क्षैतिजमाया


निमिषात उजळते रंगकथांनी भाळ
पाहून थबकतो जागी स्तंभित काळ
सारखी वाढते गिरिशिखरांची तृष्णा
चालली किती ही सृष्टीची आबाळ ?


हळुवार भोवती गिरक्या घेई वारा
अलवार तनूवर पिवळा देत शहारा
की नशा वाढते आहे इतकी आता
वाटतो नभाचे वाहे वेड किनारा

विसरती दिशाही अस्तित्वाचे भान
ऐकून धरेची व्याकुळ हळवी तान
हे ममत्व की ही आहे क्षैतिजमाया
न्हाहते मनाचे अवघे हिरवे रान

ही सांज अनावर, गूढ उजाळा आहे,
क्षितिजादारी गजबजती शाळा आहे
बिलगण्या पसरती कैक स्मृतींचे हात
काळोख किती हा लेकुरवाळा आहे ...

©अनिल विद्याधर आठलेकर
◆◆◆९७६२१६२९४२◆◆◆

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !