमिकिटकांचा छडा

सुगंध शिंपित अनुपद धुंदित रोज पळतसे किती
चराचराची भेट घेतसे, घेत रोज माहिती
साज लेउनी तऱ्हेतऱ्हेचे 'वाट' जातसे पुढे
ठसे सोडुनी हळवे हिरवे, हळवी हिरवी स्थिती ...

©अनिल विद्याधर आठलेकर
दिनांक ३ डिसेंबर २०१८

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !