निरुपाय


पाहून सुने आवार, गलबले फार, मोकळा वाडा
अस्वस्थ करकरे दार, करी बेजार, पुन्हा कोनाडा
डोळ्यांत उभे काहूर, मने आतूर, व्हायची आधी
घेऊन सुखाची लाट, गावची वाट, यायची आधी

दारात सडा शिंपून, मने सजवून, वाजती गाणी,
लक्ष्मीच जशी की घरी, येउनी भरी, नेहमी पाणी
कित्येक व्यथा दडवून, ठेवते ऊन, चेहरा हसरा
दृष्टीस पडेना सून, हसे लेऊन , माळुनी गजरा

अंगणी आढळे फक्त, मुकी आसक्त, कोरडी माती
वृंदावन हळवे खूप, आठवे धूप-निरांजन-वाती
काळाने केला खेळ, पाहुनी वेळ, गाठली अबला
निष्पाप घेतला घास, भोगला श्वास, देह कुस्करला

प्रत्येक जीव घेऊन, तिच्या मागून, थांबले तांडव
वार्धक्य-यौवनासवे, चिरडले नवे, निरागस शैशव
थबकुनी कुणी पांथस्थ, हळहळे फक्त, दोन क्षण आता
राहिले शेवटी काय? एक निरुपाय, चेतना जाता ...

©अनिल विद्याधर आठलेकर
बुधवार, दिनांक ०७/०८/२०१८

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !