निगर्वी, नम्र आणि अभ्यासू लेखिका : वीणा गवाणकर

स्नेहल प्रकाशनाचा यावर्षीचा 'स्नेहांजली पुरस्कार' प्रसिद्ध लेखिका, चरित्रकार वीणा गवाणकर यांना नुकताच एस.एम.जोशी सभागृह, पुणे येथे डॉ. गो.बं. देगलूरकर यांच्या हस्ते देण्यात आला त्यानिमित्ताने..
______________________________________________________________________




वीणा गवाणकर यांच्याशी आपली पहिली भेट होते ती त्याच्या अफाट लोकप्रिय अशा 'एक होता कार्व्हर' या पुस्तकाच्या माध्यमातून. जवळजवळ ४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकाच्या आजवर दीड लाखाच्यावर प्रती विकल्या गेल्या आहेत आणि अजूनही हा ओघ सुरूच आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या अद्भुत, अविश्वसनीय, अफाट आशा कर्तृत्वाची ओळख वीणाताईंनी त्याच्या सहजसुंदर शैलीत करून दिली आहे. हे पुस्तक अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. इतकं सारं यश मिळालेलं असूनही वीणा गवाणकर मात्र नम्रपणे हे सारं श्रेय आपल्यातील वाचकाचं आहे असं मानतात. 'मी आधी वाचक आहे लेखिका वगैरे नंतर!' वाचनाच्या आवडीतून वीणाताईंनी ग्रंथपालनाची पदव्युत्तर पदविका घेतली. त्यानंतर ग्रंथपाल म्हणून काम करताना अनेक थोरा-मोठ्यांचा सहवास त्यांना लाभला. वाचता वाचता अनेक महान व्यक्तिमत्वांची ओळख झाली आणि मग संशोधन करून, टिपणे काढून त्यावर अभ्यास करून उपलब्ध संदर्भांची शहानिशा करून वीणाताई लिहू लागल्या. मात्र हा प्रवास काही सोपा नाही. त्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि ऐकीव माहितीवर विसंबून न राहता अचूक माहिती मिळवण्यासाठी प्रसंगी करावी लागणारी पायपीट या सर्व गोष्टींना न कंटाळता पाठपुरावा करत राहणे हे आजच्या झटपट प्रसिद्धीच्या, कष्ट न करता एका क्लिकवर माहिती मिळवण्याच्या काळात आश्चर्य वाटण्यासारखंच आहे! आपापल्या काळात क्रियाशील असणाऱ्या, चाकोरीबाहेर जाऊन नवीन विचारांची दिशा दाखवणाऱ्या परंतु काही मोजक्या अभ्यासकांव्यतिरिक्त फारशा कुणाला माहित नसलेल्या व्यक्तिरेखा वीणाताईंचं लक्ष वेधून घेतात. वीणाताईंच्याच शब्दांत सांगायचं झालं तर 'न लिहिलेली पुस्तकंही तुम्हाला वाचता आली पाहिजेत!' अशी न लिहिलेली पुस्तकं वाचून ४-५ वर्षे विविध मार्गांनी अभ्यास करून, कात्रणं जमवून, जमेल तिथे प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन शोधक वृत्तीने अशा चरित्रनायकाचं कर्तृत्व आपल्यापर्यंत पोहचवणाऱ्या वीणाताई लेखनामागची प्रेरणा तसेच प्रक्रिया उलगडून सांगताना नव्या लेखकांसाठी मार्गदर्शक ठरावं असं महत्वाचं विधान करतात. त्या म्हणतात ' लेखकाला स्वतः संपादक होता आलं पाहिजे' लेखकाने कोणतंही पुस्तक लिहीत असतांना आपण लिहिलेलं पुस्तक स्वतः अगोदर तपासून घ्यायला हवं. सर्व संदर्भ, माहिती, स्रोत यांची नीट शहानिशा करायला हवी. लिहिलं की टाक छापायला असं करता नये. आज संपादकांची वानवा आहे असं म्हणण्यापेक्षा लेखकाने स्वतःच संपादक होणं गरजेचं आहे. लिहिलेल्या प्रत्येक विधानाला लेखक बांधील असतो याचं योग्य ते भान ठेवून प्रत्येक विधान काळजीपूर्वक आणि जबाबदारीने करायला हवं. हे सांगतानाच वीणाताई आपण मिळवलेल्या माहितीचं ' merciless killing' करता आलं पाहिजे असंही सांगतात. साधारणतः ३ ते ५ वर्षे अभ्यास करून माहिती संकलित केल्यावर वीणाताई ही माहिती त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींकडून तपासून
घेतात व त्यानंतर अथक परिश्रमाने जमवलेल्या परंतु पुस्तकात या ना त्या कारणामुळे स्थान न मिळवू शकणाऱ्या बऱ्याचशा माहितीचं ' merciless killing' करून मग माझं हस्तलिखित तयार होतं असं त्या सांगतात. आजच्या मोबाईल-कम्प्युटरच्या युगात हस्तलिखिताचं महत्व अधोरेखित करायलाही त्या विसरत नाहीत. मोबाईल किंवा लॅपटॉप/कम्प्युटरवर टाईप करण्यापेक्षाही हस्तलिखित अधिक आनंद देतं असं त्या म्हणतात. ज्या चरित्रनायकाचं चरित्र लिहायचं आहे त्याविषयी अनेक पुस्तके वाचून आजही त्यावरील टिपणे हस्तलिखिताच्या स्वरूपातच करतात हे विशेष. मोबाईलचा वापर अत्यल्प प्रमाणात करणाऱ्या वीणाताई माहिती जमा करताना पूर्वी वॉकमन वापरत असत परंतु आता मोबाईलमुळे आवश्यक असेल तेव्हा व्हिडीओ घेण्यासाठी मदत होते हे मात्र मान्य करतात.
'एक होता कार्व्हर', 'डॉ. आयडा स्कडर', 'डॉ.खानखोजे', 'डॉ. सालिम अली', 'लीझ माईटनर', 'रोझलिंड फ्रँकलीन', 'सर्पतज्ञ डॉ.रेमंड डिटमार्स', 'रॉबी डिसिल्व्हा', 'भगीरथाचे वारस ' या पुस्तकांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील महान व्यक्तींची ओळख वीणाताईंनी मराठी माणसाला करून दिली. वीणाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य हेच की 'एक होता कार्व्हर'ला ४० वर्षे होऊनही आजच्या पिढीलादेखील ते आपलेसे वाटते. त्याकाळीही मुळीच बोजड, रुक्ष वा किचकट न वाटणाऱ्या शैलीत लिहिणाऱ्या वीणाताई स्वतः उत्तम वाचक असल्यानेच बहुधा ही किमया लीलया साधतात. म्हणूनच वाचनाचं महत्व त्या पुन्हा पुन्हा सांगतात. आजची पिढी सुजाण आहे. आपल्या मुलांनाही वाचनाचा लळा लागावा अशी इच्छा असेल तर पालकांनी असोसिएशनचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे. मुलांना वाचता येत नसेल तर त्यांना स्वतः पुस्तक वाचून दाखवलं पाहिजे. मी आजही अधिकाधिक वेळ वाचनालाच देते त्यातूनच मला नवे नवे नायक सापडतात असं वीणाताई सांगतात. आपल्या लेखणीतून असामान्य व्यक्तिमत्वांची ओळख करून देण्याचं कार्य अविरतपणे व्रतस्थ वृत्तीने करणाऱ्या
निगर्वी, नम्र आणि अभ्यासू लेखिका वीणा गवाणकर यांचे मन:पूर्वक अभिनंदन ...!

~ अनिल विद्याधर आठलेकर
संपर्क क्रमांक : ९७६२१६२९४२

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !