मनाचा वॉर्डरोब



 बघ,
 सांगत होतो नको उघडूस, 
तरी तुला राहवलं नाहीच.

कधी नसतो उघडायचा असा मनाचा वॉर्डरोब कुणाचा. त्यात असतात अर्धवट तुटलेल्या असंख्य चांदण्या, जायबंदी झालेला चंद्र, ठिगळं लावलेलं आकाश, आकसलेलं क्षितिज वगैरे कोंबून भरलेले. कुठंतरी उभा असतो अंग चोरत एखादा अस्तित्वहीन शहारा त्याला आणू नये प्रकाशात असं, कसाबसा दाबून ठेवलेला हुंदका होऊ शकतो अनावर त्याचा. अंधाराच्या डोळयांची सवय झालेला निवांत कोपरा न कोपरा उजेडात आला की बिथरण्याचीच जास्त शक्यता असते. त्यांना बाहेर येण्याची मुभा देऊ नये, शक्य झालंच तर एक भलं मोठं कुलूप लावावं बाहेरून आणि चावी द्यावी फेकून दूर कुठेतरी. पंख तुटलेल्या पक्ष्यांनी नसतात पहायची स्वप्नं आकाशवारीची, त्यांच्या नशिबी खितपत पडणंच असतं हे ठसायला वेळ लागतो म्हणून, म्हणून काढू नये त्यांना बाहेर कधीही कुलुपाच्या. अशा एकेक दिव्य विचारांच्या माळा आता होत जातील अधिकाधिक लांब, त्यांना आवरणं कठीण जाईल तुला,

म्हणून म्हणतो,

असा उघडू नये कधी कुणाच्या मनाचा वॉर्डरोब... 
__ अनिल विद्याधर आठलेकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !