"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!



वेड म्हणजे काय ? असा प्रश्न तुम्हाला कुणी विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल ? सगळं काही ठीकठाक चाललेले असताना ते सोडून काहीतरी भन्नाट, वेगळं करण्यासाठी आहे ते सगळं सोडून त्याच्यामागे धावणे... बरोबर ना? होय, कोणत्याही सामान्य, मध्यमवर्गीय माणसाला हे असंच वाटेल पण वेडाने झपाटून जाणार्‍या असामान्य व्यक्तिमत्वांची गोष्टच वेगळी असते. त्यांना हे वेड सतत खुणावत राहतं आणि जोपर्यंत या वेडाच्या संपूर्ण आहारी जात नाही ना, तोपर्यंत यांना चैनच पडत नाही. अशाच एका अचाट, असामान्य आणि अजरामर वेड्याची अद्भुत कहाणी आपल्यापर्यंत पोहचवणारा चित्रपट म्हणजे  ' आणि .. डॉ. काशिनाथ घाणेकर !'

'आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून या चित्रपटाबद्दल कमालीचं औत्सुक्य मनात निर्माण झालं होतं. त्यात डॉक्टर घाणेकर यांची मुख्य भुमिका सुबोध भावे करणार आहे हे समजल्यावर तर अधिकच. कारण माझ्या पिढीने घाणेकर चित्रपटाव्यतिरिक्त फारसे पाहिलेले नव्हते पण त्यांच्याबद्दल वडिलांकडून ऐकलं मात्र फार होतं. सुबोध भावे हा खरं तर गुणी अभिनेता पण नेटीझन्सनी त्याच्यावर तो करत असलेल्या अनेक बायोपिक भूमिकांवरून विनोद करणं सुरू केलेलं. त्यात समोर अमिताभ बच्चन आणि आमीर खान या बड्या स्टार्सचा बहुचर्चित "ठ्ग्ज ऑफ हिंदोस्तान" समोर ठाकलेला. या सार्‍या पार्श्वभूमीवर 'आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर' सात नोव्हेंबरला रिलीज झाला आणि अल्पावधीतच सर्वांची (विशेषत:टीकाकाकरांची) तोंडं बघण्यासारखी झाली.  असं झालं तरी काय?

त्याचं झालं असं. मराठी रंगभूमीचे पहिले ( किंबहुना एकमेव ) सुपरस्टार डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्यावरचा बायोपिक त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 32 वर्षानी येत आहे म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावणे स्वाभाविकच होते. डॉ. घाणेकर यांच्या नाटकाप्रमाणेच हा चित्रपटही पहिल्या शोपासूनच गर्दी खेचू लागला. खरं तर हे शिवधनुष्यच होतं जे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पेलायच ठरवलं आणि खरंच ते पेलून दाखवलंदेखील! यासाठी सर्वप्रथम अभिजीत देशपांडे यांचं मनापासून अभिनंदन! डॉक्टर घाणेकर यांनी मराठी रंगभूमीला सुवर्णकाळ दाखवला असं असलं तरीही काही मोजके चित्रपट आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी कांचन घाणेकर यांनी लिहीलेल्या “नाथ हा माझा या पुस्तकाशिवाय विशेष असं काही हाताशी नव्हतंच. त्यांच्या नाटकांचे वा मुलाखतीचे व्हिडिओ उपलब्ध नाहीत ही खरं तर खेदाची बाब आहे पण असं असूनही “आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपट जबरदस्त झाला तो केवळ दिग्दर्शक व यातील कलाकारांच्या मेहनतीमुळे.

डॉक्टरांच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली ती “रायगडाला जेव्हा जाग येते” या नाटकातील संभाजीराजेंच्या भूमिकेपासून आणि ज्या भूमिकेने ते रसिकांच्या गळ्यातला ताईत बनले ती “अश्रूंची झाली फुले” मधील लाल्याची भूमिका, त्यानंतरची गारंबीचा बापू’, इथे ओशाळला मृत्यू’, आनंदी गोपाळ इत्यादी नाटकांतील त्यांचा दमदार अभिनय, नजरेतील धाक, त्यांचा अॅटीट्यूड त्याअगोदरची प्रोम्प्टर म्हणून काम करण्यापासून ते विविध ठिकाणी ऑडिशन देऊन आल्यानंतरची त्यांची तळमळ, मूल होत नसल्यानं आलेलं रितेपण सुबोध भावेने अप्रतिमरित्या दाखवलेलं आहे. सुबोधच्या प्रत्येक एंट्रीनंतर लक्षात येते ती त्याने भूमिकेवर घेतलेली मेहनत. संभाजीच्या भूमिकेतील तडफ, भेदकपणा असो वा लाल्याच्या स्वभावातील बेफिकिरी सुबोधने प्रत्येक भूमिका एकदम sssडॅssक! रंगवली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सुबोधने आपल्यातील जबरदस्त अभिनयकौशल्याची चुणूक दाखवली आहे आणि याद्वारे न बोलताच  टीकाकारांना जबरदस्त चपराक लगावली आहे. डॉक्टरांच्या वैयक्तिक जीवनातील प्रसंग असोत की रंगमंचावरील संवाद असोत, पहिली पत्नी डॉ. इरावती यांच्यासोबतचे हळवे क्षण असोत की कांचनला पाहून, भेटून होणारी घालमेल असो सुबोधने एक एक क्षण समोर उभा केला आहे. घाणेकरांच्या व्यक्तिरेखेसाठी सुबोधलाच कास्ट करणे हाच खरं तर एक मास्टरस्ट्रोक होता ! सुबोध कुठेही कमी पडत नाही, अपेक्षाभंग करत नाही. विशेष म्हणजे त्यात कुठेही सुबोध न दिसता घाणेकरच दिसतात, जाणवत राहतात. एक शरीरयष्टीचा मुद्दा सोडला तर लूकवर केलेलं काम अप्रतिम आहे. झुल्फं उडवण्याची लकब, उस में क्या है म्हणतानाचा खतरनाक अॅटीट्यूड..सगळ उत्तम!   घाणेकर माहीत नसलेल्या पिढीसमोर घाणेकर उभे करणे आणि घाणेकर माहीत असणाऱ्या पिढीसमोर घाणेकर साकारणे अशी दुहेरी कसोटी समोर असताना सुबोधने यशस्वीपणे ती पार पाडली आहे. या भूमिकेसाठी सुबोधला एक sssडॅss सल्यूट!

 कितीही चांगला विषय असला, चांगला दिग्दर्शक असला तरी एखाद्या चित्रपटाचं यश हे संपूर्ण टीमवर अवलंबून असतं. कारण क्रिकेटप्रमाणेच चित्रपटदेखील एक सांघिक खेळ आहे. एकाने द्विशतक मारून चालत नाही. क्षेत्ररक्षक, गोलंदाज, यष्टीरक्षक आणि इतर फलंदाज या सर्वांच्या सहकार्याने, हातभाराने सामना जिंकता येतो. चित्रपटातही सहकलाकर किती तगडे आहेत यावरही यश अवलंबून असत. या चित्रपटाची जमेची बाजू काय असेल तर बेस्ट कास्टिंग! “वेल बिगन इज हाफ डन” अशी इंग्रजीत एक म्हण आहे ती इथे तंतोतंत लागू पडते. मराठी रंगभूमीवरचा साधारणतः १९६० ते १९८५ असा तब्बल २५ वर्षांचा कालखंड या सिनेमात दाखवला आहे. त्यामुळे अर्थातच या दरम्यान डॉ. इरावती घाणेकर, सुलोचनादीदी, कांचन घाणेकर, भालजी पेंढारकर, प्रभाकर पणशीकर, मा. दत्ताराम, वसंत कानेटकर, डॉ. श्रीराम लागू अशी डॉक्टरांशी संबंधित दिग्गज मंडळी सिनेमात दिसणार होती. त्यांच्या भूमिका म्हणूनच ताकदीच्या होणे गरजेचे होते. अनुक्रमे नंदिता धुरी, सोनाली कुलकर्णी, वैदेही परशुरामी, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, प्रसाद ओक, पळशीकर, आनंद इंगळे आणि सुमित राघवन यांनी या भूमिका केल्या आणि केल्या नाहीत तर उभ्या केल्या.या प्रसाद ओकचा अभिनय फार आवडला. पणशीकर एकदम ताकदीने उभे केलेत. सुमित राघवन.. वा! डॉक्टर श्रीराम लागू यांची भूमिका साकारणे म्हणजे सोपं काम नव्हे! घाणेकर आणि लागू या दोन डॉक्टरांमधील जुगलबंदी अप्रतिम! सुमित राघवन याने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. वैदेही परशुरामीने कांचन सुंदर उभी केली आहे. अनेकदा डोळ्यांवाटे फार सुंदर भाव दाखवले आहेत. नंदिता धुरी यांनी इरावती छान उभी केली आहे, विशेषत: सोशीकपणा खूप उत्तमरीतीने पोहचवला आहे. यांच्या अशा अजून भूमिका पहायला आवडतील. अशा पूर्ण युनिटचा जबरदस्त अभिनय चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेत नसता तरच नवल! 

   डॉक्टरांच्या वादग्रस्त तरीही अफाट लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा आढावा घेतानाच त्यांच्यातील मस्तवालपणाने त्यांचं केलेलं नुकसान, त्यांचा हेकेखोरपणा, अरेरावी, व्यसनाधीनता आणि त्यामुळे ओढवून घेतलेली करूण  परिस्थिती यामधून एका यशस्वी कलाकाराने काय घ्यावं आणि काय घेऊ नये हेदेखील अधोरेखित केलं आहे. लोकप्रियतेची नशा काही औरच असते. “ टाळी हा सरस्वतीचा शाप आहे!” असं एक सुंदर वाक्य त्यांच्या तोंडी दाखवलं आहे पीएन ही टाळी मिळाली नसती तर आपण संभाजी, ळाल्या, बापू, आनंदी गोपाळ असतो का ? हा सवालही विचारला आहे हे आत्मचिंतन आवडलं. यशाच्या शिखरावर असताना अकाली आयुष्याचा शेवट होणे वाईट पण अनेकदा सांगुनही, बजावूनही स्वत;हून ओढवून घेतलेल्या दुर्दैवासमोर कुणाचं काय चालेल? एवढ सगळ असूनही मराठी रंगभूमीला पहिली टाळी, पहिली शिट्टी मिळवून देणार्‍या खर्‍या अर्थाने रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या या पहिल्या व एकमेव मराठी सुपरस्टारची ही कहाणी तितकीच जबरदस्त, अविश्वसनीय व अचाट आहे हे मात्र नक्की..! इतकी सुंदर चित्रकृती दिल्यानंतर दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्याकडून निश्चितच आता मराठी प्रेक्षकांच्या  अपेक्षा वाढल्या आहेत.

आवर्जून चित्रटगृहात जाऊन ही नशा अनुभवा, टाळी वाजवा शिट्टीही वाजवा ... 

कशी ??

एकदम “ कsssडॅsssक!”

रेटिंग : **** १/२

@अनिल विद्याधर आठलेकर,
 १४ नोव्हेंबर २०१८

Comments

  1. Replies
    1. धन्यवाद गणेशसर ..

      Delete
    2. अप्रतिम

      सुंदर लेख

      Delete
  2. मस्त लिहीलं आहेस.

    ReplyDelete
  3. सुंदर लिहीलं आहेस अआ

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्रसाददादा...

      Delete
  4. झकास लिहिलंयत अआ!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद समीर कुलकर्णी :)

      Delete
  5. वाह्ह वाह्ह ...मस्तच !

    ReplyDelete
    Replies
    1. थांकयू व्हेरी मच अभिदा ..

      Delete
  6. Mast khup chhan lihilat puran film pahtana kharach janval nahi Subodh ji ahet Dr.rach disat hote samor ekdam kadaakkkkkk

    ReplyDelete
  7. KHARECH CHHAN! DR.CHYA CAREER CHA CHADHTA GRAFF,NANTARACHI UTARATI AALELI UTARATI KALA,TYANCHYA VYAVAHARIK AANI BHAVANIK AAYUSHACHI GUNTAGUTICHE KSHAN,AANI AATMPARIKSHANACHE SHEVATACHE KSHAN HE SAGALA FAKT SUBODH SIRACH KARU SHAKATAT!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

साधेपणाचा कळस !